सिनेमातील देशभक्तीचे बदलते रंग

युवा विवेक    22-Aug-2022   
Total Views |

cinema petriotic
स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा मनोरंजनाची माध्यमे कमी होती, तेव्हा त्या काळात लावणी, पोवाडा, तमाशा, संगीत नाटके हेच कलाप्रकार सर्वसामान्य माणसांचे रंजन करत असतं.
 
अशा वेळी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या शिवजयंती उत्सवातील एखाद्या शाहिरांचे पोवाडे स्वराज्य प्रेमाची ठिणगी पेटवून जात असत, तर अगदी लहान मुलांच्या पाळणागीतात देखील स्वातंत्र्यवीरांची नावे गुंफून कवणे रचली जाई.
त्याही पलीकडे जाऊन सांगायचं तर नटश्रेष्ठ बालगंधर्व ह्यांची नाटके ही मुख्यत्वे पौराणिक कथाबीज असलेली असत. त्यातली रंगमंचीय समृध्दी डोळ्यांची पारणे फेडणारी असत. पण त्यांच्याच " संगीत शारदा नाटकाच्या" नाशिक मधील विजयानंद नाट्यगृहात झालेल्या प्रयोगादरम्यान नाटक ऐन रंगात आलेले असताना क्रांतिकारक अनंत कान्हेरे ह्यांनी तत्कालीन कलेक्टर जॅक्सन ह्याचा गोळ्या घालून वध केला. ह्या घटनेचा परिणाम बालगंधर्व ह्यांच्यावर इतका झाला की, लोकांमधील क्षोभाला आपल्या नाटकाच्या माध्यमातून वाचा फोडली जावी म्हणून त्यांनी काकासाहेब खाडिलकर लिखित संगीत सौभद्र ह्या नाटकात महाभारतातील कीचक म्हणजे दुष्ट ब्रिटिश सत्ता, सैरंध्री म्हणजे दुर्बल भारतीय जनता तर लोकमान्य टिळक म्हणजे भीम…..हा आशय लोकांपर्यंत जाईल, असे सादरीकरण ते करत असत.
 
बालगंधर्वांचा पगडा असल्याने चित्रपटकलेच्या माध्यमातून असाच सुप्त संदेश देण्याचा प्रयत्न प्रभात फिल्म्सचे सिनेमे करत असत.
शेजारी सारखा सिनेमा हिंदू मुस्लिम ऐक्याची गरज बोलुन दाखवत असे. तर माणूस, कुंकू सारखे चित्रपट स्वातंत्र्यासोबतच सुधारणेच्या दृष्टीने पाऊल टाकण्याची गरज अप्रत्यक्षरित्या बोलुन दाखवत असतं.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा आधुनिक भारताची पायाभरणी करण्याची वेळ आली, तेव्हा फाळणी नंतर कलाक्षेत्रात देखील बरीच उलथापालथं झाली.
 
अनेक कलावंत पाकिस्तानात स्थायिक झाले होते.
"मेरा जुता है जपानी.. यह पतलून इंग्लीस्तानी" म्हणणारा नायक आपण पाहिला. कारण स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण पिछाडीवर होतो.
"छोडो कलकी बाते " म्हणत नव्या भारताची रचना करणारे युवक पुढे येऊ लागले. लालबहादूर शास्त्री ह्यांच्या नेतृत्वाखालील यशस्वी झालेल्या हरितक्रांतीला मनोजकुमारने उपकार मधून पडद्यावर साकारले.
त्याआधी चीनसोबतच्या युद्धात झालेल्या मानहानिकारक पराभवामुळे "अब तुम्हारे हवाले वतन साथियो" ही पराभूत मानसिकता जाऊन "जय जवान जय किसान" चा नारा सर्वांमुखी झाला.
 
पुरब और पश्चिम, शहीद, क्रांती सारख्या चित्रपटातून देशभक्तीची भावना तेवत ठेवली.
देव आनंदच्या प्रेमपुजारी सारख्या चित्रपटात सुध्दां शांतीसोबत शस्त्रसज्जतेची गरज बोलणारा नायक दाखवला गेला.
राजेश खन्ना सारखा स्वप्नाळू आशावाद दाखवणारा महानायक पण म्हणू लागला की "देखो वीर जवानो अपनी खूनपे यह इलजाम न आए" कारण ही पराभूत मानसिकता सलत होती.
त्याच सुमारास "सात हिंदुस्थानी" मधून अमिताभचे पदार्पण झाले होते. ब्रिटिश गेले पण गोऱ्या साहेबांच्या जागी काळे साहेब आल्याने सर्व सामान्यांचे प्रश्न संपले नाही हे बोलुन दाखवणारा एक अँग्री यंग मॅन…. गरीबी, बेरोजगारी, आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर घडला.!!!!
 
ही धगधगणारी पिढी नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत धुमसत राहिली.
काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचे रूप उलगडणारा रोजा,
मुंबई दंगलीवरचा बॉम्बे असे अनेक चित्रपट देशभक्तीची वेगळी रूपे दाखवू लागली.
नाना पाटेकरच्या क्रांतिवीर आणि तिरंगा मधला नायक पुन्हा लोकांना एकीची गरज बोलुन दाखवू लागला.
आमिर खानच्या सरफरोशमधून देशांतर्गत शत्रूंच्या वेगळ्या प्रश्नाला हात घातला गेला.
ब्लॅक फ्रायडे मधून अंडरवर्ल्डच्या रूपाने देशा समोरचे नवे संकट दर्शवले गेले.
हे सगळं होत असताना केवळ शत्रू राष्ट्राला किंवा महासत्ताची उणीदुणी काढून चालणार नाही, ह्याचं भान असलेला नायक शाहरुखने स्वदेसमधून रंगवला.
 
सनी देओलने गदर, हिरो आणि इंडीयन मधून दाखवलेली आक्रमक देशभक्ती जेवढी महत्वाची होती तेवढीच चरणपुर सारख्या गावात वीज पोहोचणे पण मोलाचे आहे हा संदेश देणारा शाहरुखचा नायक सर्वांना आवडला.
गेल्या दोन दशकात तर ही देशभक्तीची भावना जास्त तीव्रतेने पडद्यावर साकारली जात आहे.
चक दे इंडिया मध्ये हॉकी सारखा राष्ट्रीय खेळ हा राष्ट्र भक्ती दर्शविण्याचे एक माध्यम बनला तर
लगान, मंगल पांडे, नीरजा, रंग दे बसंती, परमाणू, सत्यमेव जयते, बेबी, हॉलिडे, loc कारगिल, उरी द सर्जिकल स्ट्राईक, मिशन काश्मीर, राझी, लक्ष्य, पुकार, वेंनसडे, मिशन मंगल अशा अनेक चित्रपटातून वेगवेगळ्या माध्यमातून देशभक्तीचे विविध रंग दर्शवले गेले आहेत.
 
हनीट्रॅप, रॉ एजंट, सैन्यदल, पोलिसदल, अवकाश शास्त्र, अशा विविध विषयांवर आधारलेल्या कथाबिजातून देशभक्तीच्या विविध छटा दाखवल्या जात आहेत.
पृथ्वीराज, मनिकर्निका सारखे ऐतिहासिक व्यक्तिमत्वावर आधारित चित्रपट बनत आहेत तर padman, आरक्षण सारखे वेगळ्या विषयावर भाष्य करणारे चित्रपट बनत आहेत हे नक्कीच सुचिन्ह आहे.
अमृतमहोत्सवी वर्षात देशभक्तीच्या भावनेला सुद्धा नवसंजीवनी मिळेल ह्यात शंका नाही.
 
- सौरभ रत्नपारखी