सांज..अशीही !

युवा विवेक    23-Aug-2022
Total Views |

evening
त्या दिवशी हृदयाच्या पाऊल वाटेवरून चालताना कित्ती हवं हवसं वाटत होतं. सांज हलकेच झुकत चाललेली, गरम उन्हाचा दिवस संपत चाललेला आणि त्या संधीत हळुवार रेशमी केशरी उन्हाच्या तारा तुझ्या शांत चेहऱ्यावर झुकलेल्या. तुझा सावळा चेहरा कित्ती उजळून निघाला होता त्या केशरी रेशमात. आपल्या पावलांचा ताल, शरीराची लय कित्ती साथ देत होती एकमेकांना. जणू दोन शरीरातला एकच प्राण. वाटेवरचं सुकलेलं गवतही आपल्या मौनातल्या संवादानं क्षणात हिरवं कंच होईल की काय असं वाटत होतं. तू क्षितीजाला समांतर पहात चेहऱ्यावर मिश्किल भाव आणत, हलके हलके पावलं टाकत होतास आणि मी माझ्या क्षितिजकडे पहात फक्त त्याला साथ देत होते. अगदी प्रत्येक पावला गणिक. ही सांज, ही वळणदारी पाऊलवाट संपूच नये असं वाटत असताना, मौनातला संवाद मात्र अव्याहत चालू होता. चालून पाऊलवाट संपली तशी मी भानावर येऊन विचारलं निघुया..? त्यावरही तुझं काहीच न बोलता मान डोलवणं आणि पुढे काही बोलायच्या आत आलोच! असं सांगून, क्षणभरात परत येऊन मी न मागता अलवार पळस वृक्षाच्या नि बहव्याच्या देहावरून, निसटत्या फुलांनी झाडाच्या पायावर कृतज्ञतेन आरास केलेली अन् त्यांच्याच संमतीने ती तू उचलून ओंजळ माझ्या पुढ्यात धरलेली. तुझ्या रुंद ओंजळीतून डोकावत ही फुलं कित्तीतरी सुखावून हसत होती. माझ्या पदरात पडताना कसला आनंद होत असेल त्यांना, झाडावरून गळून त्यांचं सारं अस्तित्व संपल्याचा की, मातीवर नि त्या झाडाच्या पायावर वाहून घेतल्याचा, की माझ्या या शांत अबोल सख्याच्या हातांचा स्पर्श झाल्याचा, नेमकं काय होत होतं त्या गर्द शेंदरी रक्तवर्णी पळस नि नवपरीणीताच्या अंगकांतीचा रंग चोरलेल्या या बहव्याच्या फुलांना. का इतके उल्हीत,प्रफुल्लित डवरले जात होते? माझ्या डोळ्यातले हे सारे प्रश्न जणू फुलांनीच तुला सांगितले होते. यावर सरसावून तू उत्तर दिलंस त्यांना तुझ्या ओटीत येणार असल्याचा आनंद होतोय ! आसुसलेत तुझ्या रेशमी पदरच्या स्पर्शाठी ते ही..' तेही' या शब्दाने कान टवकारले गेले थोडे..
हे सगळं तू माझ्या नजरेला नजर देऊन बोलून गेलास आणि काळजात वीज लकाकली आणि माझं मात्र लाजाळूचं झाड झालं . माझ्या सारखाच तू ही अबोल बुजरा. मग काय पुन्हा तुझे माझे मौनातले संवाद चालूच राहिले कितीतरी वेळ .मधेच वारा खट्याळ होऊन तुला हवे तसे त्याचे वागणे असे .माझ्या केसांची बट कानामागे सारली तरी हटवादी पुन्हा गालावर आणि तू वाऱ्याचे मनोमन मानलेले आभार मी चोरून पाहिले होते . ती पाऊलवाटही सुखावून गेली असेल तुझ्यामाझ्या या भेटीने आणि तो वळणावरचा मोठा गोल दगड तुझ्या माझ्या उंचीचं गणित सोडवणारा ..जसा वारा तुझ्यासाठी धावला तसा हा धोंडा माझ्यासाठी धावून आला होता, आपली उंची समान करण्यासाठी लडिवाळ पणे धडपडला होता. एव्हाना अंधार दाटत चाललेला तुझ्या माझ्या भेटीच्या क्षणांनीही आपापला पसारा आवरायला घेतला होता. डोळ्यात हुरहूर दाटून आली होती दोघांच्याही. पण तरीही आपण शांत, कारण भडाभडा बोलून मन मोकळं करणं ना तुला जमणार होतं ना मला. मनाने मात्र तुला मी गच्च मिठी मारून घेतली अगदी तुझ्याही नकळत, निरोपाच्या क्षणी डोळ्यांचे कड ओलावले होते तुझे. तू कितीही लपवलेस तरी माझ्या पापण्यांनी ते अलगद टिपले होते. आता पाऊलवाट विभागली जाणार होती आपली आणि त्या शेवटच्या क्षणी तू हलकेच कुजबुजलास तुझी मिठी गोड आहे..!आणि मी चमकलेच. मनाने याला दिलेली मिठी जाणवली ? आई गं!असा मी मनात विचार करतेय न करतेय तोवर त्याचं अलवार उत्तर आलं हो जाणवली ...! बापरे !!!
काय म्हणायचं याला प्रेम, समजून घेणं ,मनकवडे पणा की पूर्ण समर्पण मनाने मनाला दिलेलं. कुणास ठाऊक पण जे होतं आहे ते सारं वास्तव असलं तरी वास्तवाच्या ही खूप पलीकडचं होतं!

©️अमिता पेठे पैठणकर