चिंतनाच्या पोहऱ्यातून..

युवा विवेक    09-Aug-2022   
Total Views |

meditation
रहाटाच्या विहिरीवर दोराला पाणी काढण्यासाठी पोहरा बांधलेला असतो तहान भागवण्यासाठी आपल्याला तो रहाट उलट बाजूने फिरवून पोहरा पाण्यात सोडायचा, नि पोहरा पाण्यावर पडला की, हातांच्या विशिष्ट हालचाली करून हिसका असा द्यायचा असतो ज्याने पोहरा पाण्यात बुडेल. मग एकदा का पोहऱ्यात पाणी आलं की, सुलट बाजूने रहाट फिरवून पाण्याने भरलेला पोहरा वर काढायचा आणि तहान भागवायची. ही एक साधी कृती आयुष्याचं गणीत समजावून जात असते.
 
 
असाच एक पोहरा आपल्या स्वतःचा म्हणजे खाजगी मालकीचा प्रत्येकाकडे असतो. 'चिंतनाचा पोहरा' त्या पोहऱ्यात आपल्या मनाच्या किंवा विचारांच्या खोल विहिरीतून सद्सद विवेकाचं, तारतम्याचं पाणी वर काढायचं असतं. कारण,
व्यक्ताव्यक्ततेच्या सीमेवर अडखळून पुरते भांबावलेलो असतो आपण. कितीतरी, कुठेतरी, कुणालातरी दिले घेतलेले असतात आपण संवाद विसंवादाच्या रूपाने शब्द,वाक्ये,संदर्भ, कितीतरी स्पष्टीकरणे.
एखाद्या वाक्याचे, ओळीचे करायला घेतलेच संदर्भासहित स्पष्टीकरण , मग लागत जातात शेकडो अनव्यार्थ
एकेका विरामांचे, अनुस्वारांचे रफारांचे, विसर्गाचे,काना मात्रा, वेलांट्यांचे अगदी आपणच सोडलेल्या समासाचे सुद्धा किंवा बोलताना चुकीच्या ठिकाणी घेतलेल्या विरामाने अथवा अर्धविरामाने सुध्दा किंवा सुटून गेलेला असतो एखादा मुद्दा अनवधानाने सांगाय बोलायचा,
 
 
तेव्हा वाटतं नको नको हा भावनांचा पसारा, हे शब्दांचे व्याप, ही तारांबळ ही धांदल. घाई गडबडीत हाताला येईल तसे कुठंही, कसेही आणि काहीही कोंबून आवरा आवर करुन मनाच्या कप्प्या कोनाड्यांना घट्ट बंद करून, सगळं नीट असल्याचं वेडं समाधान आपणच आपल्याला मिळवून दिलेलं असतं. मग कधीतरी उबग येतो आपल्याच उंडगळ शिस्तीचा तेव्हा मनापासून वाटतं शांत आणि शिस्तबद्ध संयमाने उघडावीत मनाच्या कपाटाची दारं. कपाट उघडताच बदाबदा पडतात ना कपडे, आपणच गरज नसताना या ओकेजनचे, त्या ओकेजनचे, दादाने शर्ट दिला, मित्राने स्कार्फ दिला,अमक्याने, ढमक्याने म्हणून वॉर्डरोब भरून उतू जात असतो. खरचं आपण किती आवडीने आणि वारंवार घालतो पण नाही, हौस असते जमवण्याची इतर प्राण्यांच्या तुलनेत माणूस प्राण्याला संचयाचा जणू वरदानच दिलय ईश्वरानं मग तो जमीन जुमला, कपडा लत्ता , चीजवस्तू किंवा मग त्या आठवणी असोत. या सगळ्याचा कंटाळा येतो. विरक्त वाटतं मन भरतं कधी तरी मग प्रत्यक्ष व्यवहार, देव-घेव सगळं सगळं थांबवावं असं वाटतं ना अगदी तसचं मनाचा व्यवहार, व्यापार सुधा नको नको व्हायला होतो, वाटतं वर्षानूवर्षे आत साठवलंय ना ते कोंबून, कोंडून ठेवलेल्या मनाच्या कुठल्याशा विंडोमध्ये शेकडो मेगा बाईट, गिगा बाईट मेमरी कारणास्तव नि विनाकारणही सांभाळत असतो आपण. अचानक एखाद्या प्रसंगाने जागे होऊन (दुखावले जाऊनच खरे तर) अंतर्मुख होऊन खडबडून जाग येते !
 
 
वाटते सगळा हिशोब लावावा, बसवावा ताळेबंद , काढाव्यात मनाच्या कान्या कोपऱ्यात पडलेल्या जमाखर्चाच्या किर्द वह्या शोधून, विचारावा जाब आपणच आपल्याला. काय कमावलं, काय गमावलं याचा. केलेल्या गुंतवणुकीचा मागावा अहवाल आपणच आपल्याकडे आणि संपवावेत कच्चेमचे,अर्धवट राहिलेले, गाभुळवस्थेत सोडून दिलेले, पूर्णत्वास येतायेता राहून गेलेले मनाचे व्यवहार नि सोडून द्यावे वाऱ्यावर मनाला सावरीच्या बोंडातल्या हलक्या रेशमी धाग्यांसारखे दिशा मिळेल तिकडे आणि तसे उडायला.
 
 
उडू द्यावे, बागडू द्यावे, उर भरून श्वास घेऊ द्यावे कळत्या वयापासून नजाणो कितिदा मनोव्यापारात नफा नुकसान सहन केलेला असतो त्याने. चिंतनाच्या पोहऱ्यातून काढता यायला हव्यात या साऱ्या गोष्टी, तुंबलेल्या विहिरीतला गाळ उपसावा तशा नि तो उपसून झाल्यावर मनाच्या विहिरीला फुटावेत चहू बाजूंनी पाझर. तुडुंब भरावी खळाळत्या स्वच्छ पाण्याने विहीर नि मनसोक्त पिऊन तृप्त व्हावीत सर्वेंद्रिये
खरंच....
आयुष्यात एका टप्प्यानंतर जमायला हवं असं करणं!!
चिंतनाचा पोहरा वापरता यायला हवा प्रत्येकाला!
अमिता पेठे पैठणकर