मेरी आवाज ही पहचान है…
आज काय लिहावं एकदम कळेना. काय लिहावं म्हणण्यापेक्षा काय काय लिहावं कळेना असं म्हणणं जास्त योग्य होईल. खरंतर माझ्या मनात तुम्हाला अहो-जाहो म्हणावं की, अगं-तुग यावरुन गोंधळ आहे. तुमच्या मधुर आवाजाने, अफलातून गाण्यांनी मनाचा असा काही वेध घेतलाय की, तुम्ही अगदी जवळच्या, आपल्या वाटायला लागलात. त्यामुळं अगं-तुग म्हणावं वाटतं. पण एवढ्या जेष्ठ- श्रेष्ठ कलाकाराला तसं म्हणणं बरोबर नाही ना. तुम्ही कितीही जवळच्या, आपल्या असलात तरी तुमची जागा खूपच वरची आहे. त्यामुळं अहो-जाहोच ठीक आहे.
किती भाग्यवान समजते मी स्वतःला! तुमच्यासारख्या दैवी देणगी लाभलेल्या गायिकेला ऐकायला मिळालं. वयात खूप मोठा फरक असला तरी एकाचवेळी आपण या जगात बराच काळ होतो ही मोठी भाग्याची गोष्ट वाटते मला. तुमची असंख्य गाणी ऐकत आमची पिढी मोठी झाली. वयात आल्यानंतर तर तुमच्या चित्रपटगीतांनी खूप मोठा आधार दिला. गाण्याचे बोल, तुमचा आवाज, गाण्याचं संगीत या सगळ्यांचा मेळ इतका सुरेख जमून आला की, अमरत्व लाभलं त्या गाण्यांना. मी लहान असताना सकाळी सकाळी रेडिओ सुरु केला की, तुमच्या आवाजातली अभंगवाणी ऐकत दिवसाची सुंदर, मंगलमय सुरुवात व्हायची. मग मराठी भावगीतं, चित्रपटगीतं ऐकत दिवस संपत आला की, शेवटचा रजनीगंधा कार्यक्रमात तुमच्या आवाज ऐकायचा आणि मग शांतपणे झोपायचं असा एक ठरलेला दिनक्रम असायचा आमचा. तुमचा मधुर स्वर कानी पडलाच नाही असे दिवस फारच कमी असायचे. काही काही सवयी कशा असतात ना...त्या अंगवळणी पडलेल्या असतात, कधी हातून केल्या जातात कळतही नाही. तसंच तुमचा आवाज ऐकायची सवयच लागून गेलेय. हात आपसूकच रेडिओच्या बटणाकडे जायचा. आता तर यू ट्युबमुळे तिन्ही त्रिकाळ तुमच्या आवाजात चिंब भिजायला मिळतंय. सुख म्हणतात ते हेच.
मला कायम आश्चर्य वाटत आलंय की, तुमचं हे एवढं मोठं, जगप्रसिद्ध, देवतुल्य व्यक्तिमत्त्व आणि राहणीमान किती साधं! तुमच्या मिस्कील स्वभावाबद्दल तर खूप ऐकून आहोत आम्ही. तुमच्या नावाचा उल्लेख जरी कुठं निघाला तरी कानात गुंजणाऱ्या तुमच्या दैवी सुरांपाठोपाठ समोर येतं ते तुमचं दोन वेण्यांमधलं, दोन्ही खांद्यांवरुन पदर घेतलेलं रुप! अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्यांच्या या जगात तुम्ही अपवादच! यात संस्कारांचा वाटा तर आहेच, पण आपल्यापेक्षा आपल्यातली कला जास्त श्रेष्ठ हा भाव आणि तिच्या पायी समर्पण हे कारण असेल का? पण काही म्हणा...तुमची बातच काही और!
मला ना फार वाटतं की, तुमच्यासारखे जे श्रेष्ठ कलाकार आहेत, त्यांच्यासाठी देवाकडून अमरत्वाचा वर मागून घ्यावा. सुरु झालेलं आयुष्य कधीतरी संपणारच माहीत असूनही तुम्ही आता आमच्यापासून दूर गेला आहात हा विचारही नको वाटतोय. तुम्ही गेल्यानंतर कितीतरी दिग्गज लोकांनी तुमच्याबद्दल इतकं भरभरुन लिहिलं होतं की, त्या सगळ्यासाठी मनात एक वेगळा कप्पाच केलाय मी. खरं तर तुम्हाला प्रत्यक्ष भेटायची खूप इच्छा होती. पण ती कशी पूर्ण होणार ना...प्रभुकुंजला मंदिर आणि तुम्हाला देव मानणारे पेडर रोडवरुन जाताना हात जोडतात हे ऐकून होते. पण जसं सगळ्यांनाच काही पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जायला जमतं असं नाही, पण भाव मात्र त्याच्या ठायी कायमच असतो. तसंच मी ही तुम्हाला कायम मनातून पूजत आलेय. आता मंदिरात जरी देव नसला तरी जोवर श्वास चालू आहे तोवर पूजा तर होतच राहणार आणि एक सांगू? हा जो माझ्या मनातला अमूल्य ठेवा आहे ना...तो माझ्या घरातल्या पुढच्या पिढीकडेही जसाच्या तसा आपसूकच गेलाय. आजच्या धांगडधिंग्याच्या जमान्यात तुमची गाणी मनापासून ऐकणारी कोणी तरुण मंडळी दिसली ना की, मलाच कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. मुलांवर चांगले काही ऐकण्या-वाचण्याचे संस्कार होणंही महत्त्वाचं असतं ना. तुम्ही आणि तुमच्यासारख्या आणखी बऱ्याच कलाकारांमुळे आमच्या वाट्याला आलेले हे संस्कार आता पुढच्या पिढीकडे झिरपत जाताहेत, याहून दुसरा मोठा आनंद नाही.
अशी गुणी माणसं कायम इथंच असावीत असं मनापासून कितीही वाटलं तरी सृष्टीच्या नियमाला कोण बदलू शकणार! तुम्ही हे जग सोडून गेल्यानंतर पेपरमध्ये आलेलं एक चित्र आवडलं होतं. स्वर्गात आधी गेलेल्या सगळ्या ग्रेट कलाकारांनी मैफिल जमवली आहे आणि आदराने तुमचा हात धरुन तुम्हालाही त्यात सामील करुन घेत आहेत. किती बोलकं चित्र होतं ते! ते पाहिल्यापासून तुमचा आवाज कानावर पडला की, स्वर्गातली मैफिलच डोळ्यासमोर येते. देवही अगदी तन्मयतेने त्या मैफिलीचा आस्वाद घेताना दिसतात मग. किती लकी आहेत ना सगळे देव! आता त्यांना सोडून तुम्ही कधीही, कुठेही जाणार नाही.
एक सांगू? दुनिया इधर की उधर झाली तरी तुमचं आमच्या हृदयातलं स्थान मात्र अढळ राहणार हे नक्की. तो ध्रुव ताराही लाखो वर्षांनी का होईना पण आपली जागा बदलतो. तुमच्या बाबतीत ते ही शक्य नाही. असा आवाज देवाने मन लावून फुरसतीनेच दिलेला असतो. त्यामुळे पुन्हा अशी गायिका होणे नाही. खरंच आम्ही किती भाग्यवान. परत परत मनात येत राहतंय. तुम्हाला साष्टांग दंडवत!
तुमच्या आवाजाची चाहती….
जस्मिन जोगळेकर