रौप्य महोत्सवी शक्तिमान

युवा विवेक    26-Sep-2022
Total Views |

raupyamahotsavi shaktimaan
 
 

रौप्य महोत्सवी शक्तिमान

आजपासून २५ वर्षांपूर्वी सप्टेंबर १९९७ मध्ये दूरदर्शनवर भारतीय मनोरंजन विश्वातल्या पहिल्या सुपरहिरोची म्हणजे अर्थातच मुकेश खन्नाकृत शक्तिमानची दिमाखदार एन्ट्री झाली होतीपाहता पाहता ह्या घटनेला आता २५ वर्षे उलटून गेली आहेत. जवळपास एका पूर्ण पिढीला आपल्या नॉस्टॅल्जियाचा भाग करून देणारा शक्तिमान आजही आठवणीत आहे.

 

त्याचं कमरेवर हात ठेवून उभे रहाणं, गिरक्या घेत हवेतून उडणे, त्याचा तो लालसर सोनेरी रंगाचा पोषाख, स्वत:च्या कुंडलिनी जागृत करून दैवी शक्ती मिळवणे… ह्या सर्वांचे अनुकरण करत मोठी झालेली भारतातील लाखो लहान मुले आता गृहस्थाश्रमात आहेकेवळ शक्तिमानच नव्हे तर त्याची नायिका गीता विश्वास, काकोदर, स्टोनमॅन, सूर्याशी, कपाला, महागुरू अशी असंख्य पात्र आजही शक्तिमानच्या चाहत्यांना तोंडपाठ आहेत.
 

शक्तिमान मालिका सुरू होण्यापूर्वी मुकेश खन्नावर पितामह भीष्मांच्या भूमिकेचा असा शिक्का बसला होता की, लहान मुलांपासून राष्ट्रपतीपर्यंत अनेकांना "आयुष्यमान भव" म्हणण्याचे विनोदी प्रसंग मुकेश खन्नाच्या आयुष्यात घडले होतेआपल्या बॉलिवूडमधल्या नायक पदाच्या अपयशी कारकीर्दीनंतर भीष्माच्या भूमिकेने त्याला नवसंजीवनी दिली होती. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून आपल्या निर्मिती संस्थेचे नाव देखील त्याने भीष्म इंटरनॅशनल असेच ठेवलेबी.आर. चोप्रांच्या महाभारत मालिकेतील इतर अनेक अभिनेत्यांना स्वत:वरचा शिक्का पुसता आला नाही. पण मुकेश खन्ना याबाबतीत यशस्वी ठरला

 

शक्तिमानची मुख्य संकल्पना ही सुपरमॅन प्रमाणेच होतीवास्तव आयुष्यातील एक साधारण आयुष्य जगणारा पत्रकार वेळप्रसंगी आपल्या दिव्य शक्तींच्या जोरावर दुर्जनांचा निपात करतो हे सुपरमॅन सारखं कथाबीज शक्तिमानचं देखील होतं. शक्तिमानचंच साधारण पण तितकंच बिलंदर रूप असलेले व्यक्तिमत्व म्हणजे पंडित 'गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री' हे देखील अफाट लोकप्रिय होतंगीता विश्वास ही नायिकेची भूमिका प्रथम किटु गिडवाणी आणि नंतर वैष्णवी महंतने साकारली. त्यांच्या सोबत मुख्य खलनायक तमराज किलविश (सुरेंद्र पाल) आणि त्याच्या अंधेरा पसरवणारे अनुयायी सुध्दा गाजले.

 

वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करत जगाला वेठीस धरणारा शास्त्रज्ञ उर्फ ग्रेट शैतान सायंटिस्ट डॉ.जेकोल सुध्दा बच्चे कंपनीत लोकप्रिय होता. याशिवाय इंनव्हींझिबलमन, प्लास्टिकमन, स्टोनमन, कष्टक, बिल्लीअसे विविध पात्र वेगवेगळ्या एपिसोड मधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि निखळ मनोरंजन करून गेले.

तमराज किल्विशच "अंधेरा कायम रहे", डॉ. जेकोलच "पावर", लहान मुलांचं "सॉरी शक्तीमान" असे छोटे छोटे पालुपद आज दैनंदिन बोलीभाषेत सुध्दा गंमतीने बोलले जातात. शक्तिमानच्या यशात त्याच्या शिर्षक गीताचा वाटा सुद्धा मोठा आहे. विनोद राठोड ने गायलेल्या त्या गीताला संगीत दिले होत लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या सुप्रसिद्ध जोडीतल्या प्यारेलाल ह्यांनी.!

 

"होता है जब आदमिको अपना ज्ञान, कहलाया वो शक्तिमान" ह्या ओळी अनेकांना इतक्या वर्षानंतरही तोंडपाठ असतीलशक्तिमान मालिकेने जवळपास - वर्षे आपली लोकप्रियता टिकवली होती पण एकाच वेळी आर्यमान, विराट अशा वेगवेगळ्या भूमिका करण्याच्या मुकेश खन्नाच्या अट्टहासापायी पुढे ह्या मालिकेकडे दुर्लक्ष्य होत ती भरकटत गेली. पण मुकेश खन्नाच्या मते ह्याला दूरदर्शनची तत्कालीन धोरणे जबाबदार होती. सातत्याने बदलत जाणारी प्रसारणाची वेळ, वाढवत नेलेले भरमसाठ प्रसारण शुल्क या ना त्या कारणाने वैतागलेल्या मुकेश खन्नाने अखेर मालिका थांबविण्याचा निर्णय घेतला. शक्तिमानचे अनुकरण केल्यामुळे गिरक्या घेऊन उंचावरून पडून मुलं जखमी झाल्याच्या असंख्य बातम्या देखील त्याकाळी वृत्तपत्रातून प्रकाशित होत असत. त्यांचा देखील त्रास निर्माता म्हणून मुकेश खन्नाला भोगावं लागला.

 

शक्तीमानचे ड्रेस, खेळण्या, कार्टून मालिका इत्यादी विविध प्रकारात शक्तिमान आपली लोकप्रियता टिकवून राहिला टिव्ही आणि चित्रपटविश्वात पण नंतरच्या काळात ज्युनिअर जी, क्रिश किंवा फ्लायिंग जाट वगळता सुपरहिरो फारसे लोकप्रिय झाले नाहीत्यामुळे शक्तिमानची लोकप्रियता आजही अबाधित राहिली.

 

नुकतेच शक्तिमानवर चित्रपट येत असल्याची बातमी वाचली आणि मन स्मरणरंजनात गुंतले.

नक्की कोणता अभिनेता शक्तिमानची भूमिका साकारणार आहे हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी शक्तिमानची ती गिरक्या घेत केलेली एन्ट्री पुन्हा एकवार अबालवृद्धांना वेड लावेल ह्यात शंका नाही.

       - सौरभ रत्नपारखी