सक्तीचा मेनोपोज

युवा विवेक    03-Sep-2022
Total Views |

Forced menopause
 
 
नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर हजर झाले आहे, एक नवा लेख घेऊन. मागच्या भागात आपण पाहिले की मेनोपौजचे वय कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असते. आज आपण पाहू की, सक्तीचा मेनॉपौज म्हणजे काय आणि तो का होऊ शकतो.
मेनॉपौजची सक्ती कुणीही स्त्री स्वतःवर करू शकत नाही. तो नैसर्गिकपणे जेव्हा यायचा असेल तेव्हाच येणार. मात्र काही त्रास इतके अनावर होतात की शरीरावर सक्ती करावी लागते. अशा दोन महत्त्वाच्या अवस्था आपण पाहू.
पाळी जाताना वेदनामय आणि अतिरिक्त रक्तस्त्राव होणे: हा त्रास जवळपास पन्नास ते साठ टक्के महिलांना भोगावा लागतो. पंधरा ते वीस दिवस तर कधी महिनाभर अत्यंत तीव्र वेदना होऊन सतत भयंकर रक्तस्त्राव होत राहतो. कितीही वेळा सॅनिटरी पॅड बदलले तरी कमीच पडतात. स्त्री थकून जाते. मानसिकदृष्ट्या खचून जाते. या सततच्या त्रासामुळे ती कुठे जाऊ शकत नाही. रोजची कामे तिला करणे अशक्य होऊन बसते. डॉक्टरकडे जाऊन चेक अप केले तर वरकरणी सर्व काही ठीक असते. ना गर्भाशयात गाठी असतात, ना इतर काही समस्या… मात्र हा रक्तस्त्राव नेमका कधी थांबेल हे डॉक्टरांनासुद्धा सांगता येत नाही. हॉर्मोन्सच्या गोळ्या घेऊन हा रक्तस्त्राव तात्पुरता थांबवता येतो, मात्र पुन्हा पुढच्या महिन्यात तो तितक्याच जोमाने हजर होतो. स्त्री पूर्णपणे कंटाळून गेली की डॉक्टर शेवटचा उपाय सुचवतात. तो म्हणजे hysterectomy. म्हणजेच गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया. अशा प्रकारे स्त्री अतिरिक्त रक्तस्त्राव आणि वेदनांपासून स्वतःची सुटका करून घेते. गर्भाशय नाही, त्यामुळे पाळी येणे सुद्धा नाही. अनेकदा या शस्त्रक्रियेत गर्भाशय आणि अंडाशय सर्वच काढून टाकले जाते. यालाच सक्तीचा menopause म्हणतात.
गर्भाशयात गाठी येणे: हा त्रास फक्त मेनॉपौजच्याच काळात होऊ शकतो असे नाही. अगदी तरुण वयातही हा त्रास अचानकपणे उद्भवू शकतो. PCOD चा त्रास प्रमाणाबाहेर वाढला आणि हार्मोनल इमब्लॅन्स जास्त स्वरूपाचे असतील तर हळूहळू गर्भाशयात लहान आकाराच्या गाठी तयार होऊ लागतात. एक मिलिमीटर ते सात आठ सेंटिमीटर अशा कितीही आकाराच्या या गाठी असू शकतात. कधी वेदना होतात तर कधी होत नाहीत. जेव्हा वेदना होतात तेव्हा एखादी लहानशी गाठ असेल तरी लगेच समजते. मात्र जर वेदना झाल्या नाहीत तर बऱ्याच काळाने कधीतरी पाळीच्या समस्येच्या निमित्ताने सोनोग्राफी करण्यात येते आणि गर्भाशयात लहान आकाराच्या अनेक गाठी दिसून येतात किंवा एकच भलीमोठी गाठ दिसते. असे झाले की औषधांचा परिणाम होत नाही. सर्जरी करून गाठ काढून टाकावी तर ती एकच नसते, किंवा एकच असली तर भलीमोठी असते. त्यामुळे फक्त गाठ काढून टाकण्याचा पर्याय राहत नाही. आणि नाईलाजाने वय कितीही कमी असेल तरीही पूर्ण गर्भाशय काढून टाकावे लागते. मी अशी कमीतकमी वयाची म्हणजेच ३३ वर्षांची स्त्री पाहिली आहे…
सर्जरी करून गर्भाशय काढून टाकले की मासिक पाळी आपोआप थांबते. काही काळ तरी स्त्रियांना वाटते की त्यांची सुटका झाली आहे वेदनेतून. काही अंशी हे खरे असते! कारण सततच्या रक्तस्त्राव सहन करून स्त्री फारच कमजोर होते. म्हणूनच hysterectomy. स्त्रियांसाठी हे एकप्रकारचे वरदान आहे असे काही डॉक्टरांकडून भासवले जाते. मात्र हे खरंच असे आहे का?
खरंच या सर्जरीचे काहीच दुष्परिणाम नाहीत का?
पाहूया पुढच्या भागात.
Till then stay healthy, be happy
दीप्ती काबाडे
आहारतज्ञ