निसर्गराजा…ऐक ना जरा
'ऐक ना जरा' म्हटल्यावर, एक भुवई वर करून बघू नकोस माझ्याकडे. परिस्थिती अगदीच हाताबाहेर चालली आहे, कल्पना आहे मला आणि आता यापुढे सहन करणं तुलाही शक्य नाही हे ही माहित आहे मला. मला अगदी १००% मान्य आहे. नाही नाही १०००% मान्य आहे की, चूक माणसाचीच आहे. माणसाने खूप म्हणजे खूपच त्रास दिला आहे तुला. फक्त त्याच्याच फायद्यासाठी. फायदा ज्यांचा झाला आहे, त्यांचा भरमसाठ झाला आहे आणि बाकी आम्ही सामान्य जनता मात्र त्यांच्या चुकीची शिक्षा भोगत आहोत. मुळात कोणाच्याही फायद्यासाठी तुझ्यावर अत्याचार करणं पूर्णपणे चुकीचंच आहे. हे म्हणजे सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीच्या गोष्टीसारखं चाललंय. पटतंय की तू तरी किती सहन करशील! आणि शिक्षाही काही फक्त त्या ठराविक लोकांनाच देऊ शकणार नाहीस. मग काय, भोगतोय सगळे त्यांच्या कर्माची फळं. त्यावर काही इलाजही नाही ना रे!
मला आठवतोय कोकणचा तो समुद्र किनारा.. एकदम शांत, फारशी वर्दळ नसलेला. त्या किनाऱ्यावर माहितेय, सुरुच्या झाडांना हॅमॉक बांधले होते. त्यावर शांतपणे झुलत पुस्तक वाचायला किती मजा आली होती. हे वाचून हसू नकोस. माहितेय मला वेडी म्हणत असशील. पण असू दे; आहे मी वेडी. बरं ते जाऊ दे, मी काय सांगत होते ते बाजूलाच पडलं. तर तो माझा आवडता किनारा. एकदोनदा गेले तेव्हा जसा पहिल्यांदा होता तसाच होतास. पण नंतरच्या खेपी मात्र एकदम अनोळखी, भकास, जरा घाबरल्यासारखा वाटायला लागलास. तेवढा तर बदलणारच ना.. चक्रीवादळ जे येऊन गेलं होतं. काय हाहा:कार माजला असेल रे तिथं! तुला तर माहीत असणारंच की, प्रत्यक्ष तिथेच तर होतास. तेव्हाच्या बातम्या वाचून, घटना ऐकून मन फार कोलमडलं होतं रे. अजूनही आठवणींचं सावट पसरलं की अंगावर काटा येतो. तुला प्रत्यक्ष इतकं रागावलेलं पाहिलं नसलं तरी तिकडची दृश्य पाहून तुझ्या रागाची भीती वाटायला लागली होती मला. निष्पाप लोकांचं किती नुकसान झालं तिथं. अक्षरशः काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. कित्येक वर्षं कष्ट करुन उभ्या केलेल्या बागा क्षणात भुईसपाट झाल्या होत्या. हाताशी आलेलं लेकरु काही कारणाने अचानक देवाघरी गेल्यावर काय अवस्था होत असेल; तशीच तेव्हाही झाली असणार. माणूस चिवट आहे म्हणतोयस ते खरं आहे रे. कष्ट करुन, पैसा-घरदार परत उभं करेलही. पण या संकटात गेलेल्या जीवांचं काय? ते तर कोणी परत देऊ शकणार नाहीत ना! आणि सगळं परत उभं करायचा प्रयत्न एकदा करेन, दोनदा करेन. पण सारखंच जर नुकसान व्हायला लागलं तर तो तरी किती करणार असं आहेच की. पण एक सांगू? तुझ्या रागापायी जे नुकसान होतंय ते बघून कितीही वाईट वाटलं ना, तरी तुझा राग मात्र येत नाही हा अजिबात. तू तुझ्या जागी एकदम बरोबरच आहेस. माणसानं हे जरी भोगलं ना तरी तो शहाणा कधी होणार नाही. तुला त्रास द्यायचे नवीन मार्ग शोधतच राहणार. मग अशावेळी वाटायला लागतं की, का हे प्रगतीचं खुळ माणसाच्या डोक्यात शिरलं? पूर्वीचा काळ किती सुखाचा असेल ना! आदिमानवाच्या काळातला तर भारीच. खूप सुखात होतास ना तू तेव्हा? प्रगती, पैसा, हाव यासारख्या गोष्टींनी सगळी वाट लावली आहे किती आणि कोणाकोणाकडून जखमा झेलल्या असशील रे तू! हे सगळं लिहून त्या जखमांवरच्या खपल्या तर काढत नाहीये ना मी? पण काय करु मी तरी…दोन्हीकडून वाईट वाटतं मला.
आमच्या भागातच बघ ना…पाऊस नाही, पाऊस नाही म्हणायचो तर आता इतका पडायला लागलाय की, आता मनात पूरची भीती कायमची बसली आहे. पाऊस एन्जॉय करण्यापेक्षा लोकांची नजर आता कायम नदीची पातळी किती वाढत चालली आहे यावरच असते. कल्पनेपलीकडचं नुकसान होतंय रे लोकांचं. आर्थिक तर प्रचंड आहेच, पण सगळा परिसरही मूळचं सौंदर्य हरवून बसतो. हिंदी सिनेमातल्या मेकअप करणाऱ्या नट्यांना बिना मेकअपचं पाहिल्यावर कसं वाटेल, तो परिसर पाहून तसं वाटतं रे. मे महिन्यात गुलमोहोर, बहावा, जॅकरांडाच्या सौंदर्याने मिरवणारी झाडं; पावसाळ्यात पूर ओसरल्यानंतर प्लास्टिक आणि इतर केरकचरा यांचं ओझं बाळगताना अगदीच केविलवाणी दिसतात. पाहवत नाही तेव्हाचं ते रुप. पण काहीही झालं तरी काळ आपला त्याच्या गतीने पुढं पळतच असतो. त्याच्या गतीशी जुळवून घेत माणसालाही पळावं लागतच. संकटातून उभं राहत आयुष्याचं रहाटगाडगं फिरवायला तर हवंच. असो…
पत्र वाचून तुझ्याबद्दल तक्रार करत आहे असं कदाचित वाटेल तुला. पण तसं बिलकुल नाहीये रे. तू कितीही कोपलास तरी मी तुझ्या बाजूनेच असणार कायम. होतो मानसिक त्रास, पण त्याला काही इलाज नाही. जोवर 'आपणच सर्वश्रेष्ठ' ही माणसाच्या मनातली भावना जात नाही तोवर हे चालणारच. आता एवढीच इच्छा की, निदान पुढच्यानी तरी शहाणं व्हावं. मी काही तुला शांत हो सांगायला हे पत्र लिहिलं नाहीये. कारण मला माहितेय, माझ्या सांगण्याने तू शांत होणार नाहीस नि लोकंही सुधारणार नाहीत. पण कसं झालंय ना, सोड्याच्या बाटलीचं झाकण उघडल्यावर कसा फटकन गॅस बाहेर येतो की नाही तसं माझ्या मनाचं झालंय. जराशी फट सापडल्यावर साचलेलं मोकळं करायला बघतंय. अजून किती काय काय बोलायचंय तुझ्याशी, म्हणूनच तुला ऐक ना जरा म्हटलं रे…बास बाकी नाही.
तुझ्यातच देव पाहणारी मी….
जस्मिन जोगळेकर.