प्रिय….

युवा विवेक    11-Jan-2023
Total Views |

Dear...
मला ना कधी कधी आश्चर्य वाटतं…आपलं आयुष्य त्याच्या त्याच्या मार्गाने जात असतं. कधी त्यात काटेकुटे, खाचखळगे असतात, कधी हिरवळ असते तर कधी नुसतंच मृगजळ. अशा आयुष्यात अवचित जादू घडते आणि आयुष्याचा मार्ग जरी बदलला नाही तरी तोच मार्ग अचानक वेगळा भासू लागतो. मृगजळाच्या मागे धावता धावता इंद्रधनुचे रंग घेऊन कधी चालायला लागतो कळतही नाही आपल्याला. माझ्या बाबतीत झालंय बघ असं. पाल्यापाचोळ्यावरून पाय ओढत चालत असताना अचानकच रिमझिम सरींनी भिजवून टाकलं रे मला. असं कधी झालंय माहितेय? जेव्हा तू माझ्या आयुष्यात पाऊल टाकलंस. हे सगळं वाचून कदाचित वाटेल तुला की, आज हिला झालंय तरी काय? पण खरंच सांगते, तू माझ्या आयुष्यात आलास आणि हे आयुष्य रंगीबेरंगी होऊन गेलं. माझ्या एरवीच्या पत्रांपेक्षा हे पत्र वेगळं वाटतंय ना तुला? आहेच रे वेगळं… सध्या भलेही आपण एकमेकांपासून लांब असलो तरी तू माझ्या आसपास आहेस, तुझी सोबत कायम आहे या जाणिवेनेच माझ्या आयुष्यात किती बदल घडवून आणलाय माहितेय तुला?
तू माझ्या आयुष्यात आलास म्हणून वरवर पाहता तसा काहीच बदल झाला नाहीये. म्हणजे माझं रोजचं रुटीन तसंच चालू आहे. पण माझं मन… ते मात्र हल्लीच्या भाषेत म्हणतात तसं गार्डन गार्डन किंवा उडू उडू झालंय अगदी. तू भेटायच्या आधी ते काही अगदीच मरगळून गेलं होतं असं म्हणता येणार नाही. पण तेव्हा तिथला ऋतू वेगळा होता रे. त्या वेळी पाचोळ्यावरून चालत असले तरी त्या शिशिराच्या पानगळीतही एक वेगळं सौंदर्य होतं. मात्र आता माझ्या मनातल्या तुझ्या अस्तित्वाने त्या शिशिराच्या जागी वसंत कसा पटकन फुलून आलाय बघ. नव्हत्याचं होतं झालंय…'जैसे फिल्मो में होता है।' सगळीकडे नुसती लाल, पिवळी, जांभळी फुलं रंगांची बरसात करायला लागली आहेत. बघावं तिकडे नुसती हिरवळच हिरवळ आणि सोबत पक्ष्यांचे मधुर कूजन! किती प्रसन्न वाटतंय सांगू! मला माहितेय…माझ्या मनातला हा वसंत आता इथून पुढं कायमच बहरलेला राहणार. ग्रीष्माचा वणवा इथं कधी पेटणारच नाही. हा वसंत असाच फुललेला ठेवशील ना? मी तरी विचारतेय काय तुला…ठेवशील याची खात्रीच आहे मला. बघ रोज रोज भेटत नसलो तरी माझी ही अवस्था. मग….
आपल्यावर मनापासून प्रेम करणारं, आपल्याला कायम जपणारं कोणी आपल्याला भेटलंय ही भावनाच किती ताकद देते माहितेय! एकदम परिपूर्ण वाटायला लागतं रे. इतकी कशी ही वेडी असं कदाचित म्हणत असशील तू मनातल्या मनात. पण खरंच सांगतेय. आता आयुष्याच्या सरळ मार्गाव
र सुखाचं, समाधानाचं, परिपूर्णतेचं एक वलय तयार होऊ पाहतंय, जे अगदी मनापासून हवं वाटतंय मला. ओळख झाल्यापासून किती कमी काळात एकमेकांत मिसळून गेलो ना आपण! आपण दोघं वेगळे आहोत असं वाटतंच नाही आता. फुलाच्या पाकळ्यांवरच्या त्या रंगाच्या छटा कशा एकमेकांत मिसळलेल्या कळत नाहीत…अगदी तस्सं झालंय आपलं. पाकळीवर रंग तर असतात दोन…पण तेच एकमेकांत मिसळून त्या फुलाची नजाकत वाढवतात. आपल्या नात्यातही जमेल का आपल्याला असं करायला? शरीर दोन असली तरी आपली मनं तर तशीच मिसळून गेली आहेत ना! मग मिळून आयुष्याची रंगत वाढवता येईलच की आपल्याला. काय वाटतंय तुला? जास्त कशाची अपेक्षा न करता साधं, सोपं आयुष्य जगायला लागलो तर नक्कीच जमेल हे आपल्याला. फक्त एकमेकांना एकमेकांची छान साथ हवी. बरोबर ना?
मी तरी अशी कशी…पत्र वाचून म्हणशील प्रेमपत्रावरुन तत्त्वज्ञानावर घसरायला लागलंय पत्र. म्हणून वेळीच थांबलेलं बरं बाबा. बाकी तू मजेत ना? तुझ्या मनातली हिरवळही जप रे नीट. वेळच्यावेळी पाणी घालत जा तिला. म्हणजे प्रेमानं पत्र लिहीत जा मला असं म्हणतेय मी. बरं…बास करते आता. काळजी घे. वसंताची मजा लुटायला भेटू लवकरच.
फक्त तुझीच…
-
जस्मिन जोगळेकर