उच्च रक्तदाब आणि आहार

युवा विवेक    14-Jan-2023
Total Views |

high blood pressure and diet 
 
नमस्कार मित्रांनो, कसे आहात. मागच्या वेळी मान्य केल्याप्रमाणे आज पुन्हा एकदा एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्यासमोर आले आहे. तो विषय म्हणजे उच्च रक्तदाब आणि आहार यांचा एकमेकांशी असलेला संबंध.
सामान्यपणे पाहिले तर उच्च रक्तदाब होण्याची अनेक कारणे आहेत. कामाशी निगडित किंवा इतर, कौटुंबिक वगैरे तणाव, फार विचार करण्याची वृत्ती, रागीट स्वभाव ही काही महत्त्वाची कारणे आहेत. तसेच अतिजाड असणे, चुकीचा आहार, ही शारीरिक कारणे सुद्धा आहेत.
आहाराबद्दल माहिती घेण्याआधी आपण पाहू की रक्तदाब म्हणजे नक्की काय आणि त्याला वर दिलेली कारणे कशी कारणीभूत ठरतात.
1. मानसिक कारणे: अतिविचार करण्याची वृत्ती असो किंवा रागीट स्वभाव असो, ही दोन्हीही रक्तदाबाची मानसिक कारणे आहेत. खूप राग येतो तेव्हा हृदयाची धडधड अचानकपणे खूप वाढते. त्या वाढलेल्या हालचालींमुळे धमन्यांमधील रक्त जास्त दाबाने वाहू लागते. परिणामी काही काळापुरता रक्ताचा दाब वाढतो. यालाच उच्च रक्तदाब म्हणतात. ही अवस्था शक्यतो फार काळ टिकत नाही. परंतु व्यक्तीचा स्वभाव सतत संतापण्याचा किंवा चिडचिड करत राहण्याचा असेल तर मात्र रक्तदाबाचा त्रास कायमस्वरूपी रूप घेऊ शकतो.
2. अती जाडपणा किंवा जास्त वजन: शरीरात अतिरिक्त फॅट्स चा साठा असेल तर त्या साठ्याचा दबाव रक्तवाहिन्यांवर पडत असतो. या बाह्य दबावामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंती आतल्या दिशेने ढकलल्या जातात आणि परिणामी रक्तवाहिन्यांचा आकार लहान होतो. यामुळे रक्त अती दाबाने वाहू लागते. त्यामुळे उच्च रक्तदाब तयार होतो.
3. चुकीचा आहार: खूप जास्त प्रमाणात फॅट्स असणारे पदार्थ सतत सेवन केल्यास शरीरात LDL म्हणजेच low density cholesterol वाढते. हे वाईट प्रकारचे कोलेस्टेरॉल असते. कारण ते रक्तासोबत न वाहता रक्तवाहिन्यांच्या भिंतीला आतून चिकटून राहते. कालांतराने अशा कोलेस्टेरॉल चा थर रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर तयार होतो आणि त्यांचा व्यास कमी होत जातो. त्यामुळे रक्त वाहण्यास कमी जागा प्राप्त झाल्याने रक्ताचा दाब वाढतो. तसेच आहारात सोडियम चे प्रमाण जास्त असल्यास (म्हणजे मीठ जास्त असल्यास) सुद्धा उच्च रक्तदाब होतो.
ही झाली उच्च रक्तदाबाची काही महत्त्वाची कारणे. आता पाहू की उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आहाराची काळजी कशी घ्यावी.
1. सर्वात आधी जर वजन फार वाढलेले असेल तर ते योग्य पद्धतीने कमी करावे.
2. आहारात मिठाचे प्रमाण गरजे इतकेच राखावे. पदार्थांवर बाहेरून अतिरिक्त मीठ फवारून खाणे, खारट पदार्थ खाणे सोडून द्यावे.
3. पोटॅशियम ची मात्रा आहारात चांगली ठेवावी. केळ्या मध्ये पोटॅशियम ची मात्रा चांगली असते.
4. जंक फूड, फास्ट फूड, अती तेलकट, तुपकट पदार्थ खाणे थांबवावे. कोलेस्टेरॉल वाढलेले असल्यास योग्य ती औषधे घेऊन किंवा चांगला डाएट घेऊन ते प्रमाण कमी करावे.
5. रोज किमान दोन ते अडीच लिटर पाणी प्यावे. विशेषतः अंघोळीला जाण्याआधी एक ग्लास पाणी पिऊन जावे आणि अंघोळी नंतर एक ग्लास पाणी प्यावे.
याव्यतिरक्त तणाव आणि चिडचिड कमी करण्यासाठी mediation, योगासने करावीत.
पुढच्या वेळी भेटू अशाच आणखी एका विषयासह.
Till then stay healthy be happy.
दीप्ती काबाडे,
आहारतज्ञ