'संगीत देवबाभळी'

युवा लेख

युवा विवेक    30-Oct-2023   
Total Views |

'संगीत देवबाभळी'

गेले अनेक महिने 'संगीत देवबाभळी' हे नाटक बघायचं आहे आणि योग जुळून येत नाहीये यांची खंत मनात होती! पण दसाऱ्या सारखा साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्ताच्या दिवशी योग जुळून आला किंवा कदाचित आणला गेला. खूप सुंदर नाटक आहे असं ऐकलं होतं, त्यांचं मतात परिवर्तन कसं झालं याबद्दलच -

पडदा उघडल्यापासून ते अगदी घरी परत येईपर्यंत अनेक वेगवेगळे विचार सारखे दहा बाजूंनी डोकावत होते, काही सामाजिक होते काही वैचारिक!

एखादा प्रसंग तुकोबांच्या काळातला असून सुद्धा, विवाहित स्त्रियांच्या आयुष्यातला असून सुद्धा आमच्या डोळ्यात पाणी आणतो यापाठी नाटकातल्या कलाकारांचे कष्ट आणि निष्ठा तर आहेच पण त्याचसोबत आपलं माणूस आपलंच आणि आपल्यासोबत रहावं ही प्रत्येक स्त्रीमनाची इच्छा आणि प्रत्येक स्त्रीला सत्याची असलेली जाणीव हे सुद्धा कारणीभूत आहेत.

गेल्या काही काळात स्त्री च्या जन्माविषयी, आयुष्याविषयी बोलणारं खूप काही पाहण्यात , वाचण्यात आलं होतं!

पण देवबाभळी प्रत्येक स्त्री ज्या दुःखामुळे जीवनप्रवासाच्या एकाच नावेत येऊन बसते त्या दुःखा बद्दल, तिच्या मनाबद्दल, प्रेम, राग, द्वेष या भावनांबद्दल सांगून गेलं. आज नाही पटत नको पटू दे च्या काळात "माणूस विसरून जाईल इतका पण अबोला बरा नाही" याची जाणीव करून गेलं. सतत पुढे जायचंय, काहीतरी करायचं आहे, सांभाळायचं आहे, ठरवायचं आहे - अशा स्वतः कडून आलेल्या अपेक्षांनी तापलेल्या आयुष्यात "एखादी भाकर करपून गेली करुपू देत" असं म्हणत थंडगार वाऱ्याचा स्पर्श देऊन गेलं. एखाद्यावर अवलंबून राहत, मनाजोगं घडलं नाही म्हणून रडण्या पेक्षा आपणच आपलं आभाळ बांधून हक्काचं पाऊस होता आलं पाहिजे असं reality check च म्हणता येतील देऊन गेलं!

रंगमंचावर अदृश्यपणे आपल्यासमोर असणारे विठोबा, तुकोबा, प्रकाशयोजना, संगीत, इंद्रायणी, घोंगडी, चूल असं सारं काही सतत काही ना काही अप्रत्यक्षपणे सांगत असतात आणि आपणही ते सारं काही नकळत ऐकत असतो. आणि प्रत्यक्ष आपल्या समोर असणाऱ्या आवली बाई आणि रखुमाई तर आपल्याला निशब्द करून सोडतात. आवली बाईंच्या स्पष्ट वक्तेपणाचा एका वेळी मला फार हेवा वाटला, आणि आपल्याही सोबत रखुमाई येऊन रहावी, चार गोष्टींची आपल्यात चर्चा व्हावी असंही वाटून गेलं, इतका त्या दोघींचा एकमेकांसोबत असलेला रंगमंचावरील सहवास सुंदर आहे!

आपली दुःखं लोकांना समजतील इतकी स्पष्ट नसतातच मुळी,

आणि आपल्या माणसांनाही आपल्या मनाला रुतलेल्या काट्याची जखम किती खोल आहे, त्याची वेदना कितपत होत आहे याची जाणीव नसते म्हणूनच आपल्या जखमेवर आपल्याच पदराची चिंधी लावावी लागते हे रखुमाई जेव्हा म्हणतात तेव्हा आई गं म्हंटल्या शिवाय राहवत नाही पण त्याचबरोबर मनातल्या मनात खरं आहे हे असं जाणवल्या शिवाय राहत नाही! नाटकाच्या शेवटी आणखी एक गोष्ट जाणवली. जगताना सतत येणाऱ्या सुखदुःखाचा, गैरसमजांचा, वादांचा, भावनांचा फेरा अगदी देवालाही सुटलेला नाही म्हणजे देवातही माणूसपण आहे आणि आपल्यातल्या अनेकांना हे कोडे काही अंशी का होईना सुटलेले आहे म्हणजे माणसातही देवत्व आहेच!

लवकरच हे कलाकारांच्या पाया पडायला लावणारे नाटक रसिकांचा निरोप घेत आहे! प्पण मला वाटतं की या नाटकाची संहिता तरी प्रत्येकाने वाचायला हवी. प्राजक्त देशमुख यांनी सामान्य माणसाला दैवी अनुभव देणारं असं काहीतरी आपल्या साऱ्यांच्या समोर मांडलं आहे.

शेवटी काय ' जरतरच्या भुवया सैल सोड ' असं अलगद सांगून गेलेल्या अनुभवाने अनेक रुतलेले काटे काढून जखमा बऱ्या केलेल्या असल्या तरी संगीत देवबाभळीचा काटा मात्र कायम वेगवेगळ्या जाणीवा करून देत राहील!

- मैत्रेयी सुंकले