पाचवे आणि शेवटचे सत्र हे गीतसंध्या. यामध्ये ज्येष्ठ गायिका कीर्ती मराठे आणि सहकारी यांनी गीत सादरीकरण केले. या सत्राचे अध्यक्षपद शिरीष करंदीकर यांनी भूषवले.
युवाविवेक आणि काव्यशिल्प, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय काव्यविवेक काव्य महोत्सव २०२३ मधील दुसऱ्या दिवसाची सुरुवात निमंत्रित युवा कविसंमेलनाने झाली. यात सामाजिक,धार्मिक, मानवी भावनांवर आधारित विभिन्न विषयांवर युवाकवींनी काव्य सादर केले, या सत्रासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभिजित सोनवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या ओघवत्या शैलीत मान्यवरांनी मानवी जीवनात गरजेच्या असणाऱ्या विविध संकल्पनांची मांडणी आपल्या बीजभाषणात केली . यानंतरच्या सत्रात कविता सादरीकरण एक शैली या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य, प्रसिद्ध हास्य कवी बंडा जोशी,आणि ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद जोशी उपस्थित होते. या सत्रात सादरीकरण करताना काय लक्षात घेतल पाहिजे यावर बोलताना, इतरांच्या कविता किंवा साहित्य पाहून आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपल्याला आपल्या साहित्यात सुधारणा करायची असेल तर काय करता येईल याचे चिंतन केलं पाहिजे असे मत बंडा जोशी यांनी मांडले. तर कार्यक्रमात जाताना आपण कुठे जातोय श्रोता वर्ग कोण आहे याचा विचार करून त्यास्वरुपात आपल्या कविता जवळ ठेवाव्यात आणि तसे सादरीकरण करावं. परिस्तिथीनुरुप जेव्हा आपण अंतर्मनातून आलेल्या प्रेरणेतून कवितांची निवड करतो तेव्हा ते उत्तम होत असे मिलिंद जोशी म्हणाले. तर यावर बोलताना पद्मताई गोळे, इंदिरा संत आणि संजीवनी या कवियत्रिंचा उल्लेख करून सादरीकरण करताना त्या कवीनुरुप कवितेतील आशय प्रतीके, प्रतिमा यामुळे त्या कवितेचा आत्मा हा जागृत असतो. सादरीकरण करताना आपली कविता, कविता आहे की नाही याचा आधी प्रामुख्याने विचार करावा असा विचार माधवी वैद्य यांनी मांडला. कविता आणि समीक्षा या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ विचारवंत भानू काळे, समीक्षक आणि प्रसिद्ध कवियत्री डॉ.नीलिमा गुंडी आणि प्राध्यापिका डॉ.रुपाली शिंदे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. ललित साहित्याच्या एक प्रकार म्हणजे कविता.आपल्या मधिल भावना आणि कल्पनाशक्तीचा विकास हा कवितेच्या माध्यमातून होत असतो.कविता रचताना त्यातील भाषा, त्यातील प्रतिक ही महत्वाची असतात. आदिमानवापासून ते आताच्या मानवाच्या टप्प्यातील कवीतेचा प्रवास रुपाली शिंदेंनी मांडला. कवितेला त्यांच्या योग्यते प्रमाणे समीक्षक मिळाला पाहिजे हे सांगताना डॉ.नीलिमा गुंडी यांनी बालकवींच्या कवितेची समीक्षा गोड, गोंधळाची भिरभिरणारी मुलगी म्हणून केली जाते असे संबोधले. भाषेला एक वजन आहे आणि ते राखले गेले पाहिजे ते समीक्षेच्या रूपाने. कविता आणि समीक्षा हे हातात हात घालून राहिले पाहिजे. भाष्य काव्य म्हणजे देखील समिक्षाच आहे. उदा गीतेवरीलसमीक्षा म्हणजे ज्ञानेश्वरी होय, असे विचार नीलिमा गुंडीनी मांडले.
या सत्राचे अध्यक्ष भानू काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात
समिक्षेने खरोखरच मराठी कवितेला वेगळी दिशा दिली आहे का?, वृत्तबद्ध कवितेचे महत्त्व, कवितेची व्याख्या, कवितेने मांडलेला शाश्वत विचार, मंचीय कविता
हे पाच मुद्दे मांडले. दहाव्या सत्रामध्ये खुल्या कविसंमेलनाचा दुसरा भाग संपन्न झाला यात अबालवृद्ध सहभागी झाले होते. यानंतर शेवटचे समारोपाचे सत्र झाले. या सत्राचे अध्यक्षपद नीलिमा गुंडी यांनी केले.