रडणं हा कमकुवतपणा?

युवा विवेक    03-Feb-2023
Total Views |

Is crying a weakness? 
 
रडणं हा कमकुवतपणा? छे, अजिबात नाही
ती ना रडूबाईच आहे, तो ना रड्याच आहे जरा मनाविरूद्ध झालं, कोणी काही बोललं की लगेच याचे डोळे भरतात असं किती सहजपणे आपण एखाद्याला लेबल लावून मोकळं होतो. मानवी भावभावनांमध्ये हसणं, रुसणं, आनंदित होणं, क्रोधित होणं अशा अनेक क्रिया-प्रतिक्रियात्मक कृतींचा समावेश असतो. पण रडण्याला आपण उगीचच तराजूच्या नकारात्मक तागडीत टाकून दिलंय. काहीजण म्हणतात की रडणं हे माणसासाठी वाईट आहे, तो त्याचा कमकुवतपणा आहे. खरं तर असं अजिबात नाही. उलट ते मनावर फुंकर घालणारं, भावनांना वाट करून देणारं एक माध्यमच आहे म्हणा ना. पण आपण रडतो म्हणजे नेमकं काय होतं? कोणती कृती होते? जाणून घेऊया.
आयुष्यात एकदाही रडला नाही, असा माणूस आपल्याला भेटणं शक्यच नाही. अहो आपला जन्मच मुळी रडता रडता होतो. हा एकच क्षण असा असतो जेव्हा आपण रडत असतो आणि बाकीचे आनंदाने हसत असतात. अगदी आपली आईही. म्हणजे हे रडणंही आनंदाला कारकच असतं अशा वेळी. पण मूल जर रडलं नाही, तर मात्र नक्कीच सगळ्यांना घाबरवणारी स्थिती निर्माण होते. पुढे आपण कधी ना कधी, कुठे ना कुठे रडलेलो असतोच. कधी हमसून हमसून, कधी ओक्साबोक्शी, कधी निव्वळ उसासत, कधी टाहो फोडत, कधी क्रोधित होत, कधी नैराश्याने, कधी हतबलतेने, तर कधी निव्वळ एखाद्या सिनेमा नाटकाच्या प्रभावाने अश्रूपात होण्याच्या माध्यमातून आपण हा रडण्याचा अनुभव घेतलेला असतो. रडणं ही माणसाने वेगवेगळ्या वेळेस, प्रसंगी दिलेली अगदी स्वाभाविक, नैसर्गिक प्रतिक्रिया असते.
काहीवेळा इन्फेक्शनमुळे, वातावरणीय बदलामुळेही आपले डोळे पाणावतात. म्हणजे हे परिस्थितीजन्य शारिरीक कृतीच्या स्वरुपात घडतं. हे आवश्यक असतं ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी. त्यातही ओलावा टिकून राहण्यासाठी, डोळे स्वच्छ राहण्यासाठी. काही वेळा मात्र भावनिक उलथापालथीच्या प्रसंगी आपण रडतो. संशोधकांच्या मते अशा वेळेस आपण रडतो तेव्हा एन्डॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन नामक संप्रेरकं स्रवू लागतात. शारिरीक आणि मानसिक वेदनांमध्ये ही संप्रेरकं फुंकर घालण्याचं काम करतात. मनावरील ताण कमी करतात, भावना मोकळ्या करतात. आठवून बघा, एखाद्या कठीण स्थितीत डोळ्यातून वाहून जाणारे अश्रू आपलं मन शांतवून गेले आहेत. मला आठवतं, माझे वडील आजारी होते तेव्हा पंधरा दिवस मी प्रचंड तणावात होते. ते वारले तेव्हाही बरीच धावपळ झाली. मला दुःख व्यक्त करायला वेळही मिळालेला नव्हता. एका हळव्या क्षणी माझे डोळे घळाघळा वाहू लागले आणि इतक्या दिवसांच्या ताणातून मी मुक्त झाल्याचा अनुभव मला आला. हे असंच काहींच्या बाबतीत परीक्षेच्या निकालाबाबतही होतं.
पाश्चात्त्य साहित्यशास्त्रात कॅथार्सिस नावाची एक सुंदर संकल्पना आहे. रंगमंचावरचा एखादा प्रसंग पाहून, एखाद्या साहित्यकृतीतला एखादा प्रसंग वाचून आपल्याही नकळत आपले डोळे झरू लागतात. त्यातील नायकाच्या आयुष्यातील संकट पाहून, उद्भवलेली भीषणता पाहून आपल्या भावनांचं विरेचन होतं. रडण्यातूनही नेमकं हेच साधतं. एखाद्या कलाकृतीच्या दर्शनाने आपले डोळे पाझरू लागतात तेव्हा आपल्या मनातील भावनांचं विरेचन होतं किंवा आपल्या भावनांच्या आंदोलनाचं संतुलनही होतं. काहीवेळा आनंददायी प्रसंग पाहतानाही आपल्याला रडू येतं व त्या आनंददायी प्रसंगाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोनही संतुलित होतो.
रडून काय होणारे? अत्यंत स्वाभाविक असा हा प्रश्न आहे. मित्रांनो रडल्यामुळे खूप काही होऊ शकतं बरं का. रडण्याने शरिराचं डिटॉक्सिफिकेशन होतं म्हणजे शरिरातील विषारी द्रव्य बाहेर फेकली जातात. रडण्याने मूड सुधारतो. रडण्याने पॅरासीम्पथेटिक नर्व्हस सीस्टिम सुधारते, त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होते व शांत वाटतं. म्हणजे भावनिक आंदोलनांमुळे पचनावर परिणाम झाला असेल, पोट अशांत असेल तर रडल्यानंतर पचनही नीट होतं व पोटही शांत होतं. रडणं दुःख पचवण्यास मदत करतं, भावनांचं संतुलन होतं. तुमच्या रडण्यामुळे तुम्हाला आधाराची गरज असल्याची इतरांना जाणीव होते व भानविक कडेलोटाच्या क्षणी मदत मिळते. रडताना तुमचा मानसिक ताण डोळ्यांवाटे वाहून जातो. अनेकांना आपला राग अश्रूंद्वारे व्यक्त करण्याची सवय असते. अशावेळी रडण्यामुळे संताप कमी होतो व शांत मनस्थितीत व्यवस्थित विचार करण्याकडे आपण मार्गस्थ होतो. काहीवेळा एखाद्या दुखापतीच्या क्षणी रडल्यामुळे वेदना कमी होतात. बघा ना, लहान मुलं जखम झाल्यावर रडून कसं गाव गोळा करतात आणि नंतर शांतपणे खेळत बसलेली दिसतात. लहान मुलांना रडल्यामुळे श्वास घेण्यास मदत होते, उलट न रडणारी मुलं अनेकदा श्वास रोखून धरतात व अधिक आजारी पडतात. किती मोठी माणसे रडणं हा अपराध समजून ते टाळतात आणि नंतर त्यांना त्याचा खूप त्रास होतो. प्रिय व्यक्तीच्या विरहात अनेकदा अश्रू आपल्याला पाशातून मुक्त होण्यास मदत करतात. उलट, रडणं टाळणारे अनेकदा त्या भावनांमध्ये अधिक गुंतून पडतात.
हा लेख लिहिण्यामागचा हेतू हाच की रडण्याला, रडू येण्याच्या प्रवृत्तीला स्वतःचा कमीपणा समजू नये. आपल्या आरोग्यात याचा मोठा वाटा असतो. त्यामुळे उगीचच कोणालाही रडूबाई, रडक्या, रडतराव वगैरे म्हणण्याआधी त्याची कारणमीमांसा समजून घेणं आवश्यक असतं. कदाचित ती व्यक्ती मदतीच्या प्रतीक्षेत असू शकते. कदाचित भावना मोकळ्या करण्याचा तो त्याचा मार्ग असावा. अशा वेळी त्याला त्याचा वेळ घेऊ देणं गरजेचं असतं. रडणं हे आपल्याला मदत करतं, दुःखमुक्त होण्याचा तो एक मार्ग असू असतो. त्यामुळे त्याची आवश्यकता समजून घेऊया आणि थोडंसं जबाबदारीने वागू या. तुमच्या,आमच्या, समाजाच्या स्वास्थ्यासाठी थोडं शहाणं होऊ या!