अंतापर्यंत

07 Feb 2023 15:46:01

अंतापर्यंत
कुणीही यावं नि ठेचाळून जावं
चार लाथा याच्या चार त्याच्या सदैवच खात पडावं
पडली बांधावरच्या बाभळीची पडलीच झिप्री सावली तर पडू द्यावं
नाहीतर ठरल्याप्रमाणे बिनदिक्कत उन्हात तळून घ्यावं
माळावरच्या दगडांनं हे असंच रणरणतं उन्ह पांघरून घ्यावं
पडणाऱ्या चार सिंतडल्या पाऊस थेंबात सालभराचं एकदाच न्हावं
हां‍ऽ‍ऽ‍ऽ..
पण,
असलाच एखाद नशीबवान तर
अलगद कुणी उचलावं नि
चार बोटं शेंदूर फासून म्हसोबा, मांगोबा म्हणून बाभळी खाली वसवावं
सटी, पूनवच्या निवदावर पुन्हा उन्हात तडकण्यासाठी बाभुळबनात निवांत पडावं
प्रश्न मनात यायला हवा..
उत्तर मिळेल तोवर धांडोळा घ्यायला हवा..
माळावरच्या दगडांन असच नेहमी जगावं का
जगाच्या अंतापर्यंत ?
-अमिता पेठे पैठणकर
Powered By Sangraha 9.0