ऑस्करची आस

युवा विवेक    20-Mar-2023   
Total Views |


ऑस्करची आस

फराह खान दिग्दर्शित ' ओम शांती ओम ' सिनेमात एक भावूक करणारा प्रसंग आहे. पुनर्जन्म झालेल्या नायकाच म्हणजे ओमप्रकाश मखिजाच फिल्मफेअर पुरस्कार मिळवण्याचे गतजन्मीच स्वप्न ह्या जन्मात पुर्ण होत आणि तो पुरस्कार स्वीकारताना अभावितपणे त्याच्या ओठी मनोगत येत की… "इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है... कि हर ज़र्रे ने मुझे तुमसे मिलाने की साज़िश की है। कहते हैं किसी चीज़ को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है।'

ह्यावर्षी पार पडलेल्या ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावणाऱ्या ब्रँडन फ्रेजरला पाहताना अनेकांना हा डायलॉग आठवला असेल.

त्यामागचं कारण देखिल तसच आहे. ममी ट्रायोलॉजी, जॉर्ज ऑफ जंगल अशा सिनेंमामुळे ब्रँडन एकेकाळी केवळ पाश्चिमात्य देशातच नव्हे तर भारतासारख्या पौर्वात्य देशात सुद्धा लोकप्रिय होता. इजिप्तच्या ममींशी झुंज देणारा त्याचा रांगडा, देखणा नायक त्याकाळी आबालवृद्धात तुफान लोकप्रिय झाला होता, इतका लोकप्रिय की त्या सिनेमाच्या यशवरून बनविण्यात आलेल्या अनेक व्हिडिओ गेम्समुळे तो घराघरात पोहोचला होता. पण मधला काळ त्याच्यासाठी दुस्वप्न म्हणावा असा होता. त्याच उध्वस्त झालेले कौटुंबिक आयुष्य, पत्नीशी झालेला घटस्फोट, लैंगिक शोषणाचे आरोप, पोटगीपायी द्यावे लागलेले पैसे, अशा अनेक कारणांमुळे तो शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा तिन्ही आघाड्यांवर खचत गेला. एकंदर कारकिर्दीची घसरण अशी सुरू झाली होती की मधली बरीच वर्षे अपवाद वगळता त्याला काम मिळणे बंद झाले होते. फ्रेझरला नाहक बदनाम करून अडगळीत टाकल जात आहे म्हणत त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याची पाठराखण देखील केली. ह्यातून तावून सुलाखून निघालेल्या ब्रॅण्डनच्या कारकिर्दीची डूबती नैय्या अखेर ऑस्कर विजयामुळे किनाऱ्याला लागली म्हणायला हरकत नाही. 'व्हेल' सिनेमातील स्थुलत्वाशी झुंज देणाऱ्या नायकाच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देत एकेडमीने अखेर त्याच ग्रहण संपवलं.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणाऱ्या मिशेल येवोची कथा पण फारशी वेगळी नव्हती. मूळची मलेशियन असलेली ही अभिनेत्री दि ममी प्रमाणेच एकेकाळी लोकप्रिय झालेल्या "क्राऊचींग टायगर हिडन ड्रॅगन" च्या यशामुळे पाश्चिमात्य जगताला ज्ञात झाली होती. आता तिच्या यशामुळे प्रथमच त्या श्रेणीत एक आशियाई चेहरा झळकला आहे.

असाच प्रत्यय सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणाऱ्या के हुय क्वानच्या निमित्ताने आला. १९८० साली एक बाल कलाकार आणि निर्वासित असण्याचा शिक्का माथ्यावर घेऊन ह्या क्षेत्रात आलेल्या के ला उशिराने का होईना आपल्या स्वप्नाची पूर्तता करता आली. त्याच सिनेमासाठी वयाच्या ६४ व्या वर्षी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणाऱ्या जेमी ली कर्टीसच्या भावना पण फारशा वेगळ्या नव्हत्या. तिच्या आई वडिलांना पण कोणे एकेकाळी ऑस्कर सोहळ्यात नामांकने मिळाली होती पण ते कधीच विजेते म्हणून त्या मंचावर येऊ शकले नाही. आपल्या पालकांचं हे अपुर राहिलेलं स्वप्न जेमीने पूर्ण केलं. ते करत असताना घराणेशाहीच अपत्य म्हणून सोसाव्या लागणाऱ्या टीकेचा सुध्दा तिने उल्लेख केला.

ह्या वर्षीचा ऑस्कर सोहळा खऱ्या अर्थाने गाजवला तो "एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल एट वन्स"ने आणि RRR मधल्या "नातू नातू" गाण्याने !!!

"नातू नातू"च्या निमित्ताने एम.एम.किरावानी आणि चंद्राबोस ह्या जोडीला ऑस्कर स्वीकारताना पाहून भारतीयांची मान पुन्हा एकदा उंचावली गेली. "जय हो" नंतर परत एकदा एक भारतीय गाणे त्या सोहळ्यात वाजल्याने खऱ्या अर्थाने "नाचो नाचो" म्हणण्याची वेळ आली आहे. तर डॉक्युमेंट्री फिल्म श्रेणीत "दि एलिफंट व्हीस्परर्स"ने बाजी मारल्याने भारतीय चित्रपटकर्त्यांच्या दर्जात्मक कामगिरीवर देखील शिक्कामोर्तब झाले आहे.

खरतर आपल्याकडे "ऑस्कर म्हणजेच सगळे काही नाही" अस मानणारा मोठा वर्ग आहे. रहमान किंवा किरमानी ह्यांची इतर अनेक गीते ऑस्कर विजेत्या गीतांपेक्षा सरस आहे त्यामुळे तोच उत्कृष्टतेचा मापदंड नसावा ह्या म्हणण्यात तथ्य देखील आहे. तथापि गेली ९५ वर्षे ऑस्कर सोहळ्याला जे वलय आणि मानाचे स्थान सिनेवर्तुळात आहे त्याच महत्व डावलून चालणार नाही. "श्वास सारखा सिनेमा ऑस्कर नामांकनास पात्र होऊ शकतो" ही साधी बातमी सुद्धा मराठी फिल्म इंडस्ट्रीला संजिवनी देऊन गेली होती. मराठी सिनेमा खडतर काळातून जात असताना प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे खेचून आणण्याचं काम ऑस्कर नामांकनाच्या केवळ शक्यतेने करून दाखवलं होत. त्यामुळे ह्यावर्षीचा ऑस्कर सोहळा अनेक अर्थाने प्रेरणादायी आहे. वर उल्लेखलेल्या सर्व कलावंतांनी आपली ऑस्कर विजयाची स्वप्नपूर्ती केली त्यामागे कित्येक वर्षांचे परिश्रम, स्ट्रगल, अवहेलना होती पण त्याही दुर्धर परिस्थितीत ऑस्कर त्यांना विजयाची आस दाखवत प्रेरणा देत राहिला. आज आपल्याकडे "बॉयकॉट बॉलिवूड" ट्रेण्ड चालू असताना अशा बिकट स्थितीत ऑस्करची आस बॉलिवूडला देखील आत्मपरीक्षण करायला भाग पाडू शकते. यावर्षीच्या विजेत्यांपासून बोध घेत आपल्या कलाकृतीचा दर्जा उंचावला तर निश्चितच बॉलिवूडवर दाटून आलेले नैराश्याचे मळभ नक्कीच दूर होईल हाच आशावाद याठिकाणी बाळगुया.

- सौरभ रत्नपारखी

- मोबाईल क्रमांक ९८८१७८३४७४