सायसुखाची व्याख्या

21 Mar 2023 10:00:00


सायसुखाची व्याख्या saaysukhachi vakhya

गच्च गूढ जरा नकोसा.. तरीही हवाहवासा पहाटेच्या अंधारातला उबदार गारवा रजई सोडायची नाही असे निक्षून सांगतो तरी कसलीशी ओढ ती सोडायला भाग पाडते...मी उठून चालू लागते, सूर्यकिरणे ज्या दिशेने येणार असावीत असे वाटते, हलकेच केशर उधळत असते त्या दिशेला.अणू-रेणूतुन चैतन्याभा पसरताना पाऊल टाकताना पावलागणिक मनाचं जडत्व पदर दर पदर हलकं होत, असल्याचा भास उभारी देतो मला चालण्याची...

आपण पूर्णतः शून्याची अनुभूती घेत असतो त्या क्षणाला

ते शून्य होणं किंवा अनुभवणं (थॉटलेस ब्रेन) म्हणू शकतो, आपण त्याला ही अवस्था न जाणो किती महिने पुरतील एवढी एनर्जी देणारे क्षण आसतात ते!

चार भिंतीतले,खूप गर्दीतले बरेच काही,अनेक फायलीतून वर डोकावणारे लाखो करोडो सार्थक काही निरर्थकही प्रश्न, आकडे,तितकेच शब्द, तितकीच डोक्यात विचारांची,कल्पनांची,स्वप्नांची अनेक सुरवंट कसल्याशा कोशात निपचित पडलेली असताना मनाच्या पडद्यावर उमटत जातात. नकोसे, काही हवेहवेसे मनाला उभारी देणारे,काही शून्यावस्थेतले अनेक न्यूट्रल चेहरे, कसलासा गदारोळ करत असतात... न जाणो कोणता बंड असतो तो? नि कुणा विरुद्धचा..? पण त्याकडे फारसं लक्ष न देता आपण आपल्याला काय हवं ते करावं हे प्रेमाने सांगणारी आतली 'ती' कायम सोबत करते!!

सायस्पर्शाने कायम डोकीवरून हात फिरवत आभाळखोलीची माया विनाअपेक्षा देत असते!!

'ती' नि तिच्यातली ''की माझ्यातली 'मी'..कोण कुणावर कुरघोडी करतं कुणास ठाऊक पण... जगण्याची तिने मांडलेली अनेक गृहितक,गणितं नि मी मांडलेले सिद्धांत कायम एकमेकांसमोर येऊन उभे ठाकलेले असतात प्रतिस्पर्ध्यासारखे!!

तर असं आहे हे!!

माझ्यातल्या 'ती'ची नि तिच्यातल्या 'माझी'

सायसुखाची व्याख्याच जरा वेगळीय!!

- अमिता पेठे पैठणकर

Powered By Sangraha 9.0