जीवन अनमोल आहे

युवा विवेक    24-Mar-2023   
Total Views |
जीवन अनमोल आहे
काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेने माझं मन आजही अस्वस्थ आहे. पिंपरीतील एका २७ वर्षीय तरुणाने ११व्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. ज्या वयात भरभरून जगायचं, त्याच वयात हे असं स्वतःचा प्राण संपवणं कसं काय जमत असेल, सुचत असेल या कल्पनेने मी बेचैन होते. गुरू ठाकूर म्हणतात, असे जगावे छाताडावर आयुष्याचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. इतकं निधड्या छातीने जगण्याची सवय असणं जिथे अपेक्षित तिथे असं का करत असतील तरूण?
गेल्या काही वर्षांत किशोरवयीन आणि तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं आहे. उपरोल्लेखित केसमध्ये विरेन जाधव या २७ वर्षीय आयटीमध्ये कार्यरत तरुणाने आत्महत्या केल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्याला नोकरी होती, पण मनासारखी नव्हती व पगार चांगला नव्हता. आर्थिक चणचण सहन करण्यात काय अर्थ आहे या भावनेतून विरेनने ११व्या मजल्यावरून उडी मारून स्वतःला संपवलं. याच घटनेच्या दोन दिवसांपूर्वी पुण्यातच एका तरुणाने पत्नी आणि आठ वर्षीय मुलीला मारून स्वतःला संपवलं. नोकरी सोडून व्यवसाय सुरू केल्यावर आपण त्यात अपयशी होत आहोत हे लक्षात आल्यावर त्याने हे पाऊल उचललं. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय व त्यात तरुणांचं प्रमाण जास्त आहे हे बातम्यांवरून समजतं.
मुळात आत्महत्या करण्याचा विचारच मनात का येत असावा. आत्महत्या किंवा सुसाईड या घटनेमागे मुळातच नैराश्य, तणावग्रस्त परिस्थिती, हतबलता, संकट, जगण्यात रस नसणे, व्यसनाधीनता, मानसिक आजार, प्रेमभंग अशा कोणत्यातरी प्रकारची पार्श्वभूमी असल्यामुळे त्याची विस्तृत किंवा सांगोपांग चर्चा केली जात नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आत्महत्या ही सर्वाधिक सामाजिक प्राधान्यक्रमावरील समस्या आहे. दरवर्षी साधारण सात लाख लोक आत्महत्या करतात. या व्यतिरिक्त आत्महत्येचा प्रयत्न विफल झालेले ही बहुसंख्य आहेत. जगभरातील ७७ आत्महत्या या निम्नमध्यमर्गीय वा अल्प उत्पन्न गटात होतात. ही झाली आत्महत्येशी निगडित तथ्य. मुळात हे पाऊल उचलावंस का वाटतं याचा विचार किंवा त्यासाठी तयार होणारी मानसिक बैठक याचाही विचार व्हायला हवा.
आजची तरुणाई महत्त्वाकांक्षी आहे, आव्हानं पेलण्याची तिची क्षमता आहे, लाथ मारेन तिथे पाणी काढेन यावर तिचा विश्वास आहे. आज तरुणांसाठी शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. पालकांच्या माध्यमातून, शासनाच्या योजनांच्या माध्यमातून त्यांना आवडेल ते शिक्षण घेता येईल अशी परिस्थिती आहे. प्राथमिक सोयीसुविधांच्या बाबतीत सकारात्मक परिस्थिती असणारे युवकांच्या मानसिक स्थितीत मात्र आंदोलनं निर्माण झाली आहेत असं आपल्या लक्षात येतं. शिक्षणात वाढलेली स्पर्धा, हव्या असलेल्या संधींचा अभाव, रोजगाराची कमतरता आणि रोजगारक्षमतेचा अभाव, पीअर प्रेशर, नोकरीच्या ठिकाणी असलेली स्पर्धा, मैत्री व प्रेमातील मानसिक आंदोलनं, इंटरनेट सुविधांचा भडीमार, माहितीचा स्फोट, घरातलं बिघडलेलं वातावरण यामुळे तरुणांचं विश्व पुरतं ढवळून निघालं आहे. आज विशष करून १५ ते २५ या वयोगटात आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय. आधी दिलेल्या कारणांसह लैंगिक शोषण, परीक्षेतील अपयश, सायबर शोषण, व्हिडिओ क्लीप्सच्या आधारे लैंगिक शोषण, ब्लूफिल्म्सच्या माध्यमातून होणारा लैंगिक दृष्यांचा भडीमार, स्वतःच्या अस्मितेबाबत मनात उडालेला कल्लोळ, करिअरची निवड करताना झालेला गोंधळ, फिअर ऑफ मिसिंग आऊटचा अर्थात फोमोचा त्रास, सोशल मीडियाद्वारे केलं जाणारं मानसिक शोषण, ऑनलाईन गेम्सचं व्यसन अशा अनेक कारणांमुळे किशोर आणि युवकांमध्ये नैराश्याचं प्रमाण वाढत असून अनेकदा त्याची परिणिती आत्महत्येत होऊ शकते, होते. दुसरीकडे शिक्षण आणि अपेक्षित पगार देणारी नोकरी, नोकरीतून मिळणारा पैसा आणि खर्च याचा ताळमेळ बसवणंही आव्हानात्मक झालं आहे. आपण किती कमावतो आणि किती खर्च करतो याचा सखोल विचार करणं गरजेचं आहे. हा विचार जुळत नाही तेव्हा अनेकदा मनात हरल्याची भावना प्रबळ होते व मनात आयुष्य संपवण्याचे विचार येतात. अनेकदा आत्महत्यांचं मूळ त्या माणसाच्या बालपणात किंवा जडणघडणीतही सापडतं.
आपल्याकडे अजूनही मनःस्वास्थ्याकडे वस्तुनिष्ठपणे आणि सकारात्मकतेने पाहिलं जात नाही. वास्तविक याचा सखोल विचार करणं आणि यावर तार्किकतेने उत्तर शोधणं आवश्यक आहे. आज घराघरातला संवाद हरवला आहे. लहानपणापासूनच प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्याची सवय असेल तर युवकांना आपले प्रश्न घरच्यांसमोर मांडायला अवघडलेपण येत नाही. मनात येणारे विचार ते स्पष्टपणे मांडू शकतात, गोंधळलेपण त्यांना एकट्यानेच अनुभवावं लागत नाही. आज दुर्दैवाने कुटुंबव्यवस्था बिघडू लागली आहे. संवाद हरपला आहे. ऑनलाईन विश्वात सतत गप्पा मारणारी माणसांना प्रत्यक्षात मात्र एकांतवास आवडू लागला आहे. खरं तर युवकांच्या अनेक प्रश्नांवर त्यांच्या मानसिकतेचा विचार करून चर्चा करून प्रश्न सोडवणं शक्य आहे. कधी आईवडील म्हणून, कधी भावंडं, कधी मित्र म्हणून तर कधी सहचर म्हणून शांतपणे विचारमंथन करणं, शक्य तिथे उपाय सुचवणं, सगळं नीट होईल याबाबत त्याला/तिला आश्वस्त करणं खरोखरच गरजेचं झालेलं आहे. असा काही विचार घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या मनात येत असेल तर त्याला एकटं न सोडणंही गरजेचं आहे. ज्यांच्या मनात नैराश्य येतं त्यांनीही न डगमगता, न घाबरता आपल्या समस्या इतरांपुढे मांडणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यावर आपल्याला उत्तर सापडत नाही अशा एखाद्या प्रश्नावर समोरचा अनेकदा उत्तर सुचवून जातो. मानसिक आजार असेल तर त्यावर मनोविकारतज्ज्ञाकडून वेळीच उपचार करणंही आवश्यक असतं. गरज असेल तिथे व्यसनमुक्तीकेंद्रात दाखल करून त्यातून बाहेर काढणंही शक्य आहे. आयुष्य म्हणजे हॅपनिंग्सची रोमांचकारी मालिका नाही, हे युवकांनीही लक्षात घेतलं पाहिजे. एका सरळ रेषेत चालणारं आयुष्य म्हणजे कंटाळा नाही, तर ते सातत्य आपण राखू शकतो आहोत याचं फलित आहे. त्यामुळे तेच तेच काम करून येणारा कंटाळा असा दृष्टीकोन ठेवण्यापेक्षा हे विशिष्ट कामात पाया पक्का करणं आहे असं मानलं पाहिजे. आपल्या आपल्यात नवनवीन शिक्षण घेऊन गुणवर्धन केलं पाहिजे व त्याचा कामात उपयोगही केला पाहिजे. म्हणजे तेच ते काम करून नैराश्य येणार नाही आणि स्वतःला हानी पोहोचवण्याचे विचारही मनात डोकावणार नाही. या व अशा अनेक उपायांनी युवकांमधील आत्महत्येला वेळीच थोपवता येऊ शकतं.
जीवन अनमोल आहे. एक माणूस जीव देतो तेव्हा केवळ तोच मरत नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब एका भयानक परिस्थितीला सामोरं जातं. मानसिक ससेहोलपट होते, त्यांनी आपला आप्त गमावलेला असतो, कोणाला कायदेशीर समस्यांना तोंड द्यावं लागतं, कधी कुटुंबाचा आर्थिक कणाच मोडतो, परिसरातल्या नागरिकांकडून काही वेळेस टोचणी सोसावी लागते, काही वेळेस नैराश्य येऊ शकतं. त्यामुळे एका आत्महत्येचे विविधांगी परिणाम कुटुंबाला भोगावे लागू शकतात. त्यामुळे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेण्याऐवजी त्या समस्येतून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा.
 
- मृदुला राजवाडे