मत्स्यकन्या : एक गूढरम्य अनुभूती

युवा विवेक    27-Mar-2023
Total Views |


मत्स्यकन्या : एक गूढरम्य अनुभूती

जी. ए. कुलकर्णी लिखित 'मत्स्यकन्याही कथा म्हणजे एक गूढरम्य आणि तितकीच तरलउत्कट अनुभूती आहे! त्यांच्या इतर कथांप्रमाणे याही कथेला गूढपणाचा एक अद्भूत गंध आहे आणि त्यामुळेच ही कथा मनामध्ये तिच्याप्रति एक अनाम आकर्षण निर्माण करते यात शंका नाही.


कथेचं विशेषत्व सुरू होतं ते अगदी नावापासूनच. 'मत्स्यकन्या' म्हणजे ती कुणी कन्या आहे, पण अर्धे अंग मात्र मत्स्याचे असलेली! इथून, म्हणजे अगदी एका शब्दाच्या शीर्षकापासूनच एक कुतूहल निर्माण होतं आणि ते कुतूहल, ती उत्कंठा अगदी शेवटपर्यंत तितकीच ताजी राहते, कथेसोबत बहरत जाते.

'पारवा' या पुस्तकातील ही कथा एक मिथक कथा आहे. सदर कथा आपल्याला एका अकल्पित किनाऱ्यापाशीच घेऊन जाते. असा किनारा, जिथे मागच्या उन्हांची प्रकट जाणीव आतमध्ये जागी आहे आणि समोर काहीतरी अगम्य अद्भुतही साद घालत आहे. म्हणूनच कथा मिथक असली, तरी तिचं महत्व वास्तवालाही नाजूक स्पर्श करणारं आहे.

समुद्रातील मत्स्यकन्या तरुण आहे. पण तिच्या शरीराला खवले असल्यामुळे ती असंतुष्ट आहे. तिला त्याची शरम वाटते. तिचाच भाग होऊन गेलेलं ते खवल्यांचं नकोसं आवरण सोडून, तिला पाचूच्या बेटावर चालत जायची इच्छा आहे. म्हणूनच हे असमाधान. हे साध्य करण्यासाठी ती समुद्राच्या तळाशी फिरणार्या एका वृद्ध ज्ञानी पुरुषाला उपाय विचारते. हा पुरुष अनंत काळाचा साक्षी आहे, अगदी पहिली लाट किनार्यावर आदळतानाचा ध्वनी ऐकलेला! "तुझ्या जीवनात अविस्मरणीय दुःख आले की हे खवले जातील" असं तो तिला सांगतो. पण दुःखाबद्दल अनभिज्ञ असलेली ती मत्स्यकन्या त्याला विचारते की "दुःख म्हणजे काय?" आणि "तुमच्याकडचे थोडे दुःख मला द्याल का?" यावर तो अनुभवी आवाज उद्गारतो की, "मी दुःख पाहिले आहे पण ते मला दुसऱ्यास देता येत नाही." तो पुढे म्हणतो, की "दुःख मिळवता येत नाही, ते यावे लागते!"

पुढे मग ती मत्स्यकन्या समुद्रावर आलेल्या मेघांकडे, संध्येकडे, रात्रीकडे, सगळ्यांकडे दुःखाची मागणी करते. पण याबाबत सर्वांकडूनच तिची निराशा होते.

काही दिवसांनंतर एक तरुण किनाऱ्यावर दररोज संध्याकाळी येऊन बासरी वाजवतो. मत्स्यकन्येने पूर्वी कधीच न ऐकलेलं ते सुमधूर लाघवी संगीत तिला भुरळ पाडतं. ते संगीत तिला ऐकावेसे वाटत असल्याची कबुली ती त्या तरुणाला देते. पण.. तो तिला आता दूर, निळ्या टेकड्यांपलिकडे आणि तिथूनही पुढे जाणार असल्याबद्दल सांगतो. तो म्हणतो की त्याने स्वप्नामधे एक ओठ थरथरत असलेली, डोळ्यांच्या कडा ओल्या असलेली साधीशी तरुणी पाहिली होती. तो तिच्याच शोधात होता आणि ती स्वप्नव्यक्ती न मिळाल्याचं दुःखच त्याच्या संगीतात आहे. ती हे ऐकते आणि आपल्या अंगावरील खवले जाण्यासाठी त्याच्या संगीतातील थोडे दुःख त्याला मागते. तेव्हा, "दुःख असे मिळत नाही, ते यावे लागते!" वृद्ध पुरुषाच्या याच शब्दांची गंभीर पुनरुक्ती त्याच्याकडून होते. काही दिवसांनी तो तरुण, पावा कमरेला खोचून मत्स्यकन्येचा निरोप घेतो. तेव्हा तो आता आपल्याला पुन्हा भेटणार नाही हे जाणवून ती व्याकुळ होते आणि काकूळतीला येऊन भग्न आवाजात "मला ने.. मला ने.." असे त्याला मनापासून विनवू लागते. तिला आपल्यासोबत नेणं कसं शक्य नाही हे तो सांगतो आणि अटळ वाटणाऱ्या या विरहभावनेने तिला दुःख होतं. तो मागे वळून पाहतो, तेव्हा तिच्या अंगावरील खवले गळून तिच त्याच्या स्वप्नातली तरुणी असल्याचे त्याला दिसते. ती आपली स्वप्नव्यक्तीच असल्याची कबुली तो तिला देतो. जमिनीवरील स्वप्नवस्त्र तिच्याभोवती आपोआप लपेटले जाते. मग आठवणींच्या पाकळ्या गोळा करून त्यांचा गुच्छ करुन तो तिच्या केसांत घालतो. तिला निरोप देण्यासाठी वृद्धपुरुषही तिथे येतो. दोघे दूर निघून जातात.

कथेमध्ये समुद्राचं स्थानही महत्त्वाचं आहे. तो केवळ पार्श्वभूमी म्हणून नाही तर आपल्या लाटा, आवाज, स्पर्श, प्रवाह या सगळ्यातून तो संवादी आहे. 'दुःख' हे कथेचं बीज किती वेगळेपणानं फुलून आलं आहे! मत्स्यकन्येचं असमाधान आणि त्यासाठी तिने वारंवार केलेली दुःखाची मागणी वाचकाला हेलावून टाकते. दुःखाची मागणी खरंच करतं का कुणी इतक्या उत्कटपणे? कुणा दुःखामागून सुखही आपसुक खेळतं का आपल्या पदरात? अशा प्रश्नांनी आत निर्माण होणारी एक स्वाभाविक अस्वस्थता आपल्याला कथेशी सहज जोडते.

मत्स्यकन्येला त्या तरुणाचं संगीत मोहीत करतं. तिने तितकं सुंदर संगीत आजवर कधीच ऐकलं नसतं हे ती सांगते. कारण, त्याच्या संगीतामधे दुःख असतं! हे वाचून आपण खरोखर अवाक् होतो. दुःखामुळेच त्याच्या संगीतात एक विलक्षण आर्तता आहे, त्यात एक आकर्षून घेणारा उत्कट ओलावा आहे. वाटतं, की दुःखच आपल्या जीवनाला अर्थ देतं का? एक सोत्कट सौंदर्याचा अनुभव देतं का? हेच तर सांगायचं नसेल जी.एं. ना?? त्या दुःखामुळेच आपलेही किती भ्रमाचे खवले गळून पडतात! आणि आपल्याच आयुष्याच्या किनाऱ्यावर आपणही अधिक नेटाने आणि निष्ठेनेही चालू लागतो! समृद्ध होतो! पण तरीही नकोच असतं आपल्याला दुःख. कदाचित, आपल्या खवल्यांची आपल्याला अजून जाणीवच नाही म्हणून; किंवा आपल्याच कोषातून, छोट्याशा पाण्यातून बाहेर यायची भीती म्हणून. जी.एं.ची ही मिथक कथा मनोरंजक तर आहेच आहे, पण दुःखाबाबत एका नव्या जाणिवेने अंतर्मुख करणारी आहे.

जी. ए. कुलकर्णी जरी कथा लेखक असले तरी त्यांनी योजलेल्या प्रतिमांमध्ये आणि एकूणच त्यांच्या भाषेमध्ये कवितेचंच नितळ प्रतिबिंब जागजागी दिसतं. त्यांची ही कथा काव्यात्म शब्दांत सजून येते आणि गूढरम्यतेचा अनुभव घेत आपण मनोमन त्या किनाऱ्यापाशीच पोहोचतो.

जी.एं.ची लेखनशैली तर अत्यंत ओघवती व प्रभावी तर आहेच, शिवाय 'साऱ्या क्षितिजावर सोनेरी शालूचा पदर पसरवून चाललेली संध्या', 'सावळी, मखमली पावलांनी हिंडणारी रात्र', 'रात्रीची लाल पहाट करणारी माणके', 'ओला अंधार' अशी ललितरम्य वर्णनं आपल्याला शब्दांची आणि शब्दांतून त्या दृश्याची भुरळ पाडतात.

किती रसांनी नटली आहे ही कथा! मुळात मिथक असल्या कारणाने त्यात अद्भूत रस तर आहेच, शिवाय श्रुंगार रसाचाही मनोज्ञ प्रत्यय येत राहतो. केवळ मत्स्यकन्येविषयीच नाही, तर अगदी संध्या, रात्र यांच्या शब्ददर्शनातही तो रसप्रत्यय दिसतो. त्या तरुणाच्या स्वप्नव्यक्तीच्या साधेपणातही श्रुंगारच तर आहे! अत्यंत साधेपणाचा सहजी न दिसणारा श्रुंगार. तिच्या अस्वस्थतेतून, दुःखाच्या मागणीतून आनंदाची आणि त्याचमुळे शांतरसाची तहानही दिसून येते.

सदर कथेतील शब्दाशयांना आशयाची व्यापकता आहे, अर्थांच्या छटांचं मोहक इंद्रधनुष्य आहे आणि भावनांचे तरल प्रत्यय आहेत. मत्स्यकन्येला खवल्यांमुळे वाटत राहणारं असमाधान, मग दुःख मिळत नसल्यामुळे वाटणारी निराशा, त्या कुणा तरुणाच्या बासरीस्वरांचं आकर्षण आणि मग सहज, नकळतपणे वाटणारं त्या तरुणाचंच आकर्षण! तो जेव्हा मत्स्यकन्येचा निरोप घेतो तेव्हा तिच्या मनी जागी झालेली विरहाची भावना आणि त्यातून आलेलं दुःख! भावनांच्या अशा अनेक छटा या कथेतून 'भेटतात', आपल्याच वाटतात. या कथेला तत्त्वज्ञानाचा स्पर्श आहे. ते दुःखाचं तत्त्वज्ञान आहे! ज्यामुळे कथेची उंची प्रचंड वाढते. दुःखाच्या हवेपणातून शेवटी अचानक मिळालेलं दुःख आणि त्यामुळेच आयुष्याच्या ओटीत पडलेलं हव्याशा सुखाचं दान, हे पाहून आपण स्तब्ध होतो. "दुःख मिळवता येत नाही, ते यावे लागते!" हे वाक्य आणि त्याचीच पुनरुक्ती वाचून वाचक निःशब्द झाल्याशिवाय राहात नाही. शेवटी, मत्स्यकन्येचे नकोसे खवले गळून जातात आणि मग त्या तरुणालाही तिच आपली स्वप्नव्यक्ती असल्याची जाणीव होऊन ते दोघे दूर निघून जातात असा सुखान्त दाखवला आहे. त्यामुळे कथेत गुंतून गेलेल्या मनाला आनंद तर होतोच, पण या कथेच्या विलक्षण अनुभवातून समृद्धीचा अंतर्मुख करणारा एक मनोज्ञ प्रत्यय येतो हे मात्र नक्की.

~ पार्थ जोशी