‘चिंता’मणी होऊ नका

युवा विवेक    03-Mar-2023   
Total Views |

‘चिंता’मणीहोऊ नका
एखादी वाईट बातमी ऐकल्यावर तुम्ही स्थिर असता की चिंताग्रस्त होता, परीक्षेला जाताना घाम फुटतो का, इंटरव्ह्यूच्या खोलीत जाताना पाय लटपटतात का, एखादा साधासा निर्णय घेण्याची वेळ पडली तर घसा कोरडा पडतो का? या अनुभवांना आपण सगळेच कधी ना कधी सामोरे गेलेले असतो. त्यामुळे यात विशेष असं काही नाही. पण हे सगळं वारंवार आणि साध्या साध्या गोष्टींतही होत असेल तर मात्र सावधान. हीमानसिक स्थिती चिंता किंवा अन्झायटीची असू शकते. यात जगावेगळं असं काही नाही, पण या मानसिक स्थितीतून बाहेर पडणं मात्र आवश्यक आहे. लक्षात घ्या आपल्याला ‘चिंता’मणी व्हायचं नाही, तर आत्मविश्वासपूर्ण असं आयुष्य जगायचं आहे.
पण मुळात या चिंता आपल्याला जाळतातच का, या प्रश्नाचं उत्तर शोधणं अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या घडीला चंगळवादाचा उद्रेक झालेले अनेक विकसित देश आणि त्या देशातील युवक चिंता किंवा अन्झायटी व त्यामुळे येणारे नैराश्य यांना सामोरे जात आहेत. या देशांच्याच जोडीला भारतासारख्या देशातही हळूहळू चिंतेचं प्रमाण वाढत चाललं आहे. याला कारणं अनेक आहेत. निम्नवर्गात शिक्षणाचा अभाव, सर्वत्र स्पर्धा, बेरोजगारी, बिघडलेले नातेसंबंध, कुटुंबव्यवस्थेचा बिघडलेला स्तर, बिघडलेली झोप या व अशा अनेक कारणांमुळे या मानसिक स्थितीचं प्रमाण वाढू लागलंय. भारतातील मोठ्या शहरांमधील एकूण लोकसंख्येपैकी १५.२० टक्के लोक अन्झायटी तर १५.१७ टक्के लोक डिप्रेशन या समस्यांना बळी पडलेले आहेत. पुरुषांपेक्षा महिलांना या मानसिक समस्या होण्याचे प्रमाण ६० टक्यांपेक्षा जास्त आहे. बाह्य कारणांचा परिणाम आंतरिक स्थितीवर होत चालला आहे. सर्व वयोगटात चिंता हा खरोखरच चिंतेचा विषय झाला आहे.
सर्वसामान्य माणसाला या चिंतेवर मात कशी करायची हा प्रश्न कायम भेडसावतो. विशेषतः युवा वर्ग अनेक कारणांनी चिंतीत असतो. त्यांनाही हे कोडं कसं सोडवायचं हे लक्षात येत नाही. कशा प्रकारच्या असतात या चिंता ते पाहू. कॉलेज प्रवेशाची चिंता, परीक्षेची चिंता, इंटरव्ह्यूची चिंता, स्टेजवर जाण्याची चिंता, करिअरची चिंता, कर्जाची चिंता, बिलांच्या तारखा सांभाळण्याची चिंता, कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाच्या जबाबदारीची चिंता, एखादी विशिष्ट प्रकारची चिंता म्हणजे कुत्र्यांनी अटॅक करण्याची चिंता किंवा उंचावरून पडण्याची चिंता, इत्यादी इत्यादी.... चिंतांची ही माळ फार मोठी आहे. या खरं तर सामान्यतः आढळणाऱ्या चिंता आहेत. पण याचा परिणाम मात्र काहींच्या बाबतीत अत्यंत दूरगामी असू शकतो. परीक्षेच्या वेळेस अस्वस्थ वाटणं, घशाला कोरड पडणं, प्रसंगी शुद्ध हरपणं, कर्जाच्या-बिलांच्या तगाद्याने निद्रानाश होणं, आपल्यापेक्षा वरचढ व्यक्तीसमोर उगीचच ततपप होणं, क्षुल्लक गोष्टीचा उगीचच विचार करत राहण्याची सवय लागणं, लिफ्ट-आकाशपाळणा याची भीती वाटणं, उंचीचा-पाण्याचा फोबिया वाटणं, सतत स्वच्छता करत राहणं, कोणीतरी आपल्या पाळतीवर आहे असं वाटत राहाणं, जुन्या आठवणींमध्ये सतत घोटाळणं अशा मनावर परिणाम करणाऱ्या क्रिया या चिंतांमुळे घडू शकतात. चिंतेमुळे होणाऱ्या या क्रियांमुळे अनेकदा हृदयावर अनावश्यक ताण येतो, स्नायू दुखतात, मन सतत बेचैन राहातं, हट्टीपणा वाढतो, आत्मविश्वास हरवतो. सतत साफसफाईमुळे होणाऱ्या ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डरमुळे त्वचेचे विकार वाढतात, मानसिक स्वास्थ्य हरवतं, पोट बिघडतं. (कोविडच्या काळात सुरुवातीला बचावात्मक स्वरूपात सांगितलेले स्वच्छतेचे किंवा संपर्क टाळण्याचे पर्याय लोकांनी दीर्घकाल सुरू ठेवले, त्यामुळे अनेकांना ओसीडी जडली किंवा सतत असुरक्षिततेची भावना बळावू लागली.) चिंतेमुळे काही वेळा आत्महत्येचे विचार मनात येतात, स्वतःला/घरातल्यांना इजा करण्याची प्रवृत्ती बळावू शकते. पण या सगळ्यावर मात करायची तरी कशी? मित्रांनो, हे आपल्याच हातात आहे.
विविध मार्गांचा अवलंब करून आपण चिंतेवर किंवा अन्झायटीवर मात करू शकतो. या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बोला. आपली सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे आपला मित्र/मैत्रीण किंवा अजून एखादा जीवलग याला आपली समस्या सांगा. त्याबद्दलची चिंता त्याच्याकडे व्यक्त करा. याने दोन गोष्टी होतील. एकतर मनातील साठलेली चिंता दूर होईल आणि ती व्यक्ती तुम्हाला यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू शकेल. त्याचप्रमाणे कार्यालयीन समस्येबाबत सहकाऱ्यांशी, ज्येष्ठांशी बोला. घरगुती आर्थिक समस्यांबद्दल घरच्यांशी, हितचिंतकांशी चर्चा करा. कोणत्याही स्वरूपाची भीती मनात असेल, विशेषतः फोबिया असेल तर त्याबद्दल मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. काही वेळा थोड्याशा उपचारांनी चिंता किंवा अन्झायटीतून बाहेर पडण्यास मदत होते. योग्य आणि वेळच्यावेळी आरोग्यपूर्ण आहार, आवडते पदार्थ, आवडीचं आणि प्रसन्न सुरांचं संगीत, एखादा नाटक-सिनेमा याचीही मदत होईल. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या त्रासाबद्दल जाणकारांकडून माहिती घ्या, इंटरनेटवर त्याच्या रेमिडीज असतील त्याचा आधार घ्या. वाचनीय पुस्तकांचीही मदत चिंतामुक्त होण्यासाठी होऊ शकते. एकेकटे राहू नका, त्याऐवजी समाजात मिसळा, विविध कार्यक्रमांना हजेरी लावा, लोकांशी चर्चा करा, गप्पा मारा, मोकळे व्हा. सर्वात महत्त्वाच्या गोष्टी दोन आहेत. एक, पुरेशी झोप आणि दोन, योग्य व्यायाम. मनस्वास्थ्य चांगलं राखण्यात या दोन्हीची फार सकारात्मक मदत होते. झोप तुमच्या मेंदूला ताणापासून मुक्त ठेवते, व्यायाम तुम्हाला उल्हासित ठेवतो, तुमच्या चित्तवृत्ती सुधारतो. चिंतामुक्त होण्यासाठी या दोन गोष्टींना तर निश्चित प्राधान्य द्या. त्वचाविकार, श्वसनविकार वा पचनविकार झाले असतील तर योग्य ट्रीटमेण्ट घ्या. योग आणि आयुर्वेदाचा आधार घ्या. काही आव्हानात्मक प्रसंग आलेच आणि आपल्याला चिंता सतावतेय असं वाटलं, संकटाच्या वेळेस भीतीने घाम फुटला तर दीर्घ श्वास घ्या. आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा आठवा, आवडत्या श्रद्धास्थानाचं स्मरण करा, आपल्या आयुष्यातले आनंददायी प्रसंग आठवा, अशाच समस्येवर आपण मागे कशी मात केली होती ते आठवा आणि पुन्हा एकदा त्याच समस्येचा विचार करा. तुम्हाला नक्की याचा उपयोग होईल. कोविडमुळे जेव्हा लोकांना ओसीडी किंवा सोशल डिटॅचमेण्टचा त्रास होऊ लागला त्यावेळेस कोविडपूर्व स्थितीचं स्मरण करणं हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय ठरला. उदाहरणच द्यायचं तर मुंबईकर जेव्हा पूर्वीसारखे वागायला लागले तेव्हा कोविडची भीती त्यांच्या मनातून कायमची निघून गेली. अगदी तसंच आपल्याला या चिंतांवर मात करायची आहे असं निश्चित करा.
चिंता, काळजी ही माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असली तरी ती जेव्हा सामान्यतेकडून ऍबनॉर्मलिटीकडे प्रवास करू लागते तेव्हा गडबड होते. आपलं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राखणं हे आपल्या एकूणच प्रगतीसाठी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत चिंता किंवा एन्ग्झाईटी ही समस्या होऊ देऊ नका.‘चिंता’मणी होऊ नका, चिंता दूर सारा आणि प्रगतीकडे वाटचाल करा.

- मृदुला राजवाडे 

मृदुला राजवाडे

मुक्त पत्रकार, तत्पूर्वी नऊ वर्षे हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र, ईशान्य वार्ता अशा ठिकाणी वार्ताहर, उपसंपादक, वृत्त समन्वयक, सोशल मिडिया मॅनेजर म्हणून कार्यरत. त्याचबरोबर साप्ताहिक सकाळ, वयम, शिक्षण विवेक, ज्येष्ठपर्व आदी नियतकालिकांसाठी लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिटयूटमध्ये पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमासाठी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत.