नायक नहि खलनायक हु मै

युवा विवेक    06-Mar-2023
Total Views |

नायक नहि खलनायक हु मै
 
संजय दत्तचा 'खलनायक' आणि शाहरुख खानचे “डर आणि बाजीगर” हे १९९३ साली प्रदर्शित झाले होते त्याला आता ३० वर्ष पुर्ण होतील. भारतीय सिनेमाचा इतिहास बघितला तर हे सिनेमे काही फार मोठे क्लासिक्स किंवा मैलाचा दगड म्हणावे असे मुळीच नाहीत.
शाहरुख खान - संजय दत्तच नव्हे तर इतर कोणत्याही अभिनेत्याच्या कारकिर्दीत ‘ठीकठाक’ सिनेमे म्हणून ह्या सिनेमांची वर्णी लागली असती. (अस म्हणतात कि डरमधल्या भुमिकेसाठी शाहरुखच्या आधी आमीर खानला विचारणा झाली होती आणि बाजीगरच्या भूमिकेसाठी सलमान खानचा विचार करण्यात आला होता, पण दोघांनीही कारकीर्दीच्या त्या वळणावर खलनायकी छटा असलेल्या त्या भुमिका नाकारल्या आणि पुढे जे घडल तो इतिहास आहे.)
ह्या सिनेमांनी बॉलीवूडमध्ये Anti Hero नावाची संकल्पना रुजवली. हि संकल्पना तशी नवी नव्हती. चोर, डाकू, स्मगलर असे समाजाच्या दृष्टीने खलप्रवृत्तीचे वाटणारे नायक आधी देखील होते पण पुर्वीच्या काळी बेरोजगारी, गरिबी ह्यामुळे विवश होऊन गुन्हेगारी वळणावर गेलेला नायक असायचा.
‘श्री ४२० किंवा गाईड’ मधला राजू हा प्रवाहपतित असायचा त्त्यामुळे त्याला प्रेक्षकांची सहानुभूती असायची. आणिबाणीच्या काळातला अमिताभचा विजय नावाचा नायक स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड न करता गुन्हेगारी जगतामध्ये स्वतःच्या आतला माणूस जिवंत ठेवत असे त्यामुळे त्या angry young man कडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन म्हणजे 'हतबलतेतून आलेला विद्रोही आवाज' असा असायचा. पुढे ८० च्या दशकात मिथुन चक्रवर्ती, अनिल कपूर, सनी देओल ह्यांनीदेखील गुंड - मवाली म्हणाव्या अशा व्यक्तिरेखा साकारल्या पण त्यांचे स्वरूप 'गरीबांचे मसीहा' असे असल्याने प्रेक्षकांनी त्यांनासुद्धा स्वीकारले.
नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीपासून मात्र हे चित्र बदलत गेल. पापभिरू, सरळमार्गी, नायक हळूहळू मागे पडत गेला. बाजीगर मध्ये सुडाच्या आगीत पेटलेला नायक त्याच्या एका नायिकेसह इतर निरपराध लोक मारतो हे न पटण्याजोग होत. डरमधल्या शाहरुखच्या भूमिकेच तरुणवर्ग अंधानुकरण करत आहे आणि त्यामुळेच एसिड हल्ले किंवा तत्सम घटना वाढल्या आहेत अशी टीका त्याकाळी वृत्तपत्रातून होऊ लागली होती. “तु माझी नाही तर इतर कोणाचीच होऊ शकत नाही” हि विकृत विचारधारा समाजातील युवावर्गात बोकाळत असल्याचे तेव्हाच्या बातम्यांमधून दिसत असे.
शाहरुखचेच ' जाने,अंजाम, राजू बन गया जंटलमन' वैगेरे चित्रपट पण त्याच मार्गाने जाणारे होते. चांगल्या आणि वाईट मार्गाच्या मध्यात कुठेतरी भरकटून गेलेला नायक असे त्याचे रोल्स असत. प्रियदर्शनचा ' 'गर्दीश'हा सुद्धा १९९३ चा ! पोलिस ऑफिसर बनण्याचं स्वप्न पाहणारा नायक आणि त्याला salute करण्याच स्वप्न पाहणारा त्याचा हवालदार बाप हे समीकरण जॅकी श्रॉफ आणि अमरीश पुरी ह्यांनी सुंदर रंगवल होत. नायकांच अधपतन हाच त्याचा कथाआशय होता जे त्या काळाशी सुसंगत होत.
त्याच सुमारास रामगोपाल वर्मा, महेश मांजरेकर, संजय गुप्ता इत्यादी दिग्दर्शकांनी UNDERWORLD नावाच नविन दालन बॉलीवूडला उघडून दिल. सत्या, वास्तव., कंपनी, गुलाम, कांटे, मुसाफिर, धूम ……..अशा चढत्या पायरीने नंतर नायक आणि खलनायक ह्यांच्यातील सीमारेषा धूसर करून टाकली. नायकाची कृत्येच इतकी विकृत आणि क्रूर असे कि “नायक कोण आणि खलनायक कोण?” हा प्रश्न पडावा.
धूम १, धूम २, धूम ३ हि मालिका तर मुख्य नायकापेक्षा खलनायकच आकर्षण असल्याने पाहिली जाऊ लागली.
हाथियार, शूटआउट एट वडाला, शूट आउट एट लोखंडवाला, वन्स अपऑन अ टाईम इन मुंबई १ आणि २ मध्ये देखील गुन्हेगारी जगताचेच उदात्तीकरण होत आहे कि काय अशी शंका येईल इतपत नायकाच चित्रण दाखवलं होत. मधल्या काळात अनिल कपूरने ‘विरासत आणि नायक’ सारखे चित्रपट केले होते ज्यामध्ये नायक शेवटी हताश होऊन म्हणतो कि "तुम्ही पण मला तुमच्यासारख बनवून टाकल."
जागतिकीकरणानंतर मध्यमवर्गीय भारतीयाच्या हातात पैसा खेळू लागला होता. आधीच्या पिढीने आयुष्य घालवून जेवढ कमावलं नाही तेवढ कमी काळात आयटी सेक्टर किंवा रीएलीटी शो मधून कमावता येऊ लागल्याने इझी मनीची चटक त्या युवावर्गाला लागली होती. टिव्हीवर लागणारे “कौन बनेगा करोडपतीसारखे” क्विझ शो झटपट श्रीमंत होता येणे शक्य आहे हेच दर्शवित होते त्यामुळे थोड्या फार फरकाने त्याचे पडसाद त्याकाळच्या सिनेमाच्या शीर्षकात सुद्धा दिसून येईल. हेराफेरी, मालामाल विकली, कॅश, अपना सपना मनी मनी, जन्नत, गुरु, गोलमाल ह्या नावातूनच पैशाच्या मागे धावणाऱ्या कथाआशयाचा अंदाज येईल.
लक्ष्य, रंग दे बसंती, टॅक्सी नंबर ९२११, अशा सिनेमातील नायक हे खलनायक नसले तरी वडिलांच्या अमाप पैशातून आलेले स्वच्छंदी आणि उनाड जगताना मार्ग शोधणारे होते. तर मुन्नाभाई MBBS, ३ इडियटस, तारे जमीन पर मध्ये शिक्षणव्यवस्था खलनायक बनून उभी ठाकली होती. पीके, ओ माय गोड, सिंघम रिटर्न सारख्या सिनेमात धर्माचे ठेकेदारच खलनायक म्हणून समोर आले. शिक्षक किंवा अध्यात्मिक गुरु हे एकेकाळी वंदनीय आणि आदर्शवत असता तेच आता चेष्टेचा आणि टवाळकीचा विषय बनले.
गेल्या ३० वर्षात काळाच्या पुलाखालून खूप पाणी निघून गेले आहे. "आपले आदर्श कोण? आपले नायक कोण? आपले रोल मॉडेल कोण?" हे ना ठरवता येणे हीच ह्या मधल्या काळातील पिढीची शोकांतिका असेल.
- सौरभ रात्नापारखी
- ९८८१७८३४७४