नून चहा

युवा विवेक    09-Mar-2023   
Total Views |

नून चहा
सगळ्या कढ्यांमध्ये (कढीचे अनेकवचन कढ्या होते.) सोलकढीइतका सुंदर रंग कोणाचाच नाही तसाच सगळ्या चहात नून चहाइतका सुंदर गुलाबी रंग कोणत्याही चहाचा नसावा. काश्मिरचा अजून एक प्रसिद्ध चहा, नून चहा. नून म्हणजे काश्मिरी भाषेत मीठ. हो, या चहामध्ये मीठ असते. पाकिस्तानमध्ये या चहात साखर असते पण आपल्याकडे केवळ मीठ. हा नमकीन चहा वेगवेगळ्या ड्रायफ्रुट्स सोबत सर्व्ह करतात. ड्रायफ्रूट्सची पावडर कधीकधी चहात टाकली जाते.
काश्मिरी डेलिकसीला शीर चहा, गुलाबी चहा, नून चहा आणि नमकीन चहा असेही म्हणतात. चहा पहिल्यांदा चीनमधून सिल्क रोडमार्गे भारतात आला. हिमालयातील लोकांना चहामध्ये किंवा इतर पेयांमध्ये मीठ टाकण्याची सवय होती. उंचावर क्षार कमी होऊ नये म्हणून. तिबेटमध्येही अशाच एक गुलाबी चहा बनतो. आपल्या लढाखमध्ये बटरमिश्रित चहा बनवण्याची पद्धत आहे. या सगळ्या पद्धती एकत्र करून काश्मिरी लोकांनी आपल्या सोयीनुसार नून चहा बनवला. बटरऐवजी दूध वापरले पण तिबेटसारखाच सोडा वापरला. तिबेटमध्ये नैसर्गिक राखाडी रंगाचा सोडा, पो चा वापरला जायचा. काही लोकांच्या मते १४ व्या शतकात सुफी संत तुर्कस्तानातून येतांना हि चहा बनवण्याची पद्धत घेऊन आले. हळूहळू इथल्या लोकांनी ती आत्मसात केली. इतिहास वेगवेगळा असला तरी आज इथे रोज कमीतकमी दोन वेळा हा चहा लोक पितात.
आता या चहाला गुलाबी रंग कसा येतो? कारण यात बेकिंग सोडा असतो. काश्मिरी चहाची पाने पाण्यात उकळली जातात. त्यात पटकन बर्फ टाकला जातो. खाण्याचा सोडा मिसळून चहा वेगाने फेटला जातो. एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात किंवा पळीने मिसळला जातो जेणेकरून त्यात हवा मिसळली जावी. सोपा मार्ग म्हणजे इलेक्ट्रिक रवी किंवा विस्क वापरता येते. हळूहळू त्याला लाल रंग चढतो आणि दूध मिसळल्यावर तो गुलाबी दिसतो. अल्कली सोडा आणि चहामधील ऍसिड यांची प्रक्रिया होऊन हा सुंदर रंग येतो. चहातील पॉलीफेनॉलचा रंग पीएच बदलल्यामुळे बदलतो आणि गुलाबी रंग तयार होतो. हा चहासुद्धा त्या शाही समोवरमध्ये उकळला जातो.
चहा कोणत्या प्रतीचा आहे, सोडा किती टाकलाय आणि किती वेगाने चहा मिसळला आहे यावर चहाचा रंग ठरतो. यासाठी जी चहापावडर मिळते त्याला गनपावडर चहा म्हणतात. (आंध्रमध्ये अशीच एक गनपावडर पोडी/चटणी इडलीसोबत खातात.) हा चहा काश्मिरी ब्रेडसोबत प्यायला जातो. हा एकप्रकारचा नाश्ताच असतो. काश्मिरी काय आहे ना. म्हणजे पहा, तिकडची केवळ थंडीच गुलाबी नाहीये तर चहाही गुलाबी आहे.
आजकाल याचे मिक्स मिळते किंवा त्यात रंग वापरला जातो. रमजानच्या दरम्यान नून चहा बिहार, उत्तर प्रदेशमध्येही बनवतात पण बाकी भारतात अजून मिळत नाही. मी पण हा चहा प्यायले नाहीये. कदाचित काही ठिकाणी मिळतही असेल. तिकडची स्पेशल काश्मिरी चहाची पाने आणली कि आपण इकडेही बनवू शकतो हा चहा. ओरिओ शेकच्या जमान्यात हा बिनसाखरेचा नून चहा अतिशय छान पर्याय ठरू शकतो! या चहाचे पाण्यातील अर्क काही दिवस फ्रिजमध्ये छान राहतो. पॅकेज फॉर्ममध्ये जशी आता फिल्टर कॉफी मिळते तसं नून चहाही मिळू शकतो ना! आपण आशा करू या कि काही वर्षात जसा तंदुरी चहा गल्लोगल्ली मिळतो तसा गोजिरवाणा गुलाबी चहाही मिळू लागेल.
 
सावनी