एप्रिल फूल ‘क्यों’ बनाया?

एप्रिल फूल

युवा विवेक    01-Apr-2023   
Total Views |

 
एप्रिल फूल ‘क्यों’ बनाया?


एप्रिल फूल बनाया, उनको गुस्सा आया...’ महंमद रफींचं हे गाणं सर्व लहानमोठ्यांना माहिती आहे. या दिवसाचा आपल्यावर एवढा प्रभाव आहे की चित्रपटसृष्टीनेही त्याची या गाण्यात दखल घेतली आहे. कित्येक वर्षं एक एप्रिल या दिवशी साध्या भोळ्या माणसांना मूर्ख ठरवण्याची किंवा खोडी काढून वेड्यात काढण्याची अहमहमिका लागलेली असायची. आता याचं प्रमाण कमी झालं असलं तरी अजूनही हा प्रकार केला जातोच. मुळात हा ट्रेण्ड आला तरी कुठून? याची ऐतिहासिक पार्श्वभूमी कोणती? एखाद्याचं मन यामुळे दुखावलं जाऊ शकतं याचा विचार का बरं केला जात नाही?

आज एक एप्रिल.. नेहमीप्रमाणे कोणी ना कोणी आपल्या मित्राला, नातेवाईकांना, परिचितांना, सहकाऱ्यांना एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करेल. स्मार्ट असेल तो यातून सुटेल, साधाभोळा असेल तो मूर्ख ठरेल. दर वर्षी या दिवशी हे कुठे ना कुठे होतच. जो मूर्ख ठरतो त्याला एप्रिल फूल म्हटलं जातं. या एप्रिल फूल दिवसाची सुरुवात कशी झाली याचा इतिहास मोठा रंजक आहे. एप्रिल फूल्स दिन हा आधुनिक काळातला नाही. अनेक शतकांपूर्वी युरोपात याची सुरुवात झाली. १३८१मध्ये याची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. इंग्लंडचा राजा रिचर्ड दुसरा आणि बोहेमियाची राणी अॅनी यांच्या साखरपुड्याची तारीख ३२ मार्च रोजी जाहीर झाली. लोकांनीही त्यावर विश्वास ठेवला. तेव्हापासून ३१ मार्चचा पुढचा दिवस ३२ मार्च म्हणजेच १ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल दिवस म्हणून साजरा केला जातो. याची आणखी एक कथा आहे. प्राचीन युरोपमध्ये नवे वर्ष १ एप्रिलला सुरू होत असे. १५८२मध्ये पोप ग्रेगरी(तेरावा)ने नवीन दिनदर्शिका स्वीकारण्याच्या सूचना दिल्या व नवे वर्ष १ जानेवारीपासून सुरू झाले. तरीही काहींनी, विशेषतः जे फ्रेंच नव्हते त्यांनी १ एप्रिल हीच नववर्षाची सुरुवात मानणं पसंत केलं. आपला नववर्षदिन त्यांनी याच दिवशी साजरा केला म्हणून त्यांना फूल्स म्हणजे मूर्ख म्हटलं जाऊ लागलं. फ्रान्स, स्कॉटलंड, आयर्लंड, ग्रीस, ब्राझील, इंग्लंड अशा अनेक देशांमध्ये फूल्स डे साजरा केला जातो. आणखी एक आधुनिक कथा म्हणजे, १९१५ मध्ये कोणा ब्रिटीश पायलटने जर्मनीतील एका विमानतळावर मोठा बॉम्ब फेकला होता. हे पाहून लोक सैरावैरा पळू लागले, लपून बसले. मात्र बराच वेळ होऊनही काहीच झालं नाही. तेव्हा लोकांनी परत येऊन पाहिलं तर तिथे एप्रिल फूल असं लिहिलेला मोठा फुटबॉल होता.

तर असा साजरा होऊ लागला एप्रिल फूल. आपणही तो स्वीकारला. एखाद्याला फोन करून चुकीची माहिती देणं, चुकीच्या पत्त्यावर पाठवणं, खोटं सांगून वाट बघायला लावणं हे सगळं या एप्रिल फूल दिनी होऊ लागलं. पण काट्याचा नायटा होत नाही ना याचीही काळजी घेतली पाहिजे. एखाद्याची गंमत करायला काहीच हरकत नाही. हे असे छोटे छोटे नर्मविनोदी क्षण आयुष्य भरभरून जगण्यात मोलाची भूमिका बजावतात. त्यामुळे मित्रामित्रांत एप्रिल फूल दिनी एकमेकांची मस्करी करण्यातला आनंद नक्कीच घेता येईल. गेल्या काही वर्षात प्रँक व्हिडिओजनी लोकांना भरपूर एप्रिल फूलच्या कल्पना दिल्या आहेत. पण पण समोरच्याचं वय, लिंग, स्वभाव, मानसिक स्थिती, आर्थिक स्थिती, सामाजिक दर्जा यापैकी कशाचाच विचार जर केला जात नसेल तर मात्र गडबड आहे असं समजून जा.

एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी असू शकते, स्वभावाने कोपिष्ट किंवा अति हळवी असू शकते याचा विचार केला पाहिजे. आपल्यापेक्षा तिचा सामाजिक दर्जा उच्च असू शकतो. अशा वेळी आपली ही खोडी त्यांना न आवडण्याचीही शक्यता असते. त्यातही सौम्य स्वरूपाची मस्करी करणं एकवेळ चालू शकेल. पण एखादे वेळेस एप्रिल फूल करण्याच्या नादात केलेली मस्करी ही एखाद्याला मनस्ताप देणारी ठरू शकते, त्याच्या सामाजिक प्रतिमेला तडा पोहोचवणारी असू शकते. एखाद्या हळव्या माणसाला याचा मानसिक त्रास होऊ शकतो. विशेषतः प्रेम किंवा जिव्हाळा याबाबतीत केलेली मस्करी ही त्याला विलक्षण त्रास देऊ शकते. आपलं एखादं भलं मोठं खोटं (कोणतीतरी भयानक घटना घडल्याचं वा कोणीतरी निवर्तल्याचं) हे एखाद्याला मानसिक धक्का देऊ शकतं. त्याची परिणिती शारीरिक त्रासात किंवा स्वतःला हानी पोहोचवण्यात होऊ शकते. तुमचं एप्रिल फूल किंवा प्रँक हे एखाद्याचं रॅगिंग तर ठरत नाही ना याचाही विचार करणं आवश्यक आहे. एखाद्या मस्करीचा परिणाम त्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावर परिणाम करणारा ठरू शकतो. त्यामुळे हे सगळं करताना जरा जपूनच. तुम्ही प्रँक व्हिडिओज पाहिले असतील तर त्यातही नागरिक अनेकदा रागवलेले दिसतात.

मुळातच, पाश्चात्य जगाच्या अंधानुकरणातून आपण अनेक गोष्टी उचलल्या त्यातलीच एक ही एप्रिल फूलची संकल्पना. आपल्या संस्कृतीला नर्मविनोद, थट्टा मस्करी अजिबातच वर्ज्य नाही. पण समोरच्याचे वय, जाणिवा ओळखूनच ते करावं असं आपली संस्कृती सांगते. मोठ्यांचा आदर, बरोबरीच्यांचा मान ठेवतच हे केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे केलंच पाहिजे असं अजिबातच नाही. एखादी गोष्ट पटत नसेल, रुचत नसेल तर ती केवळ ट्रेण्डमध्ये आहे म्हणून करणं आपण टाळलं पाहिजे. अंधानुकरणातून तर अजिबात नको. अतिपरिचयात अवज्ञा होते. माझी एक मैत्रीण दर वेळेस या दिवशी फोन करून मला काही ना काही सांगते. ज्यावर मी विश्वास ठेवावा अशी तिची अपेक्षा असते. पण आता त्याचं काहीच वाटत नाही. किंबहुना हिचा फोन येणारच हे गृहीत धरलेलं असतं. पण आता कदाचित एखादी खरी गोष्टही मला त्या दिवशी खोटी वाटू शकते. लांडगा आला रे आलाची गोष्ट माहितीये ना तुम्हाला. तुमच्या एप्रिल फूलमुळे कोणाला नुकसान होणार नाही ना, हे करण्याची खरंच गरज आहे का आणि सारखं एप्रिल फूल करून तुमचं लांडगा आला रे आलाच्या गोष्टीतल्या मुलासारखं होणार नाही ना याचा विचार नक्की करा.

 
- मृदुला राजवाडे  

मृदुला राजवाडे

मुक्त पत्रकार, तत्पूर्वी नऊ वर्षे हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र, ईशान्य वार्ता अशा ठिकाणी वार्ताहर, उपसंपादक, वृत्त समन्वयक, सोशल मिडिया मॅनेजर म्हणून कार्यरत. त्याचबरोबर साप्ताहिक सकाळ, वयम, शिक्षण विवेक, ज्येष्ठपर्व आदी नियतकालिकांसाठी लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिटयूटमध्ये पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमासाठी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत.