कविता जशी स्फुरते..
तसे मनात शब्दांचे वादळ घूमते.. लेखणीला आमंत्रण दिले जाते..
तशी ती ठरवून होत नाही
वाऱ्याच्या मंद झुळूकीसारखी येते
आपसूकच होऊन जाते...
तिच्या मुळाशी असतात
अनेक प्रश्न ,वेदना, भावना, संवेदना
आणि बरच काही...
शब्दांच्या जाती,अलंकारानी ती
सजते, नवे रूप धारण करून
संस्कारांनी बहरते...
कधी कधी वाटते
झाली आहे कवितेची बाधा..
जोपर्यंत काही लिहीत नाही
कागदावर काही मांडत नाही
तोपर्यंत ती ताटकळते,थांबते...
पण हट्ट मात्र सोडत नाही
शेवटी तीचे म्हणणे
मजकडून वदवुन घेतेच
तेव्हा कुठे सुटकेचा नि:शवास सोडते...
नवविचारांनी ती अंकुरते
अखेरीस सर्व षोडोपचारांनी ती
प्रसवते.. तिलाही अग्निदिव्यातून
जावे लागते ,
अंती काव्यरूपी अपत्य जन्मते...
कविता बोलते, चालते,
सर्वकाही जाणते,
आपल्यातच आपली होऊन रमते
माझ्यातल्या मला कवयित्रीची
ओळख देऊन जाते...
- सौ. अनुराधा भोसले.