आपले कोकण कोकण
मायेचे माहेरपण...
इथल्या मातीत विसावे
जिव्हाळयाचे चार क्षण..
माहेरच्या कोकणाला
नारळ पोफळीचे अंगण..
जाई जुई बकुळीचे
सुवासिक प्रांगण...
घर कौलारु छतांचे
घाली उबदार पांघरुण..
फणसापरी कठोर मन
अंतरी मायेचे मधाळपण..
आभाळमायेची शिकवण..
भुईवर पाय ठेवण्याची देई आठवण..
केळीच्या पानावर भोजन
देई तृप्तीचे वाण ..
कोकणच्या सागरास
लाभे रत्नांचे कोंदण..
तिच्या उदरी निपजे
नवरत्नांची खाण
सातासमुद्रापार उमटवी
भूमीचे सोनेरी क्षण...
साऱ्या जगास देई
आदर्शाची शिकवण..
शब्दांत मावेना कोकणचे वेगळेपण...
आठवणीच्या हिंदोळ्यावर
झुले कोकणचे माहेरपण..
श्रीकृष्णा चरणी अर्पण
-अपर्णा पेंडसे