शुफ्ता आणि तोशा

युवा विवेक    11-May-2023   
Total Views |

शुफ्ता आणि तोशा

जम्मू आणि काश्मीरचे गोड पदार्थ एका लेखात लिहून होतील, असे वाटले असतांना अचानक खजिना सापडला. सुदैव म्हणा किंवा दुर्दैव; पण यातील बरेच पदार्थ मला माहीतच नव्हते. नावेही ऐकली नव्हती. त्यामुळे अजूनच उत्सुकता वाढली. आज आपण जाणून घेणार आहोत शुफ्ता आणि तोशाबद्दल. नावावरून काहीच अंदाज येत नसेल पण फोटो पाहिल्यावर याचा अंदाज किती शाही आहे हे समजेल.

शुफ्ता - गोड, कुरकुरीत आणि मऊ शुफ्तामध्ये काय नाहीये? सुकामेवा आहे, साखर आहे, विलायची-केसर आहे आणि बंगाली मिठाईची खासियत पनीरही आहे. अतिशय सोपा आणि तितकाच जुना हा पदार्थ. सुफी परंपरेचा वारसा या पदार्थाला लाभला आहे, अशी धारणा आहे. मरणाच्या थंडीत आपण जसं डिंकाचे लाडू खातो तसाच हा पदार्थ आहे. सगळे पदार्थ पौष्टिक आणि ऊर्जा देणारे (साखर सोडल्यास). बऱ्याच लग्नांमध्येही शुफ्ता बनवतात म्हणे. कसं काय परवडते त्यांना देव जाणे! देवाने निसर्गसौंदर्यासोबत महागडे खाद्यपदार्थही दोन हस्ताने उधळले आहेत म्हणून जमत असावे. आता पाककृती अतिशय सोपी आहे. सगळा सुकामेवा पाण्यात भिजवायचा. सोबत केसरही गरम पाण्यात भिजवायचे. पनीरचे तुकडे तुपात छान कुरकुरीत परतून घ्यायचे. त्यातच साखर मिसळायची. साखरेच्या कॅरॅमल पाकात पनीरचे तुकडे आणि भिजवलेला सुकामेवा थोडा वेळ शिजू द्यायचा. केसर, विलायची वगैरे मसाले टाकून छान फ्लेवर येतो. जास्तीत जास्त अर्ध्या तासात बनू शकणारा हा पदार्थ. मऊ आणि क्रिस्पी पनीर, कुरकुरीत ड्रायफ्रुट्स आणि साखर यांचा शुफ्ता म्हणजे डेझर्टमधील स्टार्टर असावे. साखर वगळून अन्य स्वीटनर वापरून शुफ्ता बनवता आला तर पौष्टिक पदार्थात सामावला जाईल!

तोशा - सुफी परंपरेतील अजून एक पदार्थ! आता काहीसा विस्मृतीत गेला आहे. पण तरीही लोकांच्या मनात घर करून बसू शकेल इतका एकेकाळी लोकप्रिय असलेला पदार्थ. उत्तर काश्मीरमध्ये हा पदार्थ मुख्यतः बनवला जातो. हा तोशा म्हणजे दुःखाच्या आणि आनंदाच्या क्षणी आदराचेही प्रतीक आहे. कुराणाचे वाचन झाल्यावर लोकांमध्ये हा पदार्थ वाटला जायचा. बाळाचा जन्म झाला तरी ही मिठाई वाटली जायची. आपल्या पेढ्यासारखे स्थान असावे या पदार्थाचे. आता जुने पदार्थ पुनरुज्जीवित करायचे म्हणून वेगवेगळी दुकानं आणि बेकरीज् तोशा बनवतात, विकतात. बारामुल्लामधील काही दुकानात आणि कॅफेमध्ये आता तोशा मिळायला लागला आहे. या पदार्थाची पाककृती वाचल्यावर तुम्हाला अजून एका पदार्थाची आठवण येईल. मैदा, गव्हाचे पीठ किंवा बेसन पाण्यात भिजवून त्याची जाडसर पोळी तव्यावर भाजतात. गरम पोळी कुस्करून त्यात खोबऱ्याचे काप, ड्रायफ्रुट्स आणि गरम तूप टाकून छान मिसळतात. कणिकेसारखे भिजवल्यावर त्याचे लंबगोलाकृती तोशा बनवून, खसखसमध्ये घोळवतात. झाला तयार! लहानपणी पोळीचे लाडू बनवायचे ते आठवले ना? असाच पदार्थ हरियाणामध्येही बनवतात. आपल्या लाडूमध्ये पोळी पूर्ण भाजलेली असते आणि लहान तुकडे लक्षात येतात. पण तोशा अतिशय मऊसर भिजवतात. हा पदार्थही सोपाच आहे!

पदार्थ तेच असतात; पण पद्धत थोडी वेगळी असते आणि तीच तर खाद्यसंस्कृतीची खासियत आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? हे दोन्ही पदार्थ सुफी परंपरेतील आहेत, खूप लोकांसाठी बनवावे लागतात. त्यामुळे अतिशय कठीण अशी पाककृती असून चालत नाही. शिवाय काही काळ टिकायला हवे, ऊर्जा देणारेही हवे. आपल्या प्रसादाचेही हेच वैशिष्ट्य असते तसेच! तोशा या नावाचा अजून एक सिंधी पदार्थ मला सापडला पण तो तळलेल्या बालुशाहीच्या घराण्यातील आहे! असो, हे दोन्ही पदार्थ आपण नक्कीच घरी बनवून पाहू शकतो.

- सावनी