वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग - ६

युवा विवेक    17-May-2023   
Total Views |


वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग-तीन

इकडे रामा कुंडुर सावत्या माळ्याच्या देवळा मोहरे असलेल्या त्याच्या झोपडीवजा घरी आला. त्याची मायसुद्धा पहाटेची न्याहारी करून हिवताप आल्यानं काही बरं लागत नसल्यानं झोपून होती.

तो तिला दोन चार शबुद बोलला, अंग चापललं अन् झोपडीच्या एकांगाला त्यानं केलेल्या बागेत तो विरंगुळा म्हणून तिची मशागत करू लागला, तिला बघू लागला. जवळपासच्या दोन-चार घरांना रामा कुंडुरची ही बाग खूप खूप प्रिय होती.

कारण ती सगळ्यांना भाजीपाला द्यायची. तिच्यामध्ये कारले, गीलके, दोडके, चक्की, डांगर अशा अनेक वेली रामा कुंडुरने मांडव करून लावली होती. त्या मांडवात दुपारच्या भर उन्हात गारवा मिळायचा म्हणून शेजारची रामा कुंडुरच्या आईच्या वयाची लोकं तिथं येऊन बसायची. वेलींना पाणी घालायची, तिथली साफसफाई करायची.

पडत्या पावसाळ्यात बियाणे धरायला हवं म्हणून रामा कुंडुर वेलींच्या मांडवात फिरून मोठे झालेले गीलके, कारले, दोडके यांचे बियाणे काढून वाळवायला ठेऊन, बागेची मशागत करू लागला.

तितक्यात त्याचा जोडीदार त्याला दुरूनच हाक देऊ लागला. “ओ सरकार याकी इकडे उन्हातान्हात काय आंबदायला..!”

रामा कुंडुर डोळ्यांना हात लाऊन सावत्या माळ्याच्या देवळाकडे बघू लागला. जगण्या देवळाच्या जवळ असलेल्या पारावरून आवाज देत होता. भर दुपार भरून आली होती. जगण्या पारावर लोळत पडलेला होता अन् सोबत इतर गावकरी मंडळीसुद्धा याची त्याची री ओढण्यात मश्गूल होते.

संतू अण्णा तलाठी यांचा विषय निघाला की, त्याला लागून जुन्या बारबाप्या तलाठ्याचा विषय निघायचा. सारं गाव त्याचे कारनामे अन् त्याला सरपंचांनी कसं गावातून घालवलं, शेतातील घडणाऱ्या घटना असे एकुणएक विषय गावकऱ्यांच्या वळचणीला होते. त्यामुळे कसं सगळं गाव गप्पांच्या ओघात बराच वेळ घालत एकमेकांचं मनोरंजन करत असत. त्यामुळं गाव कसं एकदम सुखी होतं.

आठवड्या दोन आठवड्यातून गावातले कुणी शहरातून गावाकडे सुट्टीसाठी आले की, मग त्याच्या गप्पा ऐकण्यात पुन्हा सारं गाव मश्गूल असायचं. एकूण सगळं गाव कसं सुखी होतं.

दुपारची वेळ चारकडे कलली अन् संतू अण्णा तलाठी गावचं तलाठी हाफीस बघायचं म्हणून आवरून सावरून पारावर आले. गावकऱ्यांच्या समवेत जुजबी गप्पा करून संतू अण्णा तलाठी, रामा कुंडुर अन् जगण्याला घेऊन गावच्या मधोमध असलेल्या तलाठी हाफीसात गेले.

हाफीस बघून संतू अण्णा तलाठी यांना आनंद झाला. कारण त्याच्या सभोवताली मस्त फुलांची बाग गावकऱ्यांनी केली होती अन् हाफीसाचे कर्मचारी तिची नियमित निगा राखीत असावे. म्हणून बाग झाडा, फुलांनी बहरून निघाली होती. इतक्या उन्हातही तिचा गारवा खिडकीच्या आडून आत येत हाफीसात प्रसन्न वातावरण करून जात असत.

तलाठी हाफीस बघून संतू अण्णा तलाठी यांच्याकडे बघत रामा कुंडूर बोलू लागला..!

“कसं वाटलं तलाठी अण्णा आमच्या गावचं तलाठी हाफीस, मोप भारी हायसा की नहीं..?’’

रामा कुंडूरच्या या प्रश्नाला उत्तर देत संतू अण्णा तलाठी बोलू लागला..!

“तुमचा गाव, गावातली मंडळी अन् आता तुमचं हे हाफीस, नाद करायचा नाय बाबा वाभळेवाडीचा..! सगळं कसं झ्याक हायसा, इथं काम कराया मज्जा येईल रं रामा..!”

तितक्यात जगण्या संतू अण्णा तलाठी यांचा हात धरून त्यांना त्यांनी आतापर्यंत न बघितलेल्या गावचे सुभेदार शहीद राजू नाना काळभोर यांचे स्मृतीस्थळ दाखवले. राजू नाना गावातले पहिले व्यक्ती होते जे आपल्या देशाच्या संरक्षणार्थ देशाच्या सीमेवर जाण्यासाठी मिलिटरीत भरती झाले होते.

आठ वर्ष त्यांनी जम्मू काश्मीर, सियाचीन बॉर्डर, आसाम अशा अनेक ठिकाणी सेवा बजावली. अखेर भारत-पाकीस्तान दरम्यान झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले, ते देशासाठी शहीद झाले.

ही सगळी घडून गेलेली हकीकत रामा कुंडूर अन् जगण्या संतू अण्णा तलाठी यांना शहीद राजू नाना यांचे स्मृतीस्थळ दाखवत सांगत होते.

त्यांच्या या त्यागानंतर गावातल्या अनेक तरुणांनी राजू नाना यांची प्रेरणा घेत मिलिटरीमध्ये भरती होण्याचा चंग बांधला. अन् रात्रंदिवस मेहनत घेत गावची पन्नास-साठ पोरं आतापर्यंत सैन्यात भरती झाली होती. जिल्ह्यात वाभळेवाडी गावाला सैनिकांचं गाव म्हणून एक स्वतंत्र ओळख मिळाली होती.

क्रमशः

 

- भारत लक्ष्मण सोनवणे.