बसरख

युवा विवेक    18-May-2023   
Total Views |


बसरख

काश्मिरी बर्फाळ प्रदेशाचे सिम्बॉल म्हणून जर एखाद्या गोड पदार्थाचे नाव घ्यायचे झाले, तर हाच बसरख! पांढऱ्या शुभ्र बर्फाचा गोळा रंग टाकण्याआधी जसा दिसतो तसा हा पदार्थ. पण बाहेरून बऱ्याचदा काजू-बदाम चिटकवलेले असतात. काही दशके आधी बसरखशिवाय लग्न अपूर्ण असायचे. कारण वरपक्ष ही मिठाई वधूपक्षाकडे घेऊन जायचे. नंतरही अगदी मोठ्या बास्केट भरून सासरची मंडळी याची देवाणघेवाण करायचे. आता परत या पदार्थाची लोकांना आठवण आली आणि बेकरीमध्ये पांढरेशुभ्र बसरख आपले लक्ष वेधून घेतात. श्रीमंत लोक या मिठाईवर परत तूप, क्रीम लावायचे पण तरीही आपल्या लाडूसारखा सर्वांना हा पदार्थ आवडत होता, आहे. मी विचार केला, तिकडे "काय मग? आता यावर्षी बसरख मिळणार का खायला?" असा प्रश्न तरुण मुलामुलींना विचारत असतील ना!

मैदा, तूप आणि थोडी साखर मिसळून घेतात. खुसखुशीत होण्यासाठी तूप हवे, त्यानंतर पाण्यात घट्ट पीठ भिजवले जाते. थोडा वेळ झाकून ठेवल्यावर या पिठाला वाटीसारखा आकार देतात. त्यासाठी बत्ता वापरतात. किंवा लाकडी बत्ताच्या आकाराचा दांडा असतो तो वापरतात. याला वाटीचा आकार देण्यासाठीच वेळ लागतो. मग तुपात तळून, साखरेच्या पक्क्या पाकात घोळवून त्यावर सुकामेवा चिटकवतात. साखरेचा पाक वाळला की त्याला पांढराशुभ्र रंग येतो. आपल्या बालूशाहीसारखाच पदार्थ आहे हा. अर्थात त्या पाकात केसर, केवडा वगैरे सुगंध असतात. खवाच्या प्रकारात मैद्यासोबतच खवा मिसळतात.

श्रीनगरमधील कित्येक घराणी हा पदार्थ बनवण्यासाठी प्रसिद्ध होती. मैदा, साखर आणि तूप इतकेच पदार्थ वापरून केलेला बसरख एक कौशल्य आहे आणि कष्टाचेही काम आहे. सर्वांना तशीच चव आणि टेक्श्चर जमतेच असे नाही. गावकऱ्यांच्या मते, नव्वदच्या दशकात लहान गावांमधून तूप, मैदा येणे कमी झाले. तसेच कारागीरही कमी झाले आणि असे पारंपरिक पदार्थ मागे पडले. दहशतवादाचे परिणाम किती खोलवर होतात, हे परत एकदा जाणवते. नवीन प्रकारात खवाही असतो. नवीन बसरख तोंडात विरघळतात आणि पारंपरिक बसरख किती तरी दिवस छान खुसखुशीत राहायचे. दोन्हीची वेगळी खासियत आहे.

असे अजून बरेच वेगवेगळे पदार्थ आहेत. खजिना आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

- सावनी