‘सेल्फी’श जगाची अस्वस्थता

युवा विवेक    26-May-2023   
Total Views |


‘सेल्फी’श जगाची अस्वस्थता

सेल्फी घेणं, फोटो-स्टोरीज पोस्ट करणं हे आज स्मार्टफोन्सच्या काळात नवीन राहिलेलं नाही. फ्रंट कॅमेरा मोबाईलमध्ये आला आणि स्वतःच स्वतःचा फोटो काढणं या आगळ्यावेगळ्या अनुभवाला जगभरातले लोक सामोरे गेले. आत्ता तर छोटी मुलंदेखील यात तरबेज झाली आहेत. तरुणांना तर सेल्फी या प्रकाराचं प्रचंड आकर्षण आहे आणि सवयही. अति झालं हसू आलं अशी मराठीत एक म्हण आहे. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की तिचं कुतुहल नष्ट होऊन ती हास्यास्पद ठरते. सेल्फींची सवय तर त्याच्याही पुढे जाऊन गंभीर रूप धारण करते आहे.

मोबाईल विश्वाने गेल्या काही वर्षांत नवनवीन सुविधा असणारे अनेक फोन बाजारात आणले. तसे ते सतत येतच असतात. आताच्या घडीला तर डीएसएलआर सारखा कॅमेराचा दर्जा असणारे फोन बाजारात आहेत. यासाठी महत्त्वाचे निकष दोनच. तुमचं बजेट आणि वापर किती असणार आहे. पण आताच्या घडीला वेगवेगळ्या बजेटचे फोन बाजारात उपलब्ध आहेत. त्याच जोडीला फोटो व्हिडिओ शेअर करण्यासाठी सोशल मीडियासारखं माध्यमही आहेच. त्यामुळे सतत काही ना काही कारणाने किंवा कधीतरी उगीचच #randomselfie म्हणून फोटो क्लिकत बसण्याची अनेकांना सवय असते. मग कधी कधी तो सेल्फी चांगला येईपर्यंत फोन, हात आणि मन त्यातच गुंतलेलं असतं. मनासारखा फोटो येईपर्यंत किती वेळ जातो, हे अनेकांच्या लक्षातही येत नाही. हळूहळू या सेल्फी प्रकरणाचं माणसाला कसं व्यसन लागत जातं, हे त्याचं त्यालाही कळत नाही.

२०१३ साली सेल्फी हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट करण्यात आला. सेल्फीच्या वेडापायी काही वर्षांपूर्वी सेल्फी स्टिक, सेल्फी शू किंवा सेल्फी स्टॅंडही मिळू लागले. उत्तम सेल्फी कसे काढावेत, सेल्फीसाठी वेगवेगळ्या पोझेस कोणत्या, सेल्फीतील नवनवे ट्रेण्डस कोणते, त्याच्या शेअरिंगसाठी वापरले जाणारे हॅशटॅग कोणते अशी वेगवेगळी माहिती आंतरजालावर म्हणजेच इंटरनेटवर उपलब्ध आहे. काही वेळा ऑनलाईन-ऑफलाईन पद्धतीने बेस्ट सेल्फी स्पर्धाही आयोजित केली जाते. काही वेळा डिजिटल मार्केटिंगसाठीही सेल्फीचा वापर केला जातो. मी हे सेल्फीविषयीची माहिती देण्यासाठी हे लिहित नाहीये, तर वेगवेगळी प्रलोभनं कशाप्रकारे तुमचं व्यसन वाढवण्यात मदत करत असतात ते सांगण्यासाठी हा प्रपंच.

अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे सेल्फी काढण्याचं वेड असतं. हल्ली तर नटणंही त्यासाठीच होतं असं मला कधीकधी वाटतं. वेगवेगळे कपडे, छानसा मेकअप, सुंदरशी केशरचना केल्यावर तुम्ही सेल्फी काढत नसाल तर तो गुन्हाच आहे की काय असंच जणू अनेकांना वाटतं. मुळात हे सगळं सगळ्यांना दाखवण्यासाठी केलं जातं. कारण जो कोणी सेल्फी काढतो तो कुठे ना कुठे शेअर नक्की करतो. सेल्फी काढणं आणि ते पोस्ट करणं चूकच आहे असं नाही. अनेकदा समाजातील मान्यवर लोकही सेल्फी काढत असतात. कलाकार, राजकारणी, समाजसेवक असे अनेक लोक सेल्फी काढून शेअर करत असतात. एखाद्या उपक्रमाची दखल घेण्यासाठीही त्याचा वापर होतो. त्यामागचा हेतू चांगला असतो.

अनेकांचा आपला चांगला सेल्फी येईपर्यंत चैन पडत नाही. या चांगला सेल्फी घेण्याच्या वेडाचे व्यसनात कधी रुपांतर होते हे अनेकांच्या लक्षात येत नाही. गेल्या काही वर्षांत सेल्फिटिस किंवा सेल्फायटिस ‘Selfitis’ नावाची संकल्पना यासाठी वापरली जाते. सेल्फी काढण्याच्या सवयीचा माणसाच्या मनावर होणारा परिणाम किंवा बदलती मानसिकता यावर हा आजार ठरतो. यात तीन प्रकारचे स्तर असतात १. बॉर्डरलाईन सेल्फिटिस – एखादी व्यक्ती सतत सेल्फी घेत असेल, पण समाजमाध्यमांवर शेअर करत नसेल तर ती बॉर्डरलाईनवर असते. २. ऍक्युट सेल्फिटिस – एखादी व्यक्ती सतत सेल्फी काढत असेल व ते सोशल मीडियावर टाकत असेल. ३. क्रॉनिक सेल्फिटिस – सेल्फी न काढल्यास एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा सतत सेल्फी काढण्याची सवय असेल व त्यापासून ती स्वतःला रोखू शकत नसेल तर त्याला क्रॉनिक सेल्फिटिस असू शकतो. याव्यतिरिक्त चांगला सेल्फी येईपर्यंत क्लिक करत राहाणे आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यावर लाईक्स व कमेण्ट्स पडताळत राहणे हे देखील सेल्फीच्या व्यसनाचेच अंग आहे. सेल्फिटीस ग्रस्त व्यक्तींना अनेकदा एकटेपणाची भावना मनात तयार होते. स्वतःच्या रुपाबद्दल गर्व किंवा न्यूनगंडाची भावना तयार होऊ शकते, शरीर सतत शेपमध्ये ठेवणं ही सेल्फीसाठीची (आरोग्यासाठीची नाही) गरज वाटू शकते, तसे न राहिल्यास ताण येऊ शकतो, नातेसंबंध बिघडू शकतात, सेल्फी चांगले येत नसल्यास आत्मविश्वास कमी होऊ शकतो...असे अनेक मानसिक बदल सेल्फीच्या सवयीमुळे होऊ शकतात.

आज अनेकांना सेल्फीज काढण्याचं तंत्र जसं विकसित झालंय तसंच त्याची सवयही लागली आहेत. अनेक लहान मुलं किंवा पाळीव प्राणीही बरोबर कॅमेऱ्यात पाहून सेल्फी काढतात किंवा काढू देतात. इतकं हे प्रस्थ वाढलं आहे.. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचं वेड असतं. धबधबा, खळाळणारी नदी, मुसळधार पावसातले रस्ते-जलप्रवाह, गडकिल्ले, डोंगरदऱ्या, उंच इमारती, निबीड अरण्य अशा विविध ठिकाणी जाऊन लोक सेल्फी काढतात. अनेक तरूण सेल्फीपायी निरनिराळे स्टंटही करतात. म्हणजे चालत्या रेल्वेच्या दारात, डोंगरकड्याच्या टोकावर, वाहत्या पाण्यात उभे राहून, धबधब्याखाली उभे राहून, स्विमिंग करताना सेल्फी काढले जातात. पण अनेकदा अशा ठिकाणी पाय घसरल्यामुळे, तोल गेल्याने, अपघात होऊन, पाण्यात वाहून जाऊन लोकांचा जीव गेला आहे. दरवर्षी पेपरमध्ये पावसाळ्यात जलस्रोतांजवळ, निसर्गरम्य स्थळी किंवा समुद्रकिनारी सेल्फी घेताना जीव गेल्याच्या दोन तीन तरी बातम्या येतातच. बातम्या वाचल्यावर एक दोन दिवस त्याची चर्चा होते. पण उपयोग मात्र काहीच होत नाही. अनेकांना आपण कुठे आहोत हे फोटो काढून लगेचच स्टेटस शेअर करण्याची सवय असते. पण यामुळे आपला ‘लाईव्ह’ ठावठिकाणा एकाच वेळी मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचतो. घर बंद असेल तर घरातील मौल्यवान सामानाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहातो. त्याच्याच जोडीला वर उल्लेख केलेला सेल्फिटिस आहेच. अनेकांना यापासून मुक्त होण्यासाठी बिहेविअरल थेरपीची गरज भासते.

या सेल्फीच्या सवयीपासून दूर राहण्यासाठी आपण काय करू शकतो? सतत सेल्फी काढण्याचा मोह आवरणं, एकदा चांगला न आल्यास परत परत सेल्फी न काढणं, सेल्फीज सोशल मीडियावर शेअर करण्याची भावना आवरणं, बाहेर फिरायला गेल्यास फोन बंद ठेवणं वा फक्त कामापुरता वापरणं, मनात सेल्फी काढण्याची इच्छा निर्माण झाली तर हे मी टाळलं तर काय नुकसान होईल, असा प्रश्न स्वतःला विचारणं अशा छोट्या छोट्या बदलांनी सेल्फीची ही सवय नक्की सुटू शकते व सेल्फीमुळे येणाऱ्या अस्वस्थतेतूनही मुक्तता मिळू शकते.

 
- मृदुला राजवाडे