वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग -४

युवा विवेक    03-May-2023   
Total Views |


 
वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग-तीन
पहाटेच्या चारला रानातली लाईन येणार अन् रानात गव्हाला पाणी भरायला म्हणून गावातील लोकं उठून रानाच्या दिशेनं आपलं आवरून सावरून निघाली होती. गावाच्या जवळ असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे गावची तरुण पोरंही सहा वाजता गावच्या फाट्यावर येणारी बस अन् तिचा अंदाज घेत गावच्या सडकीनं निघाली होती. गावातली काही शेतकरी पहाटेच वावरातला अख्खर साफ करायला, दूध काढायला म्हणून जातांना सडकीने दिसत होती.

कोंबड्याच्या बांगेसरशी सूर्योदय झाला अन् तांबडा पिवळसर सूर्याचा कोवळा प्रकाश साऱ्या पंचक्रोशीवर आला तसे गावाला सोनेरी लकेरीत मडवावे तसं गाव चमचम करू लागले होते. गावातली लगबग सुरू झाली तसं, गावातली म्हातारी माणसं आपलं सकाळचे अंघोळपाणी करून सावता माळ्याच्या देवळात दर्शन करायला म्हणून देवळाकडे निघाले होते.

रामा कुंडूरसुद्धा कोंबड्याच्या बांगेसरशी उठला शिवनामायच्या पात्रात जाऊन अंघोळ करून देवपूजा करून तो लक्षी आईच्या पिंपळ पारावर येऊन बसला. संतू अण्णा तलाठी अजून झोपलेले पाहून त्यांना उठवत रामा कुंडूर लक्षी आईच्या पिंपळ पार झाडून घेऊ लागला.

पस्तीशीत असलेला रामा कुंडूर पहाटे कुणी त्याला बघितलं की विठू माउली त्याच्यात वास करते की काय इतका प्रसन्न तो दिसायचा. पांढरे शुभ्र धोतर घातलेला, कपाळी टिळा लावलेला अन् डोक्यावर गांधी टोपी घातलेला तो दिसला की गावातली चालती लोकं थांबून त्याची विचारपूस करी तोही लोकांची विचारपूस करायचा सारं गाव त्याची बायको त्याला सोडून गेली तसे त्याच्यासाठी हळहळ करत होते. कारण अख्ख्या पंचक्रोशीत रामा कुंडूरसारखं इमानी अन् प्रामाणिक, मनमिळावू असं कुणी नव्हतं; त्यामुळं सारं गाव त्याचं गुणगान गायचं.

रामा कुंडूरनं लक्षी आईचा पिंपळ पार झाडला. तितक्यात संतू अण्णा तलाठी उठून जवळ असलेल्या तांब्याला नदीच्या अंगाला गेले. तेही अंघोळपाणी करून पत्री सुटकेशीत आपला कोरा इस्त्री केलेला ड्रेस काढून त्यांनी घातला अन् ते पारावर बसून राहिले. आता कुठे संतू अण्णा तलाठी रुबाबदार तलाठी वाटत होते.

एरवी आठ वाजून गेले होते. आज रविवारचा दिवस असल्यानं संतू अण्णा तलाठी यांना शासकीय सुट्टी होती त्यामुळं त्यांना आजच्या दिवसात खोली बघून त्यांचं बस्तान बसवणे होतं. आठ वाजले तसं पारावर गावचे पोलीस पाटील, सरपंच अन् इतर मान्यवर सदस्य आले अन् त्यांनी गावात नव्यानं शिकाऊ तलाठी म्हणून रुजू झालेल्या संतू अण्णा तलाठी यांचं गावच्या परंपरेनुसार पारावर शाल, श्रीफळ देऊन स्वागत केलं.

तलाठ्याची तात्पुरती राहण्याची व्यवस्था म्हणून गावचे पोलीस पाटील धोंडू अण्णा पाटील यांच्या वाड्यात असलेल्या परसदारच्या खोलीत केली. रामा कुंडूर आणि जगण्या संतू अण्णा तलाठी यांचं सगळं सामान डोईवर घेऊन पोलीस पाटील यांच्या वाड्यावर घेऊन तलाठी अण्णा यांचं तात्पुरते बस्तान त्यांनी थाटून दिले.

संतू अण्णा तलाठी यांचं गावच्या मान्यवर लोकांनी स्वागत केलं. त्यांना गावातली जूनी शाळा, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, अश्या सगळ्या जून्या सरकारी इमारती दाखवल्या. भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या काही दशकाभराने या इमारती उभारल्या गेल्या होत्या, आजही त्या डौलात उभ्या होत्या.

गावातल्या म्हाताऱ्या लोकांच्या आठवणी असो किंवा तरुण लोकांची सरकारी कामे, शेतीची कामे, गावात कुणी लहानगा जन्माला आला की त्याची नोंद हे सर्व आजही या जुन्या इमारतीमध्ये होत असल्यानं गावाची या इमारतीसोबत अन् इथे सरकारी काम करणाऱ्या सर्व नोकरदारांसोबत नाळ जोडलेली होती.

आजवर गावात संतू अण्णासारखे कित्येक तलाठी, ग्रामसेवक, इतर अधिकारी अन् कित्येक इतर माणसे येऊन गेली. गावच्या लोकांनी त्यांना घरच्या माणसांसारखे सांभाळले. त्यामुळं अनेक सरकारी नोकरदारांना बदली झाली की गाव सोडताना गहीवरून यायचं.

याला अपवाद काही नोकरदार खोडीचे निघायचे, पण गावकरी त्यांनाही आपल्यात सामावून घेत आपलेसे करून आपले काम करून घेत असत. परंतू त्यांच्या बदलीमुळे गावाला सुतुक पडावं किंवा दुःख व्हावं असं काही होत नसे.

हे सगळं गावचे पोलीस पाटील संतू अण्णा तलाठी यांना सांगत असताना गावच्या जून्या बारबाप्या तलाठीचे खुलासे देत सांगत की, तो किती खोडीचा होता. त्यानं कशी कामात दखलांदाजी केली. मग गावाने त्याला नकळत वरच्या साहेबांना अर्ज देऊन कशी त्याची बदली करून घेतली.

क्रमशः

 

- भारत लक्ष्मण सोनवणे