टीडीएमच्या निमित्ताने

युवा विवेक    08-May-2023   
Total Views |


टीडीएमच्या निमित्ताने

शनिवार, दिनांक मे १९१३ ला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय बोलपट प्रदर्शित झाला. त्या घटनेला ह्याच मे महिन्यात ११० वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतात हे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान रुजविण्याचा मान दादासाहेब फाळके ह्यांच्या रूपाने एका मराठी माणसाला जातो, याचा समस्त मराठीजनांना अभिमान आहे. दादासाहेब फाळके ह्यांच्या आधी दादासाहेब तोरणे यांनी देखील ह्या स्वरूपाचा प्रयत्न केला होता. त्याही आधी हरिश्चंद्र भाटवडेकर ह्या मराठी माणसानेच चित्रीकरण ह्या संकल्पनेची भारतात मुहूर्तमेढ रोवली होती. ह्या सर्व पहिलेवहिलेपणाचा मान मराठी मुलखातच असल्याने किंबहुना व्यावसायिक रंगभूमीची समृद्ध परंपरासुद्धा मराठी मातीत पूर्वापार होती. त्यामुळे चित्रपट त्याअनुषंगाने येणाऱ्या सर्व व्यावसायिक गोष्टींच्या वाढीसाठी महाराष्ट्राची सांस्कृतिक भूमी पोषक होती; पण खेदाने म्हणावेसे वाटते की, अपवाद वगळता मराठी चित्रपटांची दुरावस्था हा माध्यमांमध्ये पूर्वीपासुनच सातत्याने चर्चेचा विषय राहिला आहे.

ही सर्व पूर्वपीठिका सांगायचं कारण म्हणजे, गेल्याच आठवड्यात भाऊसाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित टीडीएम ह्या मराठी सिनेमाला शो मिळत नसल्याने पर्यायाने आपला सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याने अश्रू अनावर झालेल्या भाऊसाहेब ह्यांचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत राहिल्या. अस्सल गावरान मातीतला सिनेमा काढणारा दिग्दर्शक अशी भाऊसाहेब ह्यांची ख्वाडा’ आणि बबननंतर ख्याती झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर लागल्याने त्यांच्या दर्जाविषयी सुद्धा शंका घेण्यास कारण राहिलेले नाही. नागराज मंजुळे ह्यांनी ज्याप्रकारे प्रस्थापित अभिनेते घेता सिनेमाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेले नवोदित कलाकार घेऊन फँड्री’ आणि सैराटद्वारे इतिहास घडवला. त्याच वाटेने जात भाऊसाहेब ह्यांनी देखील स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवले आहे. परंतु दोन सिनेमांचा अनुभव आणि प्रसिद्धी पाठीशी असताना देखील भाऊसाहेब ह्यांच्यावर अशी भावनिक आवाहन करण्याची वेळ का आली? हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे.

सिनेसंस्कृती मराठी मातीत रुजली खरी; पण तिचा एकंदर मराठी भाषेला किंवा मराठी कलावंताना हवा तसा फायदा अपवादानेच झाल्याच दिसून येते. मुंबईतच हिंदी सिनेमा वाढल्याने आणि त्यातही कपूर - खान अशा अमराठी लोकांचे प्राबल्य राहिल्याने मराठी भाषिक आपल्याच राज्यात तसे उपेक्षितच राहिले. लता मंगेशकर, आशा भोसले, माधुरी दिक्षित, नाना पाटेकर असे मोजके अपवाद सोडले तर मराठी कलावंताना तुलनेत दुय्यम स्थानच मिळाले. सिनेसृष्टीची व्यावसायिक गणिते पचनी पडल्याने आचार्य अत्रे, बालगंधर्व, पु.. देशपांडे अशी ख्यातनाम मंडळी देखील थोडेफार सिनेमे करून ह्या क्षेत्रापासून अंतर राखून राहिली.

आचार्य अत्रे ह्यांच्या श्यामची आई सिनेमाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर एका सत्कार सभेत ते वैफल्याने म्हणाले की, ‘जेवढे हात इथे टाळ्या वाजविण्यासाठी जमले आहेत, तेवढ्या हातांनी जर तिकीट घेण्यास गर्दी केली असती तर कदाचित माझी परिस्थिती बिकट झाली नसती.’

‘गुळाचा गणपती ह्या सिनेमात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेपासून कथा, लेखन, दिग्दर्शन या सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर देखील आपली आर्थिकदृष्ट्या फसवणूक झाली आहे, हे लक्षात आल्यानंतर पु.. देशपांडे ह्यांनी एक होता विदुषकची कथा वगळता ह्या क्षेत्राला कायमचा राम राम ठोकला. एवढेच नाहीतर ज्या दादासाहेब फाळके ह्यांनी ह्या क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली, त्यांच्या नशिबीदेखील अंतिमसमयी विपन्नावस्था आली होती.

महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर ह्यांनीदेखील दीर्घकाळ मराठी सिनेमाचा प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवला. पण हिंदी भाषिक चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर त्यांना अपवादानेच यश मिळाले.

या साऱ्या पार्श्वभूमीवर प्रश्न पडतो की ह्या क्षेत्राची व्यावसायिक गणिते मराठी सिनेकर्मीना का कळत नाहीये? आधीच महाराष्ट्र शाहीर रिलीज होत असताना आपला प्रेक्षकवर्ग विभागला जाऊ शकतो, ह्याचे भान भाऊसाहेब कऱ्हाडे ह्यांना नसावे का? आयपीएल जोरात चालू असताना आणि सलमानचा किसीका भाई किसीकी जान’ रिलीज होत असताना भावी संकटाची जाणिव त्यांना नसावी का?

पण ह्याबाबतीत फक्त भाऊसाहेब ह्यांना दोष देऊन कसे चालेल? कारण पुढच्याच आठवड्यात सरी, बलोच, तेंडल्या, मराठी पाउल पडते पुढे असे चार-पाच सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले. यापूर्वीदेखील सात मराठी सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित करण्याचा अव्यावहारिकपणा मराठी निर्मात्यांनी केला होता. हे पाहता मराठी प्रेक्षक सिनेमागृहाकडे फिरकत नाही ह्या म्हणण्यात तथ्यचं राहत नाही.

वेड, धर्मवीर, हंबीरराव, पावनखिंड ह्या सिनेमांनी गेल्या काही दिवसात चांगली कमाई केली होती. कंटेंट चांगला असेल आणि प्रसिद्धी चांगली असेल तर प्रेक्षकांची पाउले थिएटरकडे वळतात, हे वारंवार सिद्ध झाले आहे. पण सातत्याने नवीन कलावंत, अडनिड विषय, ट्रेंडबाहेर जाऊन काहीतरी करण्याचा हव्यास हा जुगार अंगाशी येणाराच आहे.

खुद्द ह्याच क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्दर्शक प्रविण तरडे ह्यांनी हे एका मुलाखतीतून सांगितले की हा एक व्यवसाय आहे आणि व्यवसाय हा व्यवसायाप्रमाणे करावा. आपण समाजसेवा करायला आलेलो नाही.” तरडे ह्यांचे वक्तव्य कटू वाटले तरी वास्तवास धरून आहे. कारण हंबीरराव चांगला चालतो आहे हे पाहून थिएटर मालकांनी रणवीर सिंगसारख्या आघाडीच्या अभिनेत्याच्याजयेशभाई जोरदारसिनेमाचे शो कमी करून हंबीररावला स्क्रीन दिल्या होत्या.

हे पाहता मराठी सिनेमांची सशक्त यशस्वी व्यावसायिक वाटचाल आजमितीस अवघड वाटत असली तरी अशक्यप्राय अशी नाहीये. कारण एक काळ असा होता की, "ओव्हरसिज रिलीज झालेल्या पहिल्या भारतीय सिनेमाचा मान संत तुकारामला मिळाला होता. लॉगेस्ट रनिंग रिजनल सिनेमाचा रेकॉर्ड माहेरच्या साडीचा होता. सलग सिल्व्हर ज्युबिली सिनेमे देण्याचा रेकॉर्ड दादा कोंडकेच्या नावावर होता. प्रभातचे सिनेमे इतर भारतीय प्रादेशिक सिनेमांपेक्षा सरस आहेत, हे मत सत्यजित रेंसारखे दिग्गज पण मान्य करत.

हा सुवर्णकाळ परत येऊ शकतो!!! गरज आहे ती व्यावसायिक भान राखत संघटित प्रयत्नांची!!

- सौरभ रत्नपारखी