हॅशटॅगचं कूळ आणि मूळ

युवा विवेक    09-May-2023   
Total Views |


हॅशटॅगचं कूळ आणि मूळ

#love #Couplegoals #exercising #lifegoals #bollywood #trending #WFH #Covid #अमुक #तमुक असे शब्द पोस्टमध्ये येतातच. सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. त्यातही सर्वाधिक महत्त्व आलंय ते हॅशटॅगला. आपली कोणतीही पोस्ट किंवा स्टोरी ही हॅशटॅगशिवाय पूर्णच होत नाही. जेवणात जसं मीठाचं महत्त्व तेच पोस्टमध्ये हॅशटॅगचं. पदार्थात एखादा घटक नसेल तरी चालेल पण मीठ हवंच. पण मग अत्यंत महत्त्वाचा असा हा हॅशटॅग आहे तरी काय? त्याची सुरुवात कशी झाली? हॅशटॅगच्या वापराचे फायदे कोणते? हे जाणून घेऊ या.

सोशल मीडियाच्या चावडीवर जगभरातले नेटिझन्स जवळपास रोज भेटत असतात, एकमेकांशी जोडले जातात. सध्याच्या घडीला त्यांना जवळ आणणारा महत्त्वाचा घटक आहे हॅशटॅग. फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, पिंटरेस्ट, गुगल+, युट्यूब अशा विविध समाज माध्यमात हॅशटॅग नेहमीच वापरला जातो. तुम्हाला सर्वाधिक वापरलेले हॅशटॅग कोणते माहिती आहेत का? #love, #instagood, #beautiful , #fashion, #happy, #follow , #repost, #selfie, #food हे काही सर्वाधिक वापरले जाणारे हॅशटॅग्स आहेत. आज ट्रेंडिंग असलेलं हॅशटॅगचं चिन्ह प्रथम कोणी वापरलं? मुळात अमेरिकन किंवा कॅनडियन नागरिकांच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर हॅशटॅग हे पाऊंड या चलनाचं चिन्ह तर ब्रिटिशांच्या मते ते हॅशचं चिन्ह. १९८८ मध्ये इंटरनेट रिले चॅट नावाच्या प्लॅटफॉर्मवर या हॅशटॅगचा वापर पहिल्यांदा करण्यात आला होता. हवी ती माहिती एका क्लिकच्या आधारे शोधणं सोपं व्हावं, माहितीचं एकाच चिन्हाखाली संकलन (ग्रुपिंग) व्हावं, या उद्देशाने हा हॅशटॅग वापरला गेला. त्यानंतर २००७ साली ख्रिस मेसिना या अमेरिकन प्रोडक्ट डिझायनरने सर्वप्रथम आपल्या ट्वीटमध्ये हॅशटॅगचा वापर केला. आपण ऑनलाईन चॅटरूम्समधून या हॅशटॅग वापराची संकल्पना उचलल्याचे मेसिना सांगतात. २३ ऑगस्ट २००७ रोजी #barcamp हा हॅशटॅग त्यांना सर्वप्रथम वापरला. स्वतः वापरला तसा मित्रांनाही हॅशटॅग वापरण्याचा सल्ला दिला. ऑक्टोबर २००७ मध्ये मेसिना यांच्या मित्राने सॅनडिआगोमध्ये लागलेल्या आगीसंबंधी ट्वीट करताना #sandiegofire हा हॅशटॅग वापरला व तो कमालीचा प्रसिद्ध झाला आणि वापरलाही गेला. रिअल टाईमिंग म्हणजे प्रत्यक्ष घटनेच्या काळात हे ट्वीट झाल्याने त्याचा प्रभावही तितकाच प्रभावी ठरला. या हॅशटॅगच्या आधारे सर्वसामान्य लोकांना एकाच प्रश्नासंबंधी जगभरात सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होता आले. ही आयडिया ट्वीटरने उचलली आणि हॅशटॅगचा पर्याय २००९ मध्ये ट्वीटर सर्चमध्ये उपयोगात आणला. इन्स्टाग्राम २०१० साली सुरू झालं. तेव्हा हॅशटॅग वापराच्या पर्यायासहच सुरू झालं. २०१३ साली फेसबुकनेही हॅशटॅग पद्धती वापरासाठी खुली केली. लिंक्डइनवरही आपला कंटेंट हॅशटॅगसह शेअर करता येतो. रोमन लिपीसह देवनागरी किंवा तत्सम अन्य लिपींमध्येही हॅशटॅग तयार करता येतो व वापरता येतो. व्यापक उपयोगामुळे ऑक्सफर्डने हा शब्द आपल्या डिक्शनरीमध्ये जोडला. आज अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हॅशटॅगचा वापर करतात. हॅशटॅग हा मेटाटॅगिंगचा एक प्रकार आहे. म्हणजे एका हॅशटॅगखाली त्या माध्यमात शेअर झालेला सगळा मजकूर एका क्लिकवर मिळू शकतो. हे हॅशटॅग कीवर्डसारखे सर्च इंजिनमध्ये वापरले जातात. अर्थात त्यांचा जेवढा वापर तेवढेच सर्च आपल्याला उपलब्ध होतात. एखाद्या शब्दाला हॅशटॅग लावल्यामुळे त्याची एक लिंक तयार होते आणि अशा शब्दांवर आपण क्लिक केल्यावर तो शब्द इंटरनेटवर जिथे जिथे उपलब्ध आहे तिथे त्या संबंधित पोस्ट्स, व्हिडिओज आपल्याला दिसायला लागतात.

सर्वसामान्य माणसासाठी हॅशटॅग हे आज जणू काही पोस्ट्सचा अनिवार्य भाग झाले आहेत. ज्यांना त्या ट्रेण्डचा भाग व्हायचंय वा चर्चेत सहभागी व्हायचंय, एखाद्या गोष्टीचं कौतुक करायचंय किंवा टीकाटिप्पणी करायची आहे ते त्या संबंधित हॅशटॅगचा वापर करून सहभागी होतात. मग ती ट्वीटरसारखी मायक्रोब्लॉगिंग साईट असो वा फेसबुक-इन्स्टाग्राम वा लिंक्डइन. समाज माध्यमांवर एखादा विषय ट्रेण्ड करण्यासाठी काही हॅशटॅग तयारही केले जातात. उदाहरणार्थ राजकीयदृष्ट्या एखादी महत्त्वाची घटना, मनोरंजन क्षेत्रातील घटना, सामाजिक-सांस्कृतिक-पर्यावरण-संरक्षण विषयातील महत्त्वाच्या घटना, वेगवेगळ्या चळवळी या ट्वीटरवर किंवा अन्य समाज माध्यमांवर हॅशटॅगच्या आधारे ट्रेण्ड केल्या जातात. #metoo #blacklivesmatter #thekeralastory #adipurush #TATAipl #neerajchopra ही नजीकची काही उदाहरणं. या हॅशटॅगअंतर्गत संबंधित विषयांवर नेटिझन्स मतप्रदर्शन करतात, ट्रोल करतात, रोस्ट करतात. इन्स्टाग्रामवर फोटो किंवा व्हिडिओ रुपात कंटेंट शेअर करताना दिसतात, त्यालाही हॅशटॅग लावला जातो. काही वेळेस एखाद्या कार्यक्रमाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी हॅशटॅग तयार करून ट्रेण्ड जनरेटही केला जातो. नेटिझन्सही त्यात सहभागी होतात, कंटेंट तयार करतात, समर्थनीय-विरोधी अशी वेगवेगळी मते मांडली जातात. सर्वात महत्त्वाचे काय तर त्याची चर्चा होते आणि त्याद्वारे प्रसिद्धीही होते. ट्वीटर हॅशटॅग आणि गाण्यांवर तयार केली जाणारी रिल्स ही सध्याची प्रसिद्धीची अद्ययावत स्टॅटिजी आहे.

आपण जेव्हा एखादा हॅशटॅग वापरतो तेव्हा तो आपल्या कंटेंटला किंवा तयार केलेला मजकुराशी संबंधित आहे ना हे पाहणं अत्यंत गरजेचं असतं. जो कंटेंट आपण तयार केला आहे त्याबाबत आपण स्पष्ट आहोत ना? याबद्दल स्वतःला प्रश्न विचारणंही आवश्यक असतं. जर आपण इन्स्टाग्रामसाठी एखादा हॅशटॅग वापरत असू तर त्या हॅशटॅगमुळे आपला कंटेंट सार्वत्रिक होणार आहे किंवा त्या हॅशटॅग अंतर्गत लोकांच्या नजरेत येणार आहे हेही ध्यानात असलं पाहिजे. हे आपल्याला चालणार आहे ना याबाबत आपली भूमिका नक्की असली पाहिजे. तत्पूर्वी तो हॅशटॅग वापरून लोकांनी कोणत्या स्वरुपाचा कंटेंट शेअर केला आहे ते ही पाहिलं पाहिजे. उदा. तुम्ही समजा #couplegoals #couple असा हॅशटॅग वापरत असाल तर इतरांनी कशा स्वरुपाचा कंटेंट त्याबाबत शेअर केला आहे ते पाहिलं पाहिजे. समजा तो कंटेंट आक्षेपार्ह असेल तर आपला कंटेंट आक्षेपार्ह कंटेंट पाहणाऱ्यांच्या नजरेत येऊ शकतो. ते आपल्याला चालणार आहे ना? एखाद्या महत्त्वपूर्ण विषयावरील मत बहुसंख्यांच्या नजरेत येणं आपल्याला रुचणार आहे ना? याबाबत पूर्ण विचार करून मगच तो हॅशटॅग वापरणं योग्य ठरतं.

अनेक ऍप्स, ब्लॉगिंग ऍप्स, फोटो शेअररिंग ऍप्स अशी सोशल मीडियाने आपल्याला अनेक आयुधं दिली. त्याच्या वापरातलं सध्याचं एक महत्त्वाचं साधन म्हणजे हॅशटॅग. हॅशटॅगच्या निर्मितीला १५ वर्षं पूर्ण झाली आहेत आणि सध्या सोशल मीडियावरील तो एक महत्त्वाचा घटक झाला आहे. त्याचा वापर जरूर करावा पण विचाराने आणि विवेकाने.

- मृदुला राजवाडे