आजचा समाज आणि समाजमाध्यमे...

12 Jun 2023 13:24:01


आजचा समाज आणि समाजमाध्यमे...


माणूस हा कायमच इतर प्राण्यांपेक्षा वेगळा म्हणून जगत आला आहे.

एकट्याने राहण्यापेक्षा चारचौघात म्हणजेच समाजात राहणं त्यास अधिक प्रिय आहे. एखाद्या व्यक्तीसोबत संवाद साधल्याशिवाय तो जगू शकत नाही. मग हा संवाद चर्चा, विचारपूस, मतभेद इ. पैकी कोणत्याही प्रकारचा असू शकतो. आपले विचार इतरांसमोर मांडणं हा मनुष्याचा आवडता छंद. एका ठराविक काळापर्यंत आपले विचार इतरांसमोर मांडण्यासाठी फक्त वर्तमानपत्राचा वापर केला जात असे. हळूहळू त्यात रेडिओ आणि दूरदर्शनची भर पडत गेली. मात्र यातील संवाद हा एकेरी होता. त्यानंतर मनुष्याच्या हातात आला मोबाईल आणि त्यातील सोशल मीडिया ॲप्स. ज्यामुळे झालं असं की, एकेरी संवाद संपुष्टात आला आणि दुहेरी संवाद साधत या समाज माध्यमांमुळे अगदी खेड्यातल्या मुलाला सुद्धा जगाच्या दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या व्यक्तीसोबत संवाद साधता येऊ लागला. थोडक्यात समाज एकत्र आला; पण मग एका ग्रीक तत्वज्ञान्याने म्हंटल्याप्रमाणे बदल हा एकमेव स्थिर घटक आहे आणि तसा तो झाला. काळात, माणसात, समाजात आणि समाजाच्या मानसिकतेमध्येसुद्धा....

समाज माध्यमांमुळे समाजातील प्रत्येकाला आपल्या कल्पना, विचार इतरांसमोर निर्भिडपणे मांडता येऊ लागल्या, नवीन गोष्टींची निर्मिती होऊ लागली. पूर्वीच्या भारतीय समाजाचा जर आपण विचार केला तर काही ठराविक घटकांच्याच समस्या या पुढे येत असत. स्त्रिया आपली मत मांडण्यास घाबरत असतं; पण आज समाज माध्यमांनी स्त्रियांची मानसिकता आपल्याला हे बोलण्याचा अधिकार नाही इथपासून ते मला एखादी गोष्ट करण्याची आवड आहे आणि तो माझा हक्क आहे इतक्या प्रमाणात बदलली आहे. उद्योग करणं हा आपला मार्ग नाही अशी मानसिकता असणारे अनेक कुटुंबीय, भारतातील युवा पिढी आणि अनेक स्त्रिया गेल्या काही वर्षात समाज माध्यमांचा वापर करत नवीन लघु उद्योग सुरू करून आज समाजाच्या तळागाळात पोहचत आहेत. समाज माध्यमांनी समाजाला नवीन काहीतरी शिकण्याची आणि शिकवण्याची सवय लावलेली आपल्याला दिसू शकते. कारण, आज प्रत्येक जण आपल्याकडे असणारी कला, आपले गुण इतरांना दाखवतोय, शिकवतोय आणि शिकतोय सुध्दा. भारतीय समाजसुद्धा वेगवेगळ्या कला आणि संस्कृतीमधील शिकवणी आत्मसात करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. आज अनेक गोष्टींबाबत भारतीय समाजामध्ये जो पूर्वग्रहदूषितपणा होता तो कुठे तरी समाज माध्यमांमुळे नाहीसा झाला आहे; पण ही झाली नाण्याची एक बाजू...

दुसरी बाजू जर आपण बघायला गेलो तर ती असते नाण्याची किंमत दाखवणारी बाजू. ज्या बाजूला अधिक महत्त्व देणं गरजेचं आहे. नाहीतर आपली फसवणूक होऊ शकते. समाज माध्यमांनी जरी आपल्याला एकत्र आणलं असलं, संधी दिल्या असल्या तरी कुठेतरी आपल्या आयुष्यात अडथळेसुद्धा तेवढेच तयार केले आहेत. वाढत्या आत्महत्या, बेरोजगारी, डोळ्यांचे आजार या गोष्टी एका बाजूला पण आपल्या मेंदूला आणि मनाला या समाज माध्यमांमुळे जी कीड लागते आहे ती मात्र होत्याचं नव्हतं करू शकते. आज ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही उक्ती खरी करताकरता ही समाज माध्यमे आपल्याला आपल्या बाजूच्या माणसाला विसरण्यास भाग पाडत आहे. भारतीयांमध्ये ‘एकमेकां सहाय्य करू’, ही मानसिकता कमी होऊन ‘तू पुढे जाण्याआधी मी तुला हरवेन’, अशी मानसिकता कुठे तरी वाढताना दिसून येतेय. महाभारतात ज्याप्रमाणे कुरुक्षेत्र युद्धभूमी होती, तशीच समाज माध्यमे आता युद्धभुमी बनली आहेत. आपल्याला न पटलेली गोष्ट दुर्लक्ष करण्याऐवजी आज समोरच्याने मांडलेल्या प्रत्येक मतावर शाब्दिक, वैचारिक युद्धे वर्षानुवर्ष समाज माध्यमांवर सुरू असलेली आपल्याला दिसून येतात. समाज माध्यमांमुळे कुठेतरी आपल्याकडे नसलेली गोष्ट आहे, असं दाखवणारी पिढी आज भारतामध्ये घडते आहे. चारचौघात मिसळणारे आपण कुठेतरी बाजूच्या व्यक्तीसोबत मतभेद होतात म्हणून एकलकोंडी होऊ लागली आहोत. वास्तववादी जीवन जगण्याची एक प्रकारे गरज भारतीयांना असताना समाज माध्यमांमुळे एक प्रकारे आभासी जीवन अनेक भारतीय आपलेसे करू लागले आहेत.

समाज माध्यमे मुळातच आज फक्त संवादाचा मार्ग राहिलेले नसून एक वेगळे स्वतंत्र आभासी जग आज तयार करत आहेत. इथलं जग सतत बदलत असतं, इथले विचार सतत बदलत असतात. या गोष्टींमुळे आपली मानसिकता सतत बदलत राहते. बदलत नाही ती फक्त एक गोष्ट ती म्हणजे आपली, या समाजाची खऱ्याखुऱ्या समाजाशी नाही तर समाज माध्यमांशी जोडलेले राहण्याची इच्छा. हे समाज माध्यमांचे व्यसन जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपली या समाजासाठी योग्य अशी मानसिकता निर्माण होणे कठीण आहे. समाज माध्यमे ज्या गोष्टीसाठी अस्तित्वात आली त्याचसाठी त्यांचा वापर करून नवीन गोष्टी शिकत राहिलो तर समाज माध्यमे नक्कीच तंत्रज्ञानदेवतेचे वरदान ठरतील. नाहीतर त्यांचा वापर समाज आगीत होरपळून जावा, म्हणून ठिणगी टाकण्यासाठी केला जात असेल तर नक्कीच समाज माध्यमे आपल्यासाठी शाप ठरतील.

- मैत्रेयी सुंकले

Powered By Sangraha 9.0