कविता - आम्हीच आपले....

15 Jun 2023 10:00:00


कविता - आम्हीच आपले....

मराठी कवितेतलं एक अतिशय आदराने उल्लेखनीय असलेलं नाव म्हणजे दा. सू. वैद्य. त्यांची प्रत्येक कविता सजते ती शब्दांच्या सौंदर्याने आणि प्रमुख्याने अर्थाच्या, आशयाच्या ठळक कुंकवाने. कधी त्यांचे शब्द दाखवतात. एक दूरवर जाणारी वाट, कवितेच्या ओघात चालू लागतो आपण. त्यावर, शब्द नेतात आपल्याला मंथनापाशी आणि अदृश्य होतात तेही, तेव्हा फक्त अर्थ उरतो जो म्हंटलं तर दाखवला असतो शब्दांच्या, कवितेच्या माध्यमातून त्यांनीच आणि म्हंटलं तर तो आपला, आपल्यासाठीचा असतो. कारण त्याला जोडली गेली असतात आपल्या आयुष्याची कित्येक पानं. कवितेच्या समृद्धीची व्यापकता वाढलेली असते.

वेल उजवीकडे वळली काय

आणि डावीकडे वळली काय

तिला नसतात डावे-उजवे

असले तकलादू संदर्भ

म्हंटलं तर आपल्याच रोजच्या जगण्यातले आहेत हे संदर्भ. कदाचित म्हणूनच वरवर पाहता साधे वाटू शकतात, पण त्याच्या मुळाशी असलेला अर्थाचा कणही हाती लागला तरी धन्यता वाटते. 'डावं-उजवं' असा काही भेद खरंच असतो का? खरंतर अशा प्रश्नांची उत्तरं नसतात आपल्याकडे. अंतरात रुजलेले विचार इतके खोलवर गेलेले असतात की ते माणसाच्या सवयीचे होऊन जातात. ते गेले असतात इतके खोलवर की उपटायचं धाडस होत नाही. यात चूक कोणाची? अशा प्रश्नांची उत्तरे समाजशास्त्राला मिळाली असतील किंवा नसतीलही पण गरज वाटते ती परिवर्तनाची. 'वेल' हे प्रतिक असतं हिरव्या प्रगतीचं, वेल वाढत जातात अखंड, त्यांना माहीत नसते दिशा, माहीत असतं ते फक्त वाढणं, त्यांच्यासाठी; पण असतो सूर्य दाही दिशांमधे, प्रकाशाच्या रूपात, फरक एवढाच की आपल्या जाणीवा नेहेमी जाग्या असतातच असं नाही. वेल डाव्या बाजूला वाढला काय किंवा उजव्या बाजूला, तो असतो माणसासाठी फायद्याचाच. तसं नसतं माणसांबाबतीत, अनेकदा डाव्या-उजव्याचे खोटे पडदे लावले जातात राजकारणाच्या मोठ्या यंत्रणांवर. तेव्हा खरंच प्रश्न पडतो की माणूसकी, माणूसपण नक्की कोणत्या दिशेने चालले आहे? तेव्हा गरजेच्या वाटतात अशा कविता, अशी उदाहरणं, जी पहायला लावतात माणसाला स्वत:कडे तटस्थपणे. कदाचित सगळी वैयक्तिक आणि सामाजिक विचारधारा बाजूला सारुन. माणूस डावं-उजवं करतो ते अतिशय तकलादू संदर्भांनी. हे संदर्भ खरंच असतात तकलादू, त्यांचा आधार कधीच नसतो भक्कम आणि बदलत जातात ते काळानुरुप. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला विचार करताना आठवतील. जेव्हा आपणंच आपल्याला सबबी देतो, आपणच गोळा करतो संदर्भ इथून-तिथून आणि समर्थन करु पाहतो आपल्याच विचार-आचरांचं. सहज बदलतो आपणच आपल्या विचारांच्या दिशा, तेव्हा कळतं आपल्याला की आपणच घेत असतो स्वातंत्र्य, उजवं-डावं ठरवण्यासाठी, किती फोलपणा म्हणावा हा....

लाल मातीत जन्मली म्हणून

झाडं होत नाहीत श्रेष्ठ

काळ्या मातीत

जन्मणाऱ्या झाडांनाही

लाथाडायची प्रथा नाही

पावसाला मज्जाव नसतो

कोणत्याही प्रदेशात

रस्ता भेद करत नाही

पावलापावलात

पुढे असंच आपल्या ओळखीचं उदाहरण देत ते जाणीव करुन देतात ती माणसाने माणूसपणाच्या क्षेत्रात जन्माल्या घातलेल्या विषमतेची. पहायला गेलं तर असं म्हणता येईल की जन्म माणसाच्या संचिताची पुण्याई दाखवतो; पण तो माणसाचं कर्तृत्व सामाजिक समजांच्या कुंपणामधे बांधून ठेवू शकतो का? कर्मस्वातंत्र्य हे प्रत्येकालाच दिलेलं आहे. किती खरं आहे हे, झाडाची पानं-फुलं आपण बघतो, त्यांच्याकडे आपलं लक्ष जातं; पण जातं का आपलं लक्ष त्यांना जन्म देणाऱ्या मातीकडे? बघतो का आपण तिचा रंग? आपल्याला महत्त्वाचं वाटतं ते फक्त ते फूल, फळ. मग माणसांचं काय? गोरा रंग आहे म्हणून नेहमी माणूस चांगला असतो का? आणि काळा रंग आहे म्हणून असतो का माणूस चारित्र्यहीन? माणसाची जात ठरवते का वागणूक? स्वत:चे संकुचित आयाम बाजूला ठेवून यांवर विचार करायला हवा. 'लाथाडायची प्रथा नाही....' हे शब्द बोट ठेवतात ते मर्मावर. पाऊस पडतो ते सहजतेच्या विलक्षण सौंदर्याचे अलंकार लेवून, म्हणून तो आवडतो प्रत्येकाला. तसंच तो पडतो सगळीकडे, कोणाच्या घरावर पडायचं आणि कोणाच्या घरावर बरसायचं असा भेद त्याला माहीत नसतो. तसंच रस्ताही आडवत नाही लोकांच्या वाटा. पावला-पावलातला भेद कदाचित कळत असेल त्यालाही; पण म्हणून तो माणसांचा एखाद्या दिशेने, वाटेने जायचा अधिकार मात्र हिरावू पाहात नाही. माणसाची माणसालाच फक्त कमी लेखण्याची नाही तर स्वार्थासाठी लाथाडायची वृत्ती ही भयंकर आहे, कधी माणसाची धार्मिक इत्यादी माहिती, विचारधारा महत्त्वाच्या ठरू शकतात; पण त्याहीपेक्षा समोरची व्यक्ती ही माणूस आहे, तिलादेखील भाव-भावना आहेत याची जाणीव असायला हवी. माणुसकीचा दीप आत अखंड तेवत ठेवायला हवा.

लतादीदींच्या गाण्यात

दिसलेत का कधी

गर्व निष्ठ भगव्या रंगाचे तरंग

का कोणाला ऐकू आलेत

झाकीर हुसेनच्या तबल्यातून

स्वार्थी मजहबचे संकुचित शब्द

तरीही

आम्हीच आपले

एवं.. तेंव

तुझं.. माझं

ट्यॉव... टिश्यॉव...

गाय... डुक्कर...

माणसांची कवितेत आलेली नावं पाहून क्षणभर आश्चर्य वाटतं; पण विचार करता गरजेचंही. संगीताची साधना करणं म्हणजे नेमकं काय, संगीताच्या साधकाचं श्रेष्ठत्व नेमकं काय असतं? हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच लतादीदींकडे, त्यांच्या तेजस्वी साधनेकडे पहायला हवं. त्यांच्या गाण्यात आणि एकूणच व्यक्तिमत्वात कुठेही दिसत नाहीत अहंकाराचे कण. गर्वाला ओलांडून त्याच्या पुढे असणाऱ्या दैवी कृतज्ञतेने मधाळ झालेला त्यांचा आवाज आपल्यालाही नेतो क्षणभरासाठी खोट्या, भ्रामक कल्पनांच्या पल्याड. त्यातून तरंगत येत नाहीत भगव्या रंगाचे तरंग. तसं झाकीर हुसेनांच्या तबल्यातून येत नाहीत स्वार्थी मजहबचे संकुचित शब्द. धर्माच्या सीमा ओलांडून असे श्रेष्ठ साधक साद घालतात ती रसिकांच्या काळजाला, तेव्हा गळून पडतात सगळ्या संकुचिताच्या सीमा आणि उमलून येतं प्रत्येकात सारखं असलेलं माणूसपण. तेव्हा प्रत्येक देहात वास करत असलेला, अखंड शुद्धस्वरूप असलेला आत्मा फक्त जाणवू लागतो. पण त्याला लागतात प्रयत्न, निदान लागते बदलायची इच्छा, बाकी वरवरच्या देखाव्यात, नसल्याच्या असलेपणात रमणारे आपण करत बसतो, 'तुझं.. माझं..', संकुचिताच्या सीमा संकुचित होत जातात...

- अनीश जोशी.

Powered By Sangraha 9.0