एक धागा सुखाचा...!!

16 Jun 2023 15:06:42


एक धागा सुखाचा...!!

'एक धागा सुखाचा', हे अजरामर शब्द कानी येतात, दृष्टीस भेटतात आणि अगदी पुढे काही नसलं, किंवा काही वेगळे असलं, तरीही मनात मात्र भाव उमटतात, 'शंभर धागे दुःखाचे!' हेच वास्तव... हेच जीवन!

पण ही वस्तुस्थिती सहज सांगून जाते मनाला, मनाचे गम्य. सुखाच्या एका धाग्याकडे पाहून समाधान न मानता दिसतात, आठवतात, भयभित करुन सतावतात ते दुःखाचे धागे, शंभर! वाटतं, कदाचित दहाच असावेत ते. पण... पण या मनानेच त्यावर अतिविचार करुन तयार केला असावा गोफ... गूढ वाटणारा, भविष्यातील कृष्णविवरासारखा वाटणारा हा गोफ आणि झाले असावेत शंभर धागे दुःखाचे, मुळच्या दहाचेच!

पण तरीही, असा विचार कितीही केला तरी वाटतंच, की दुःख धागे शंभर नसून दहाच असले, तरी एकास दहा हा काय खेळ नियतीचा? कदाचित हाच विचार निर्माण करतो अकरावा धागा... मग शंभरी गाठायला वेळ कुठे लागतो!

धागा सुखाचा असो वा दुःखाचा, जीवन वस्त्र विणताना किंबहुना, आधीच विणलेले वस्त्र कोण्या रुपातून अनुभवताना अशा भावना असणारच; पण मग सहज आठवतात काही ऐकलेले शब्द... त्यांचा आशय असा, की जीवनाच्या कोणत्या न कोणत्या टप्प्यावर, पुर्वानुभवाच्या बळावर, माणसाला कळून चुकतं की 'हे' जीवन आपल्याला काय आणि कितपत सुख देऊ शकतं. हाच 'धागा' इथे जोडता लक्षात येतं, की कधीतरी कळतचं आपल्या सर्वांना ह्या जीवनात ह्या मार्गावर आपल्याला किती सुख मिळू शकेल, ते किती टिकणारं असेल, वगैरे आणि मग त्या जाणिवेनी, जाणिवेप्रतिची जाणीव होता पाऊलं बदलतात मार्ग, आपल्या धडपडीचा. कळत नकळत धरतात मार्ग स्वान्तसुखापासून आत्मसुखाप्रती जाणारा आणि पाऊलं वळतात, हात शोधयला... हात? त्या विणकराचे हात! न दिसलेले, न गवसलेले; पण कुठेतरी जाणिवेच्या तळातून साद घालणारे हात.

हा मार्गही सोपा नाही. सुखाचा एक धागा ध्यानी ठेऊन हा शोध घेताना दुःख धाग्यांनी मनात निर्माण झालेली चंचलता आपण दुर्लक्षित करु शकत नाहीच आणि जे करु शकतात, त्यांना गवसले असतात हात, कदाचित. किंवा त्यांचेच झाले असतात ते हात! मग विणकराला कसलं आलं आश्चर्य, आपल्याच विणकामाचं, आपल्याच धाग्यांचं! पण आपली धडपड मात्र चालूच रहाते. इथे सहज जोडावासा वाटतो आणखी एक धागा, वाल्मिकी रामायणाचा. नृपधर्म पाळत, जनपदाच्या शंका शमनार्थ, जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र सीतात्याग करतात, तेव्हा तेही स्वशोक आवरु शकले होते का? नाहीच! जाणून होते तेही, शिवशक्तीचं अद्वैत. त्यांचं आणि सीतेचं अद्वैत त्यांच्या या रुपाच्या जाणिवेपलिकडलं थोडीच होतं? नाहीच.

अगदी वाल्मिकी रामायणात, रामाच्या मुखी श्लोक येतो,

' अनन्या हि मया सीता भास्करस्य यथा प्रभा '

अर्थात, सीता ही माझ्याहून (रामाहून) कुणी अन्य (वेगळी) नाहीच. जशी भास्कर आणि त्याची प्रभा वेगळी नाही आणि होऊही शकत नाही, तद्वतच राम आणि सीता हे मुळी वेगळे नाहीच. वाटतं, ह्या अद्वैताच्या जाणिवेचा 'एक सुखाचा धागा' राममनात कायम तेजाळत होता. पण... पण अवतार रुपात पदोपदी जाणवणारी सीतेची उणीव, तिच्या विरहाचं दुःख, समाजमानसातिल काही रोष, तिचा त्याग केल्याची सल, असे कितीतरी दुःखधागे होतेच की रामासमोरही. मग त्या शंभर धाग्यांची पुन्हा पुन्हा गणना करत दुःख करत बसायचं, की एकच तो सुखाचा धागा साधून साऱ्या सुखदुःखाच्या धाग्यांतून मुक्त होऊन जायचं हे शेवटी आपल्यावरंच, नाही का?

आपल्या एकातीलच सामर्थ्य इतकं पूर्ण असतं, की त्याच्या बळावर सुखाचा वाटणारा एक आणि दुःखाचे अगणित वाटणारे सारे धागे आपण सहजच ओलांडून सुखाच्याही सुखाची शाश्वत नांदी अनुभवू शकू! होऊन जाऊ शकू!

- पार्थ जोशी

Powered By Sangraha 9.0