नाटकवाल्या मंडळींच्या तोंडून येणारं एक हमखास वाक्य म्हणजे 'शो मस्ट गो ऑन'! अगदी काहीही झालं तरी नाटक व्हायलाच हवं. अर्थात ते बरोबरही आहे. पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा प्रेक्षकांशी अलिखित असा एक करार असतो. त्या कराराची पूर्तता करण्यासाठी 'शो मस्ट गो ऑन'!
नाटकातला आणखी एक शब्द मला भावतो तो म्हणजे 'प्रयोग'. रंगमंच, नट सारखे असले तरी प्रत्येक प्रयोग हा नवा असतो. गेल्या प्रयोगाचीच ऊर्जा, वातावरण या प्रयोगात असेल असं निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणूनच त्याला प्रयोग म्हणायचं. प्रयोग थांबत नाही, नाटक सुरू राहतं. कारण, नटाच्या मनावर ‘शो मस्ट गो ऑन’ हे कोरलेलं वाक्य असतं. आपली भूमिका आणि रंगमंच यांची त्याला सांगड घालावी लागते. एखाद्या वेळी ख-या आयुष्यासारखी भूमिका असेलही; पण बरेचदा, नटाचं खरं आयुष्य आणि भूमिका यात खूप फरक असतो. भूमिका यशस्वीपणे पार पाडण्याबरोबरच हा फरक न दिसण्याचंही त्याच्यापुढे आव्हान असतं. या सगळ्या आव्हानांना सामोरं जाऊन रंगमंचावर घट्ट पाय रोवून नट उभा राहतो, तेव्हाच प्रेक्षकांची टाळी त्याला मिळते. तालीम ते मुख्य प्रयोग हा नाटकाचा एक प्रवासच असतो.
या सा-याचा विचार करताना सहज ‘आयुष्य’ हा शब्द मनात आला आणि नवं विचारचक्र सुरू झालं. आयुष्य काहीवेळा या नाटकाच्या प्रवासासारखंच असतं. नवनव्या दिवसांचा, क्षणांचा, स्थितीचा, कालावधीचा अखंड प्रवाह आयुष्यात सुरू असतोच. या सा-यात आपला पाय घट्ट रोवून उभं राहणारं आयुष्य हा मला एका नाटकासारखा वाटतो. नाटक जसं वेगवेगळ्या रंगमंचावर वावरत असतं तसंच आपणही कित्येकदा कित्येक क्षणात, स्थितीत, आठवणीत, सुख-दु:खात, वास्तवात वावरत असतो.
नाटकात वेगवेगळे नट असतात. प्रमुख भूमिका करणारे नट तेच असले तरी सहाय्यक भूमिका करणारे नट काहीवेळा बदलत असतात. पण वेगळा नट असेल म्हणजे सबंध टीम, रंगमंच तो प्रयोग काही रद्द करत नाहीत. त्याच जोमाने, उत्साहाने नाटक होतं. आपल्या आयुष्यात आपण प्रमुख भूमिका करणारे नट असतो. पण दिवसागणिक सहाय्यक नट मात्र बदलत असतात. नवनव्या क्षेत्रातली नवनवी माणसं आपल्याला भेटतात. पण आपलं सगळ्यांशीच पटतं असं नाही. काहीवेळा आयुष्याचा एखादा शो रद्द होतो आणि नाटक काही काळ थांबतं. म्हणूनच आपण नाटकाकडून शिकायला हवं. प्रमुख नट सहाय्यक नटाबरोबर 'अॅडजस्ट' करतो. मग सारी टीम रंगमंच 'ॲडजस्ट' करते आणि प्रयोग पुढे सरतो. ही ॲडजस्टमेंट आपल्याला शिकायची आहे, आत्मसात करायची आहे. प्रत्येक रंगमंचाचं नाटक काही देणं लागतं. नाटक आपल्या माध्यमातून रंगमंचाला जे देता येईल ते देत असतं. नाटक स्वतःजवळ ठेवतं तेव्हा आजच्या प्रयोगाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद, म्हणजेच टाळी आणि पुढच्या प्रयोगाची उत्सुकता! या व्यतिरिक्त नाटक काही नेत नाही. आपणही तसंच केलं तर? आपल्याला भेटणा-या निरनिराळ्या माणसांचं, समाजाचं आपण देणं लागतो. आपल्याजवळ जे देण्यासारखं असेल ते त्या भेटीत द्यावं. एखादी आवडलेली गोष्ट त्या माणसांकडून घ्यावी आणि पुन्हा नव्या माणसाला उत्साहानी भेटावं. बरोबर काही न्यायचं नाही. आपल्या झोळीत फक्त चांगलं नि सकारात्मक क्षणांचं दान भरुन घ्यायचं!
मी वर म्हटल्याप्रमाणे नाटकाच्या शो ला प्रयोग म्हटलं जातं. तसंच तुमचं-माझं आयुष्य एक प्रयोगच आहे. एखाद्या माणसाशी आपलं छान जुळतं; पण तितकंच दुस-या माणसाशी छान जुळेल असं नाही. एखादा प्रयोग आपल्या हातात नसतो, म्हणून आयुष्य आपण थांबवत नाही. हाच विचार आपण प्रत्येक अपयशाच्या वेळी करायला हवा. खूप प्रयत्न करुनही परीक्षेत अपयश येतं, एखादी गोष्ट काही केल्या साध्य होत नाही. अशावेळी आपण दोष देण्यासाठी कोणी व्यक्ती शोधतो आणि मोकळे होतो. पण एखाद्या अयशस्वी प्रयोगाचा दोष नाटक प्रेक्षकांना देत नाही. ते आपल्या उणीवा शोधतं. आपणही तसंच करायला हवं. एखाद्या वेळी उणीव सापडणार नाही. अशावेळी समजावं काही गोष्टी आपल्या मर्यादेपलीकडे आहेत आणि ती गोष्ट सोडून द्यावी. पुन्हा नव्या प्रयोगासाठी सज्ज व्हावं.
आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे नाटकाच्या प्रयोगाची सुरूवात. 'स्वागतम् रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करुन सविनय सहर्ष सादर करीत आहोत...'! हे वाक्य म्हणताना आणि ऐकताना एक नवं चैतन्य सबंध नाट्यगृहात निर्माण होतं आणि याच चैतन्याचा हात हातात घेऊन नाटक पार पडतं. आपणही आयुष्यात नव्या प्रयोगाची, कार्याची सुरूवात करताना आपलं श्रध्दास्थान आणि समोर असणा-या असंख्य माणसांना वंदन करुन सविनय आणि सहर्ष सुरूवात करायला हवी. एक नवं चैतन्य निश्चितच निर्माण होईल... खरंच नाटकाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. अगदी हे वाक्य नक्की शिकण्यासारखं आहे, 'शो मस्ट गो ऑन!'
- गौरव भिडे