इट्स ओके! हे दोन शब्द कितीवेळा ऐकतो आपण! कधी आनंदाच्या सुरात, कधी समजूतीच्या, कधी केवळ स्वीकाराच्या तालात आणि कधी सांत्वनाच्याही. मुळात, इट्स ओके म्हणजे ठीक आहे. मग हे ठीक असणं म्हणजे क्वचितच हवं तसं असणं असतं. पण बऱ्याचदा तसं नसल्याने किंवा मनासारखं नसल्याने आपण ' ठीक आहे' वर गोष्टी निभावून नेतो. त्यामुळे हा खचितच आंतरतृप्तीचा उद्गार नाही. पण हो, स्वीकाराचा मात्र आहे. शेवटी सामान्यांसाठी सुखाचा मार्ग स्वीकारातूनच तर जातो! अगदी काही वेळा नाही आवडत आपल्याला एखादी गोष्ट, कृत्य किंवा काहीही... पण सॉरीच्या मनःपूर्वक उद्गाराचं उत्तर 'इट्स ओके' हेच तर येतं. तेव्हा हा समजूतीचा शब्द असतो, धाग्यावर गेलेला लहानसा चिरका पुन्हा जोडून घेणारा, धागा अखंड ठेवणारा. किती उपकारक वाटतात हे दोन शब्द, आणि त्यांचा भाव! अनेक वाद उफाळण्यापूर्वीच शांतवणारा. सहज स्मरते ती अटक बिहारी वाजपेयीजींच्या कवितेतली ओळ. ते लिहितात,
'कर्तव्यपथपर जो भी मिला,
ये भी सही, वो भी सही!'
या इट्स ओकेचाच तर भाव इथे शब्दांत गुंफला आहे!
पण पुन्हा वाटतं, इतका कुठे सोपा असतो हा स्वीकार? हे शब्द किंवा खरंतर कोणतेही शब्द सोयीने वापरणं किती सोपं असतं! पण स्वीकाराचं अखंड व्रत कुठे पेलवतं मानवी मनाच्या मर्यादांना?
हे शब्द माहीत असूनही आणि खरंतर त्यांचा सोयीचा सराव असूनही आपण नाही वापरत काही वेळा. 'प्रत्येक वेळी समजून घ्यायला आपण का संत पुरुष आहोत?' हेही सोयीचंच वाक्य मनावर समर्थपणे उभं असतं एखाद्या अस्वीकाराला दुजोरा द्यायला. 'इट्स नॉट ओके' अशीही आपली भावना होतेच की कधीतरी... एखाद्या व्यक्तीने अमूक एक गोष्ट केली तरी ठीके आणि नाही केली तरी ठीके असं ठराविकच माणसांविषयी आपण म्हणू शकतो. कारण, सर्वांविषयीच जर काहीही केलं वा नाही केलं तरी इट्स ओकेचाच आपला भाव असेल तर 'तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता' हे आपल्याविषयीच म्हणावं लागेल!
स्थितप्रज्ञांचं हे अनुलक्षण आपल्यात नाही, म्हणूनच पुढे काळ्याकरड्या भावनांचा जन्म होतो याबद्दलही 'इट्स ओके' म्हणायलाच हवं की!!
सहज वाटतं, की 'समथिंग्स आर नॉट ऑलवेज ओके फॉर अस' म्हणूनच तर अर्थ आहे आयुष्याला.
कवितेचाच विचार आतून डोकावतो आणि वाटतं, की मनात कवितेचा काही विचारही नसता अचानकच कधी कविता येऊन जाते सहज, अगदी न सांगता! पण कधी मात्र काही केल्या येत नाही हवी तशी. तेव्हा कादाचित एखादा शहाणा कवी म्हणेलही 'इट्स ओके' कारण रोजच कुठे पीक येतं ताजं? त्यासाठी मशागत, पेरणी हवीच की! इथवर इट्स ओके! पण खूप जास्त काळ तिने दिलंच नाही दर्शन तर म्हणता येईल आपल्याला इट्स ओके?? तितक्या सहज? खचितच नाही... अस्वस्थ होऊन जाईल एखादा कवी, तळमळेल आतून... पण इट्स ओके म्हणून मनाच्याही अंतरमनात जपून ठेवलेला कवितेचा तरल धागा सोडून देणार नाही सहजी. तिची ओढ लागेल नव्यानं आणि काही काळानी तिचा ललितरम्य ओघ पुन्हा प्रवाही होईल, पुन्हा संतुष्ट करेल.
किती बाबतीत होतं असं, की आपण थांबतो, कळवळतो, साधनेत अखंड अभिरत होतो, हवं ते मिळालं नाही तरीही... इच्छा तशीच तगून ठेवत प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहतो. मग ती साधना कवितेची असो, ईश्वराची असो किंवा जीवनाची! काही वेळा इट्स ओके म्हणता येत नाही म्हणूनच तर आयुष्याला अर्थ आहे! म्हणूनच तर संतांना ईश्वरभेटीची अनावर आस लागते! कलाकाराच्या मनात एक अनाम तगमग जागी राहते! आयुष्याच्या अदृश्य ओठांना काही साधण्याची व्याकुळ तहान लागते!
म्हणून वाटतं, की इट्स ओके हा समजूतीचा मंत्र सुखाचा आहेच; पण अनेकवेळा गोष्टी ओके न वाटणं हेही हवंहवंसं असतं! विशिष्ट मंत्र जसे विशिष्ट वेळी आणि कारणासाठी जपले जातात, तसेच हे 'इट्स ओके' आणि 'इट्स नॉट ओके' वाटतात! कधी कोणता मंत्र वापरायचा याचीच शहाणीव मात्र सदा जागी राहो. म्हणजे उचित फलश्रुती तर प्राप्त होईलच आणि आपल्या आयुष्याचं अनुभव-ओलं आंबट-गोड फळही इतरांसाठी श्रुती ठरेल!
- पार्थ जोशी