ओढ सागराची...

19 Jun 2023 14:33:54

ओढ सागराची...

आलों चालूनी वाट युगांची

आणि गाठीला तुझा किनारा

तव लाटांपरी दाट शहारा!

समुद्रावर मनापासून प्रेम करणाऱ्या, पण समुद्रापासून लांब राहणाऱ्या प्रत्येकाच्या मनाची ही अवस्था बा.भ. बोरकर यांनी आपल्या कवितेतून अगदी चपखल शब्दात मांडली. इतके दिवस समुद्र हा शब्दच मुळात मजा, मस्ती, धमाल अशी विशेषणे घेऊन यायचा पण हळूहळू माणसाच्या चिंता, कष्ट जसंजसं वाढत गेलं, तसतसं त्याला गरज भासू लागली. ती एका हक्काच्या जागेची. एक अशी जागा जी एकांत देईल; पण एकटेपणा नाहीसा करेल. बोरकर म्हणतात तसं, खूप दिवस आपण स्वतःशी झगडत, हरत, धडपडत काहीतरी करत असतो आणि मग एक दिवस हक्काची सुट्टी घेऊन फिरायला म्हणून समुद्रावर जातो आणि अनुभवतो ती एक वेगळीच शांतता. समुद्राच्या लाटा, त्याची गाज यांमध्ये येताना एक प्रकारची सकारात्मकता घेऊन येण्याची आणि जाताना मनाला खुपणारी सारी सल नाहीशी करून जाण्याची ताकद आहे. लहानपणी तो विशाल समुद्र, उसळणाऱ्या लाटा पाहून त्याची भीती वाटायची; पण तेव्हा कोणाला माहीत होतं, की एक दिवस हाच समुद्र इतक्या मोठ्या जगासमोर आपली दुःख, आपले कष्ट किती लहान आहेत, याची जाणीव करून देईल. पण तरीसुद्धा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी, एखादी लाट किनाऱ्यापर्यंत येण्यासाठी जितका मोठा प्रवास करते आणि जितकी धडपड करते, तशी धडपड करणं किती महत्त्वाचं आहे हे ही शिकवून जाईल? समुद्रकिनाऱ्यावर कितीही गर्दी, गजबजाट असला तरी तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या मनातलं वादळ शांत करण्याची ताकद त्याच्याकडे आहे.

समुद्र किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचा साऱ्यांनाच फार हेवा वाटतो आणि तसे ते भाग्यवान आहेत सुद्धा. कारण समुद्राचं एरवी कोणीही पाहत नाही असं रूप ते पाहतात. समुद्राकडे एक मनोरंजनाचं ठिकाण नाही, तर आयुष्यातला एक अविभाज्य घटक म्हणून पाहत असतात ते. समुद्रामुळे पोटापाण्याच्या गरजा भागतात म्हणून महाराष्ट्रातील आगरी-कोळी समाज नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजासुद्धा करतो. कधीकधी वाटतं आपणही पूजा करावी त्याची. शेवटी आपण पूजा त्याचीच करतो, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याला एक दिशा मिळत राहते. मग समुद्रावर रोज एक फेरी मारून मी यालाच माझी वारी समजते. बाकी काही नाही, मिनिटभर का होईना, शांत बसून राहते... मला तो समजून घेतो, तसं त्याला समजून घेण्याचा भाबडा प्रयत्न करते. त्याची पूजा म्हणजे काही नैवैद्य वगैरे नाही, आपण समुद्रकिनारा स्वच्छ ठेऊ, समुद्रात कचरा टाकणार नाही या एका कर्तव्याची जाणसुद्धा त्याच्या पूजेसारखीच आहे.

समुद्र प्रत्येकासाठी वेगळा असतो, तरीही प्रत्येकासाठी सारखा!

माझ्यासाठी समुद्र कायम मी काहीही न लपवता, काहीही न सांगता मला समजून घेणारा आणि माझ्या अस्तित्वाला एक दिशा देणारा सखा राहील एवढं नक्की!

शेवटी पुन्हा बोरकरांच्या ओळी नमूद केल्याशिवाय रहावत नाही.

ते पुढे म्हणतात...

थकतां माथा असाचं दे मज

मायकुशीसम तुझा किनारा

नश्वर नेत्रांपुढे असू दे

ईश्वरतेचा सदा पसारा

 

- मैत्रेयी सुंकले

Powered By Sangraha 9.0