आपल्याला परफेक्शनिस्ट (का) व्हायचंय?

युवा विवेक    02-Jun-2023   
Total Views |


आपल्याला परफेक्शनिस्ट (का) व्हायचंय?

परफेक्शनिस्ट म्हटलं की सगळ्यांना आठवतो तो अभिनेता अमीर खान. केवळ अमीरच नव्हे तर आपल्यापैकी बरेच लोक परफेक्शनच्या मागे पळत असतात. ‘मी एकदम परफेक्शनिस्ट आहे, मला सगळं परफेक्टच लागतं’ असं अनेकजण अभिमानाने, छाती फुगवून सांगत असतात. पण या परफेक्शनिस्ट असण्याच्या बेताखाली ते किती बेजार होतात ते त्यांनाही कळत नाही. आता तुम्ही म्हणाल की, परफेक्ट असण्यात काय चूक आहे? परफेक्ट असणं हा आपल्याकडे सद्गुण मानला जातो. ते बरोबरही आहे. परफेक्ट असणं ही अजिबात चूक नाही; पण परफेक्शनच्या अट्टाहासापायी माणूस स्वतःपुढे किती समस्या उभ्या करतो ते त्याचं त्यालाही कळत नाही.

अक्षयला त्याच्या परफेक्टली आवरून ठेवलेल्या टेबलला दुसऱ्या कोणी हात लावलेला चालत नाही, स्वराला पेपरमध्ये परफेक्टली सोडवलेल्या प्रश्नांना हवे तसे मार्क मिळालेच पाहिजेच असं वाटतं, केतनला त्याच्या शर्टाची परफेक्ट घातलेली घडी चुरगळलेली आवडत नाही तर परफेक्ट येणारं गाणं आज आपण चुकलो याची मेघाला खदखद वाटते. गेल्या काही वर्षांत शालेय, विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एकाच वेळी अनेक क्षेत्रात परफेक्ट असण्याची सवय किंवा आग्रह ही भावना वाढीस लागली आहे. एखाद्या क्षेत्रात आपण कमी पडलो वा अपयशी ठरलो तरी लगेचच नकारात्मक भावना मनात घर करू लागतात. तर मंडळी, हे मिस्टर किंवा मिस परफेक्शनिस्ट म्हणजे सर्वगुणसंपन्न व्यक्ती. या व्यक्ती सर्वच वयोगटात आढळतात. चालणं, धावणं, उठबस करणं, फिटनेस, अभ्यास करणं, त्याचवेळी इतर छंद जोपासणं, परीक्षेत यश मिळवणं, ऑफिसमध्ये काम करणं, घरकाम करणं, स्वयंपाक करणं, आवराआवर करणं, एखादी गायन वादनासारखी आवडनिवड जपणं, अगदी अंघोळ करणं आणि कपड्यांच्या घड्या घालणंही परफेक्टच असावं अशी या परफेक्शनिस्टांची स्वतःकडून अपेक्षा असते. ही अपेक्षा पूर्णपणे चूकच आहे असं नाही. पण या अट्टाहासामुळे हे परफेक्शन आपल्यासाठी दुखरी नस किंवा आपलाच पोसलेला इगो ठरत नाही ना हे ही पाहिलं पाहिजे.

परफेक्शनिस्टांची स्वतःचं काम करण्याची एक खास पद्धत असते आणि तीच पद्धत योग्य आहे असा त्यांचा समज असतो. पण दुसरी एखादी व्यक्ती ते काम त्याच्या पद्धतीने किंवा परफेक्शनिस्टापेक्षा वेगळ्या पद्धतीने करू लागली तर हे महाशय अत्यंत अस्वस्थ होतात. त्यात त्या व्यक्तीच्या हातून काही चूक झाली की संपलंच, परफेक्शनिस्टांचा पारा हळूहळू चढू लागतो. परफेक्ट असण्याच्या अट्टाहासामुळे एक वेगळाच कठोरपणा अनेकदा स्वभावात आलेला असतो. पण वास्तविक जशी आपली एखादं काम करण्याची स्वतंत्र पद्धत आहे तशी समोरच्याचीही असू शकते आणि ते काम करण्यात थोडंफार अपयशही येऊ शकतं. पण परफेक्शनिस्टांना अपयश मान्य होत नाही. एवढा परफेक्ट असूनही मी चुकलो किंवा हरलो म्हणजे काय, ही भावना त्यांना कमालीची सतावते. खरं म्हणजे काही वेळा आपण मेहनत घेतली तरी परिस्थिती किंवा नियती यांचे संकेत वेगळे असू शकतात. आयत्या वेळी होणाऱ्या ह्युमन एरर किंवा मानवी चुका आपल्या हातात नसतात. पण परफेक्शनिस्टांना हे मान्य नसतं.

एका रिसर्चनुसार परफेक्शनिस्ट माणसं सतत परफेक्शनच्या मागे धावत असल्यामुळे छोट्या छोट्या आनंदाला मुकतात. म्हणजे बघा हं, एखाद्या मुलीला गाण्याच्या परीक्षेत परीक्षकांनी छान प्रतिक्रिया दिली असली तरी गुणपत्रिकेत ती दिसलेली नसेल तर तिला आपण चुकलो वा कमी पडलो, ही भावना खात राहील. एखादे वेळेस एखाद्या छान झालेल्या पदार्थाचं खाणाऱ्याने कौतुक केलं तरी मसाला जरा कमी पडला ही भावना परफेक्शनिस्टांना खात राहाते. खरं म्हणजे एखादी वस्तू नसतानाही पदार्थ छान जमून आला असेल तर त्या कौतुकाचंही कौतुक वाटायला हवं; पण सगळं नेहमीच्या प्रमाणात न पडल्याची भावना या मंडळींना खात राहते. तोच रिसर्च असंही सांगतो, की परफेक्शनिस्ट माणसं ही सर्वसामान्यांत मिसळत नाहीत किंवा अट्टाहासापायी अन्य माणसांपासून सदैव तुटलेली राहतात. साधं पुस्तकाचं कपाट लावण्याबद्दलच बोलू. एखाद्याला पुस्तकाची जागा बदललेली आवडत नसेल किंवा दुसऱ्याने हात लावल्याने पुस्तकांची रचना बिघडल्याचा राग येत असेल तर त्याच्याशी त्याबद्दल कोण बोलेल? या उलट एखाद्या कधीच वाचन न करणाऱ्याने आपल्या कपाटाची रचना पाहून त्याला हात लावला, एखादं पुस्तक चाळलं तर आपल्याला आनंद व्हायला हवा, त्याच्याशी आपण पुस्तकांबाबत भरभरून बोलायला हवं. पण घडतं उलटच. गंमत बघा, परफेक्ट माणूस हा मुळातच इतका परफेक्ट असतो (किंवा तसं त्याला तरी वाटत असतं) की त्याच्या सुधारणेच्या वाटा तो स्वतःच बंद करून टाकतो. मी करतो ते परफेक्टच आहे हा ग्रह त्याला तसं करू देत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परफेक्शनिस्ट माणसांना अनेकदा अपयश सहन होत नाही. आपण इतके बिनचूक असूनही निर्णय कसा चुकला, मार्क कमी कसे मिळाले, ऍडमिशन का मिळाली नाही, प्रमोशन कसं नाकारलं गेलं, अपरायझल का झालं नाही, कोणी कौतुक का केलं नाही, नुकसान कसं झालं असे वेगवेगळे प्रश्न त्याला वेगवेगळ्या टप्प्यावर सतावत राहतात आणि एक आंतरिक संघर्ष सतत सुरू राहातो.

खरं म्हणजे थोडसं चुकण्याची, थोडंसं बिघडण्याची, जरा सवय मोडण्याची, थोडंफार अपयश पचवण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे. परफेक्शन सोडूनच द्यायचं असं म्हणणं नाही. पण त्यातही स्वतःला थोडी सूट द्यायला काय हरकत आहे. एखादा दिवस उशिरा उठून, जेवणाची वेळ बदलून, अभ्यासाला बुट्टी मारून बाहेर निसर्ग न्याहाळण्यात पण वेगळीच मजा आहे. थोडंसं अव्यवस्थित जगण्यातही आनंद आहे. परफेक्शनचं जोखड थोडं बाजूला ठेवून बाकीच्यांमध्ये मिसळून त्यांच्यातलंच एक होऊन जाता आलं पाहिजे. अपयशासाठी इम्परफेक्ट असल्याबद्दल स्वतःला दोष देण्यापेक्षा त्याची योग्य कारणमीमांसा करता आली पाहिजे. आयत्या वेळच्या चुकांकडे तटस्थपणे पाहता आलं पाहिजे. जीवनातला प्रत्येक क्षण भरभरून जगता आला पाहिजे. परफेक्शन हा जीवनाचा मंत्र नाही, ते एक तंत्र आहे आणि ते एका मर्यादेतच वापरायला हवं. बरोबर ना?

- मृदुला राजवाडे