आपण वाचतो, म्हणजे काय करतो नक्की ?

25 Jun 2023 10:00:00


आपण वाचतो, म्हणजे काय करतो नक्की?

आपण वाचतो, म्हणजे काय करतो नक्की?

लेखकाच्या हातावरची रखरख

तोलू बघतो आपल्या तळव्यावर, क्षणभर

आणि पेरू पाहतो आत

त्यातील संस्कारांची बीजं अलवार

आपण वाचतो, म्हणजे काय करतो नक्की?

जागी करतो आपल्या आतली व्याकुळ पिपासा

शब्दांचा मोह आणि आशयाची आर्तउत्कट आस

धडपडू बघतो आतल्या वाटेवर समृद्ध होण्यासाठी

आणि शिकून जातो बरेच अंधार

न भोगताही!

आपण वाचतो, म्हणजे काय करतो नक्की?

कल्पनेला डोळा देतो आणि कोन देतो दृष्टीला

आयुष्याच्या आवारात चालताना होत रहातो समृद्ध

आणि आतल्या गाभाऱ्याच्या अज्ञात मार्गावर

देऊ पाहतो उजेड, लेखकाने जगलेले

आपली वाट चालताना...

जगण्याच्या कवितेतलं शोधू पाहतो नवं यमक

आणि वाचतोही शब्दांमधलं, शब्दांमागचं, बरंच

मौन बोलकं करतो आपण

आणि वाचू लागतो आयुष्यातले शब्दातीत आशय

सहवेदनेच्या भावाने आनंदून जातो

तसे दुखावूनही जातो सहज

पण...

पुस्तकातल्या प्रत्येक पानावर

आपली वाट पहात असते समृद्धी

तिच्या सान्निध्यात

आनंद करतो आपण, अखंड

ज्याला जोड नसते कशाचीच

तेव्हा हळूहळू

वाचन आपली गरज होऊन जाते

अपरिहार्य!

आपण वाचतो म्हणजे वेगळं काय करतो?

पार्थ जोशी 

Powered By Sangraha 9.0