अशीही ‘वारी’ अनुभवावी...

26 Jun 2023 12:50:46


अशीही ‘वारी’ अनुभवावी...

वारी, आषाढी एकादशी, दिंडी हे शब्द अगदी लहानपणापासूनच फार भुरळ पाडतात मला; पण शाळेतली दिंडी सोडली तर आजवर काही ‘वारी’ अनुभवण्याचा योग आला नाही. परवा सहज म्हणून विचार केला, की ‘वारी’ म्हणजे फक्त पायी चालत पंढरपुरी जाऊन विठुरायाचे दर्शन घेणे एवढंच का? हो एवढंच! असं उत्तर काही मनाला पटलं नाही. ‘वारी’ या शब्दाचा शब्दशः अर्थ शोधला तर तो होता येरझाऱ्या घालणे. मग अशा येरझाऱ्या आपण अनेक ठिकाणी घालत असतो; पण ‘वारी’ असे नाव आपण त्यांना तेव्हा देतो जेव्हा आपल्या मनात काही भावना घेऊन, श्रद्धा ठेवून एखाद्या ठिकाणी ये जा करत असतो.

मग हे ठिकाण अगदी कोणतेही असू शकते. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सुद्धा. त्यातही हे ठिकाणचं असले पाहिजे असेही नाही. ‘वारी’ एखाद्या व्यक्तिपाशी असू शकते, झाडापाशी असू शकते. तसेच अगदी एखाद्या विचारापाशी सुद्धा! कदाचित हे काहीतरी भलतंच आहे, असं सुद्धा वाटू शकेल कोणाला. पण मला वाटतं एखादया व्यक्तीची भेट जर आपण आपुलकीने, श्रध्देने कायम घेत असू, ती भेट घडून यावी यासाठी प्रयत्न करत असू, तर याला ‘वारी’ म्हंटले तर वावगे काय?

तसंच जर एखादा सुविचार आपण मनापासून अंगीकृत करत असू, त्याद्वारे समाजप्रबोधन करीत असू तर हा सुद्धा ‘वारी’चाच एक प्रकार म्हणता येईल आणि अशी आपली आपल्यापुरतीच असणारी ‘वारी’ आपण केव्हाही सुरू करू शकतो.

त्या दिवसापासून मी असा निश्चय केला, की एखादी गोष्ट आपल्याला अनुभवता येत नाही. म्हणून त्यावर दुःख करीत राहण्यापेक्षा त्याला पर्याय आपले आपण शोधावे. मला ‘वारी’ जोपर्यंत प्रत्यक्षात अनुभवता येत नाही तो पर्यंत स्वतःसाठी ‘वारी’ घडवून आणायची. यंदा माझ्यासाठी ही ‘वारी’ आहे चांगल्या विचारांची ‘वारी’. आषाढी एकादशीपर्यंतचे सारे दिवस सतत नवीन विचारांच्या शोधात, चांगल्या विचारांच्या सानिध्यात राहण्याचा माझा निश्चय हीच माझी ‘वारी’. या ‘वारी’ मधला माझा पांडुरंग आहे तो म्हणजे एक चांगला माणूस बनण्याचे ध्येय. या ‘वारी’तले वारकरी म्हणून सोबत आहेत. अनेक विचारवंतांनी त्याच बरोबर माझ्या आयुष्यातल्या अनेक व्यक्तींनी त्यांचे मला सांगितलेले अनुभव.

ही ‘वारी’ कदाचित लांबणीवरसुद्धा पडू शकते. माझ्या, आपल्या ध्येय रुपी पांडुरंगाचे दर्शन लांबू शकते; परंतु या ‘वारी’मध्ये मनाचे धैर्य आणि प्रयत्न हे कमी पडू न देणे ही आपली जबाबदारी ठरते. मला वाटतं अशी आपल्यापुरतीची ‘वारी’ खरंच प्रत्येकाला घडावी, प्रत्येकाने अनुभवावी शेवटी काय तर काही अनुभव आपल्या नशिबात असतात पण काही अनुभव आपणच स्वतःसाठी निर्माण करू शकतो.

- मैत्रेयी सुंकले

Powered By Sangraha 9.0