पान मोठाले घेऊन
त्याने चित्र चितारले
लख्ख काळे नि पांढरे
रंग तेव्हा स्वीकारले
वाटे द्वैताच्या पल्याड
नक्की होते तेव्हा काय
जशी तृप्तीस लागावी
जून अनामिक सय
रेष नव्हतीच तेव्हा
होता बिंदूचा संचय
नित वाटले राहतो
एक बिंदूचं अक्षय
द्वैत स्वीकारून तेव्हा
सारे चित्र चितारले
माध्यमातले आशय
परि वेगळे राहीले
एक विसरला चित्र
फक्त अर्थच राहिला
परि बाकीच्यांचा जीव
रंगामधे अडकला
- अनीश जोशी.