जगतास जाण नाही

युवा विवेक    03-Jun-2023
Total Views |

जगतास जाण नाही..

मनुष्याला आपल्या भोवताली कायम गर्दी हवी असते. त्याचं मन त्या गर्दीतच रमतं. पण गर्दी केव्हातरी असह्य होते. त्या गर्दीचा त्रास व्हायला लागतो. मग नशीबापासून दोष देता येण्यासारखी प्रत्येक गोष्ट मनुष्य शोधतो. एकदा ती गोष्ट सापडली म्हणजे त्याच्या मनाचं समाधान होतं. मग पुन्हा गर्दी, मन रमणं, त्रास होणं आणि मनाचं समाधान... हे चक्र अखंड सुरू असतं यंत्रालयातल्या यंत्रासारखं..

मनुष्याला आपल्या भोवती गर्दी हवी असते, असं मी म्हणालो. पण खरं तर, ती गर्दी त्याला जमवायची असते. सोशल मीडियाची यात त्याला कितीतरी मदत होते. अगदी आज अमुक एक भाजी केली, अमुक कंपनीचा फ्रीज घेतला पासून ते अगदी नाटक सिनेमाला गेलो वगैरे गोष्टीसुध्दा सोशल मीडियावर आपल्याला पोस्ट कराव्याशा वाटतात. ही पोस्ट समाजानी एकदा 'अप्रूव्ह' केली (स्वीकारली) म्हणजे त्या समाजाचं मनुष्याला हव्या असलेल्या गर्दीत रुपांतर होतं. सुरुवातीला ही गर्दी ती गोष्ट अगदी कौतुकाने स्वीकारते. पण अमुक एक भाजी केली, यात काय कौतुक? किंवा ऑफिसात चांगल्या कामाचं बक्षीस मिळालं, त्यात काय कौतुक? असं कुणी म्हणलं रे म्हणलं की, आपला आनंद क्षणार्धात मावळतो. काही लोक तर पोस्टसुद्धा डिलीट करतात की, गर्दी आपोआपच डिलीट होते..

एखादी गोष्ट आपण का करतो? याचा सहज साधा विचार आपण करायला हवा. असा विचार केला तर यातल्या ब-याच प्रश्नांची उत्तरं आनंद, हौस, छंद वगैरे असतील. कितीतरी गोष्टी आपण आवड म्हणून करत असतो. एखादी कला, एखादं काम आपण करायला सुरुवात करतो. विशेष परिश्रम घेऊन ते पूर्ण करतो आणि त्या पूर्ण झालेल्या कलाकृतीकडे आपण कितीतरी वेळ नुसतं बघत राहतो. पण अलीकडे मात्र काम किंवा एखादी कलाकृती साकार झाली म्हणजे त्याची माहिती सोशल मीडियावर द्यायलाच हवी, असं आपल्याला वाटत राहतं. पण हे करण्याचा अट्टाहास का करायचा आपल्याला?

खरंतर एखाद्या कलाकृतीचे, कामाचे पहिले प्रेक्षक आपण स्वतः असतो. ती कलाकृती आपल्याला आवडणं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तटस्थ भूमिकेतून आपण त्या कलाकृतीकडे पहायला हवं. हे असं तटस्थपणे पाहता येणारी माणसं विलक्षण असतात, निर्भेळ असतात.

एखादी गोष्ट आपण आपल्या स्वतःसाठी, आपल्या आनंदासाठी, आपल्या सुखासाठी करतोय ही भावनाच मला विलक्षण वाटते. कदाचित ती कलाकृती जगाला विलक्षण नाही वाटणार, नोंद घ्यावी इतकंही महत्त्व जगाला वाटेल असं नाही. जगाला किंवा जमणा-या गर्दीला अर्थच नसतो, असं नाही. पण तुमच्या भावना त्या गर्दीपर्यंत, गर्दीतल्या प्रत्येक ह्रदयापर्यंत पोहोचतील, असं निश्चितपणे सांगताच येणार नाही. आपलं सारं जगणंच भावनेशी निगडित आहे. अगदी आपल्या आसपास रोज हजारो लोक वावरत असतात. त्यातल्या प्रत्येकाची प्रत्येक गोष्टीशी भावना जोडलेली आहे. या भावनेतूनच या हजारो लोकांना 'समाज' म्हणून आपण संबोधतोय. या समाजाच्या भावना निरनिराळ्या असायच्याच. अट्टाहास करुन आपण या गर्दीतून बाहेर पडलो तरी इतक्या मोठ्या जगात गर्दी नाहीच, असं ठिकाण कुठे आपल्याला मिळणार? सारं काही सा-यांशीच शेअर का करावं? काही क्षण स्वतःसाठी जगायला हवेतच. असा विचार करत असतानाच मला 'नात्यास नाव आपुल्या..' गीतातली 'सा-याच चांदण्यांची जगतास जाण नाही...' या ओळी आठवल्या आणि वाटलं या ओळी तुमच्या-माझ्या मनाच्या आभाळासाठीच कुसुमाग्रजांनी लिहिल्या आहेत. जगतास जाण असो किंवा नसो, चंदेरी चांदणं उमलायचं का कधी थांबतं? मग आपल्या मनातल्या चांदण्यांनी तरी का थांबावं? या चांदण्या म्हणजेच तर आपला आनंद, हौस, छंद... ह्या चांदण्या म्हणजेच कला, या चांदण्या म्हणजेच प्रतिभा. हे चांदणंच नसेल तर मनातलं आभाळच अंधारात दिसेनासं होईल! आपल्या आभाळातल्या चांदण्यांना उमलू देऊ या... जगतास जाण असो किंवा नसो... तुमच्या माझ्या मनात कितीतरी चांदण्या उमलण्यास उत्सुक आहेत... उमलू द्या त्यांना... साऱ्याचं चांदण्यांना उमलण्याचा हक्क आहे... त्यांना तो हक्क आभाळानीच मिळवून द्यायचा आहे...

चांदण्यांनी आभाळाशी एकरूप व्हायलाच हवं...
जाताजाता पुन्हा एकदा ती ओळ गुणगुणावीशी वाटते,
'
सा-याच चांदण्यांची जगतास जाण नाही...'


-
गौरव भिडे