'आपले' कबीर

युवा विवेक    04-Jun-2023
Total Views |


'आपले' कबीर

प्रसन्नतेच्या ज्योतीची गूढगंभीर पण तरीही मोहक अशी प्रभा म्हणजे कबीर! ब्रह्मकमलामधला सहजमध कष्टाने वेचून आपल्या ओंजळीत सुखाने ठेवणारा आणि आत्मजागृतीचं गीत आपल्यासाठी रुणुझुणु रुणुझुणु गाणारा, अखंड गात राहणारा देवदूत भ्रमर म्हणजे कबीर!

संत कबीर म्हटलं, की आपल्या मनःपटलावर सहज उमटतो तो एक स्वस्थ असणारा शांत प्रसन्न चेहरा. डोक्यावर मोरपीस आणि अर्धोन्मीलित नेत्रांतून पाझरणारी करुणा... ज्यांना पाहूनही आतले दाह शांत व्हावेत आणि ज्यांची वाणी ऐकून/वाचून खोल आत जिजिविषा अर्थासह उसळून यावी, उजळून जावी असं तेजस्वी स्फुल्लिंग म्हणजे कबीर. 'कबीर' असं फक्त म्हटलं, तरी संत कबीरांशिवाय अन्य कुणीही प्रथम आठवत नाही. पण मुळात, 'कबीर' म्हणजे काय? कबीर म्हणजे सर्वज्ञ, कबीर म्हणजे महान, श्रेष्ठ आणि अर्थातच संत कबीरजींकडे पाहून वाटतं, की सामाजिक भान यथायोग्य पाळून होणारा चिद्विलास म्हणजे कबीर!

कबीर म्हटलं, की भारतीय मनाला सहज आठवतात ते त्यांचे दोहे. कबीरांनी आपल्याला जागं करणारे असंख्य दोहे लिहिले असले, तरी स्वतःबद्दल, स्वतःच्या जन्माबद्दल स्पष्ट विवेचन करणारा एकही दोहा त्यांच्या लेखणीतून आला नाही. अर्थातच, याचा परिणाम असा, की त्यांच्या जन्माविषयी अनेकानेक कपोलकल्पित कथा जन्माला आल्या. भक्तांच्या प्रेमप्रतिभेतून त्या साकारल्या जाणं ही भारतीय संस्कृतीची महानताच म्हणावी लागेल. कुणी त्यांचा जन्म कमळातून झाला असं म्हटलं, तर कुणी आणखी काही. या आकाशाचा जन्म कसा झाला हे पुरतं अज्ञात असलं, तरी ते स्वयंप्रकाशित आश्वासक आकाश मात्र आपल्यावर अखंड छाया धरुन आहे, हेच महत्त्वाचं. पण कबीरजींच्या जन्माविषयी बोलणारा एक दोहा मात्र प्रसिद्ध आहे. तो म्हणजे -

'चौदह सौ पचपन साल गये, चंद्रवार एक ठाट ठये

जेठ सुदी बरसायत को, पूरनमासी प्रगट भये'

अर्थात, चौदाशे पंचावन्न साली चंद्रवार म्हणजेच सोमवारी ज्येष्ठ पौर्णिमेला पावसात कबीरजी प्रकट झाले.

हा दोहा नेमका कुणी लिहिला ते माहीत नाही. पण याच अनुसार ज्येष्ठ पोर्णिमेला आपण कबीर जयंती सानंद साजरी करतो.

कबीर हे विणकर होते हे आपण जाणतोच. पण ते केवळ सामान्य विणकर नव्हते. तर, सुखदुःखांचे धागे समत्वाच्या सुईने विणून तो शेला 'इदं न मम' या भावनेने श्रीरामचरणी समर्पण करणारे विणकर होते. त्यांनी केवळ हाच शेला विणला नाही, तर अगणित दोह्यांचे मोती विणून त्यांनी आपल्यासाठी मोत्यांचा अंगरखाच तर विणला आहे! अंगरखाच! आपल्याला सुशोभित करणारा, रक्षण करणारा आणि वेळोवेळी जागं करणारा अंगरखा. तोही मोत्यांचा. जो ल्यायल्यावर आपण खरोखर अंतर्बाह्य सुंदर दिसू, नव्हे होऊनच जाऊ असा हा मोत्यांचा कधीही जीर्णशिर्ण न होणारा अंगरखा त्यांनी आपल्याला दिला ही केवढी पुण्याई आपली! त्यांच्या डोक्यावरील मोरपीसाप्रमाणे साक्षात सर्वनाशी काळपुरुषाने तो आपल्या डोक्यावर धारण केला आहे. आपण तो पाहून, दूर सारुन आपला कर्मदरिद्रीपणा दाखवू नये हीच प्रांजळ आशा. कारण जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात -

लोहे परिसाशी रुसले

सोनेपणाशी मुकले

तेथ काय कुणाचे बा गेले?

ज्याचे त्याने अनहित केले!

वाटतं, की कबीरजींसारखे शिक्षक शोधूनही सापडणं कठीण! एखाद्या अशिक्षित व्यक्तीलाही कळतील इतक्या सोप्या शब्दांत लिहिलेले दोहे, अत्यंत सुबोध करुन सांगितलेली गहन तत्व, त्यासाठी दिलेली इतकी सोपी, सर्वांनाच रुचणारी आणि पचणारी उदाहरणं ही सर्वोत्तम शिक्षकाचीच तर हतोटी आहे. आज ते देहरुपाने जरी आपल्यात नसले, तरी त्यांचं शिकवणं मात्र अखंड सुरुच आहे. पण, या शिक्षकाचं शिक्षण किती बरं? किती ग्रंथांचा, शास्त्रांचा, पंथांचा यांचा अभ्यास? नावाआधी डिग्र्यांची किती टिंब? असा प्रश्न विचारता लक्षात येतं, की सगळ्या शास्त्रग्रंथांना पुरुन उरतील अशा अडीच अक्षरांत आकंठ बुडालेला हे शिक्षक. ती अडीच अक्षरं म्हणजे अर्थातच, 'प्रेम'! जातीपाती, धर्म, पंथ, वर्ण लिंग, या सगळ्या भेदांच्या पार जाऊन प्रेम करणारा हा शिक्षक आणि प्रेमच तर कबीरजींच्या आयुष्याचा गाभा आहे! त्यांचं प्राणप्रिय अशा श्रीरामावरील प्रेम, आपल्या सर्वांवरिल निखळ प्रेम तर अखंड आहेच, पण त्याचसोबत प्रेमाने आणि प्रेमातून प्रेम करायला शिकवणारे शिक्षक म्हणजे कबीर आहेत!

किती निस्सीम भक्ती असावी कबीरांची!

सहज आठवतं, ते ग.दि.मांचं श्रुतीमधूर गीत, 'कबीराचे विणतो शेले'

कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम

भाबड्या या भक्तासाठी देव करी काम

तेव्हा दिसू लागतात कबीर, माग चालवत, त्यांच्याही नकळत डोळे अलगद मिटून रामनामात तल्लीन झालेले. चेहऱ्यावर उदित झालेलं भाबडेपणातून आलेलं तेज! आणि दिसू लागतात तिथे आलेले रामचंद्र, भक्ताचं काम मोठ्या कौतुकाने करणारे भक्तवत्सल रामचंद्र. पुढे, जेव्हा गदिमा लिहितात -

दास रामनामी रंगे राम होइ दास

एक एक धागा गुंते धागा गुंते

रूप ये पटास, रूप ये पटास

तेव्हा वाटतं, दास रामनामात सबाह्य रंगून गेल्यावर रामाचं दास होणं यामधलं काव्य मोठं गोड आहेच, पण त्याचसोबत 'दास रामनामी रंगे, राम होइ दास' ही ओळ म्हणजे कबीरांच्या जीवनाचा गाभाच वाटते. एक एक धागा गुंतत जाताना त्या शेल्याचं रुप पटास येणं जसं आहे, त्याचबरोबर कबीरांच्या भक्तीचं पूर्णत्वास येणं आहे. शेल्यावर तेव्हा ठायी ठायी रामनाम दिसू लागतं. अर्थात, ते पहायला मात्र कबीराचे डोळे असायला हवेत हे मात्र नक्की! या गीताचा शेवट किती तरलमधूर आहे!

हळूहळू उघडी डोळे पाहि जो कबीर पाहि जो कबीर

विणूनिया शेला गेला सखा रघुवीर सखा रघुवीर

कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम

शेला विणून रामचंद्र केव्हाच गुप्त झाले आहेत. आता, त्या तल्लीन भावावस्थेतून बाहेर येत कबीरजी हळूहळू डोळे उघडताहेत. विणून झालेला शेला, त्यावरचं रामनाम पहात आहेत, हरखून जात आहेत. त्यांना का कळणार नाही कर्ता? त्यांच्या तनामनावर रोमांच फुलून आले आहेत. अशा अवस्थेमधे अधिकच भाबडे झालेले कबीरजी, त्यांच्या डोळ्यांतून ओघळणारे भक्तीझरेही कृतज्ञ अंतःकरणाने विचारत आहेत... कुठे म्हणे राम... कुठे म्हणे राम...?

कबीरजींचे दोहे हे निःसंशय उद्बोधक आहेतच, पण त्याचसोबत त्यातलं काव्यही तितकंच मोहक आहे. त्यांचे दोहे केवळ अध्यात्मिक मार्गांवर आपल्याला चालण्यास प्रेरणा देत नाहीत, तर सोबतच सामाजिक भान जागृत करतात. महत्त्वाचं म्हणजे सर्व आघाड्यांवर आपल्याला जागं करतात, कृतिप्रवण करतात. काही बाबतींत तर कबीरजी इतक्या कठोरपणे बोलतात, कान पकडतात की, त्यामुळे माणूस सन्मार्गाला लागला नाही तरंच नवल. यामागची त्यांची तळमळ आपल्याला कदाचित दिसत नसली, तरी त्यांच्या आदिरामाला मात्र ती तळमळ पाहून, त्यांचं सर्वार्थाने अलौकिक आणि लोकविलक्षण कार्य पाहून किती संतोष होत असेल! या विचाराने आपणच क्षणभर मुदित होतो. का बरं?

कारण, कबीरजी 'आपले' आहेत इतकं सोपं!

 

- पार्थ जोशी