एक... दोन... तीन... सुरु !

05 Jun 2023 13:39:18


एक... दोन... तीन... सुरु !


काय गंमत होती नाही लहानपणी शालेय स्पर्धांची! स्पर्धेत उतरतोय म्हंटल्यावर शक्य तितक्या आधीपासून आपण तयारी सुरू करायचो. संपूर्ण तयारीनिशीच आपला सहभाग नोंदवायचा हे ठरलेलं! उदाहरण म्हणून अगदी चमचा लिंबू शर्यत घेतलीत तरी आदल्या दिवशी प्रत्येकाने दोनदा तरी घरी तोंडात चमचा आणि त्यात लिंबू ठेवून चालून पाहिलेलं असेल. या स्पर्धेच्या सुरुवातीला मिळणारा इशारा मात्र सगळ्यात महत्त्वाचा वाटायचा. कारण स्पर्धा सुरू होत आहे, याची ती एक पूर्वसूचना असायची. हा इशारा म्हणजे स्पर्धेच्या आधीचे चार शब्द... एक... दोन... तीन... सुरू! आपण तयारी केलेली आहे ती फक्त आता मनापासून कृतीत आणून स्पर्धा जिंकायची इतकंच ध्येय समोर असायचं. त्या इशाऱ्यामुळे अचानक येणाऱ्या नवेपणाची भीती नसायची. एरवीसुद्धा काही नवीन सुरू होण्याआधी चर्चा, शोधाशोध, अनेक प्रश्न-उत्तरे या साऱ्या गोष्टी सुद्धा सुरूच असायच्या. एक मनाची आणि दुसरी म्हणजे प्रत्यक्ष अशी तयारी काही प्रमाणात झालेली असायची. आपल्या शाळेचं नवीन वर्ष सुरू होण्या आधीचच आठवा!

हळूहळू जसं जसं या एक अंकी इयत्ता मागे पडत गेल्या, तसतसं मात्र या नव्या सुरुवातीच्या आधीचा, स्पर्धांचा इशारा अंधुक होत गेला. त्याबरोबर आधी कोणतीही तयारी करणं सुद्धा कमी होत गेलं. आपल्या आयुष्यातल्या अनेक स्पर्धा, नव्या सुरुवाती अशा अचानक कोणत्याही इशाऱ्याविना आपल्या समोर येऊन बसू लागल्या. "मी आले आहे, आता आदरातिथ्य कसं करायचं ते तुझं तू ठरव" म्हणत चहासाठी चहा पावडरच नसावी, अशी आपली गत करू लागल्या. म्हणजे असं की, पहिल्यांदाच बसने कॉलेज/कामावर निघालेल्या माणसाने बस पकडण्याच्या स्पर्धेची तयारी कुठे केलेली असते? अचानक एक दिवस आपल्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येते आणि त्या व्यक्तीसोबत आपल्या मैत्रीच्या किंवा कोणत्याही नव्या नात्याची सुरुवात होते. याचा इशारा आपल्याला कुठे मिळालेला असतो?

आजकाल स्पर्धेत आपण सहभागी होत नाही, तर आपण ढकलले जातो आणि जिंकण्याआधी समोर ध्येय असतं ते स्पर्धेत टिकून राहण्याचं. त्यामुळे आपल्याला कोणतेच इशारे स्पष्टपणे दिसत नसले तरी चौफेर नजर ठेवून अंधुक दिसणाऱ्या गोष्टीसुद्धा समजून घेत राहणं, हीच आपली स्पर्धेसाठीची प्राथमिक तयारी बनून जाते. पण ही प्राथमिक तयारी आपल्यापैकी अनेक जणांच्या ध्यानीमनीच नसते. कारण लहानपणापासून सवय झालेली असते, ती सारं काही स्पष्ट अगदी नियमांसकट समजावून दिली जाण्याची. अशावेळी आपल्या आयुष्यात येऊ घातलेल्या स्पर्धांमध्ये जो आपल्या भोवताली घडणाऱ्या गोष्टींचं भान राखून, मन ताब्यात ठेवून, घाबरून-हरून न जाता जो लढत राहतो तो स्पर्धा अगदी सहज जिंकतो.

नव्या सुरुवातींना आपण खूप महत्त्वाचं मानतो. नववर्षाची सुरुवात चांगल्या कामाने करतो. एखादी चांगली सवय नववर्षाच्या मुहूर्तावर लावून घेतो. पण आपल्या आयुष्यातल्या अनेक नव्या सुरुवाती अगदी नवा दिवस, नवीन मिनिट पाहून सुद्धा येतात. एखाद्या गजबजलेल्या सकाळी किंवा निवांत संध्याकाळी तुम्हाला कधी नवीन जॉब ऑफर येते, कधी नवीन कॉलेज मिळून जातं तरी कधी नवीन माणसं. गंमत म्हणजे या अचानक आलेल्या नवीन गोष्टी आपल्या आयुष्यात सगळयात जास्ती बदल घडवून जातात. चांगली गोष्ट, चांगली बातमी असल्यास त्या आनंदाच्या भरात पुढचे काही दिवस सहज निघून जातात. त्या सकारात्मकेतेमुळे कधीकधी हे बदल जाणवून येत नाहीत. दुर्दैवाने कधी नवी सुरुवात वाईट प्रसंगाने झाली असेल तर त्या चिंता, दुःख या साऱ्यात हे बदल नजरेआड होतात.

रस्त्याची वळणं तरी लांबून कळत असतात, अगदी तीव्र वळणाचीसुद्धा जाणीव असते. रस्त्यावर बोर्ड असतात, मोबाईलमध्ये नकाशा असतो... पण आयुष्यात काही वळणं इतकी अकस्मात येतात की कदाचित या पुढचा क्षण सुद्धा तुमच्या आयुष्याचं महत्त्वाचं वळणं ठरू शकतो.

अशा अचानक येऊ घातलेल्या स्पर्धा, सुरुवाती अनेकदा खूप घाबरवून सोडणाऱ्या असतात. त्यासाठी आपण तयार नसतोच मुळी! पण आपल्यात चांगले बदल घडावेत, आपली प्रगती व्हावी यासाठीच बहुदा नियती हा सारा खेळ मांडते. अशावेळी फार काही नाही; पण एक क्षण स्वतःसाठी घ्यावा. प्रत्यक्ष तयारी शक्य नसली तरी मी करू शकते आणि मला जिंकायचे आहे असे म्हणत मनाची तयारी करून घ्यावी आणि स्वतःच स्वतःशी म्हणून घ्यावं... एक... दोन... तीन... सुरू !

- मैत्रेयी सुंकले

Powered By Sangraha 9.0