आमच्या दिंडीतला एकाने विचारले, की कोणासोबत चालले तर ते म्हणाले की एकटाच चाललोय. कधीपासून येतायत विचारलं तर ते म्हणाले की आठवत नाही तेव्हापासून येतो. म्हणजे वय झालेला पाय उचलत नव्हता, तरीही ते वारी करत होते हे बघून मला खूप ऊर्जा आली. घाट चढताना एका वेळेला असं झालं की आपला पाय उचलत नाहीये, तरीपण दिंडीतले वारकरी एकमेकांना ऊर्जा देत, भजन म्हणत, नाचत नाचत सगळ्यांना घाट चढवत घेऊन गेले. भयाण आनंद येत होता. उड्या मारून भजन करण्याचा आनंद, कोणी फुगडी खेळत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता. कीर्तनकार मंडळी वेगवेगळी भजनं, गवळणी अभंग गात होती. त्यातून वारकऱ्यांना वेगळीच ऊर्जा प्राप्त होत होती. म्हणजे साठी ओलांडलेले वारकरीही तेवढ्याच गतीने चालत होते आणि भजनाचा आनंद घेऊन नाचत होते. मला एका वेळेला असं वाटलं की, कुठून येते एवढी ऊर्जा? नामावर इतका विश्वास? खरंच साधारण माझ्या पिढीला एकदा तरी वारीला जायला हवं असं म्हणतात. एक तरी वारी अनुभवावी. पुढे वेगवेगळे टप्पे ठरलेले होते. सासवड नंतर लोणंद, जेजुरी, बरड, माळशिरस, नातेपुते, वाखरी या सगळ्यांमध्ये काही मुक्कामाच्या ठिकाणी आम्हाला राहुट्यामध्ये राहायला मिळालं. त्यामध्ये रात्र काढणं, तिथं लाईट नाही काही नाही आणि काही ठिकाणी तर संध्याकाळच्या हरिपाठ आणि कीर्तनामध्ये इतकं सुंदर वातावरण तयार व्हायचं की मन एकदम प्रफुल्लित व्हायचं. परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले सर्व वारकरी बघून, एवढे थकले असतानाही न चुकता हरिपाठ, कीर्तन व्हायचं आणि वारकरी आपला थकवा त्याच्यामध्ये नष्ट करून टाकायचे. एवढं सुंदर दृश्य असायचे ते मला बघून असं वाटायचं खरं सुख हे इथेच आहे. तुकोबांनी असं म्हटलं, तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख!
सावळ्या श्रीरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेलं मन जेव्हा त्याच्या भक्तीमध्ये रंगतं तेव्हा सारा परिसर सकारात्मकतेने रंगून जातो, हे जाणवतं. अक्षरश: काही दिवसानंतर चालून चालून पायांना ही सवय होते की आपल्याला चालायचं आहे. पायही विठ्ठल विठ्ठल करू लागतात. भजन म्हणू लागतात. पायांनाही त्या नामस्मरणाची सवय होऊन जाते. हा सगळा टप्पा पार करून वारी जेव्हा येते तेव्हा वारीला आलेल्या वारकऱ्यांच्या आनंदाचा बांध फुटतो. तिथून वेगळ्याच उर्जेने लोक पंढरपूरकडे कूच करतात. विठ्ठलाच्या भेटीची तीव्रता प्रत्येकामध्ये दिसू लागते आणि जेव्हा पंढरपूर लागतं तेव्हा मनामध्ये वेगळीच उत्सुकता दाटून येते. पंढरपूरात पहिल्यांदा पोहोचल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात सर्व दिंड्या पोहोचतात. स्नान सर्व वारकरी करतात.
सलग १५ दिवस पायी वाट चाललेले पाय चंद्रभागेच्या पाण्याचा स्पर्श जाणवताच ताजेतवाने होतात. तेव्हा मन अनुभव करतं हा सोहळा स्वर्गाच्या ही नशिबी नाही. भुवैकुंठ पंढरपूरच्या वाळवंटात स्नान करून आल्यानंतर जी जाणीव होते ती अवस्था कोणीच शब्दात व्यक्त करू शकत नाही. जो तो उच्च कोटीच्या परम आनंदात न्हाऊन निघाल्यासारखा भासतो. उन्हातान्हात चालताना चेहरा जरी काळवंडला असला तरी त्याच्या चेहऱ्यावर चंद्रभागेच्या पाण्याचा स्पर्श झाल्याने जे तेज झळकत ते कोणत्याही सौंदर्य प्रसाधनाने येणार नाही. ओठाने गोड हास्यात डुबकी घेतल्यासारखे प्रत्येक वारकऱ्याला माऊली जय हरि म्हणत एकमेकांच्या पाया जो तो पडत होता. बाल, अबाल, किशोर, तरुण, म्हातारे पार साठीला टेकलेले ही लहानांच्या पाया पडतं. ते परत मोठ्यांच्या पाया पडत. एक वेगळाच भाव सगळ्यांमध्ये दिसत होता. भावशून्य अवस्थाच हो ती. त्याला व्यक्त होण्याकरिता शब्द सापडणार नाही. प्रत्येकामध्ये सगुण साकार निर्गुण निराकार श्रीरंग समजून माऊली आपसूक तोंडात यायचं.
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्व काळ ॥२॥
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनी । शहाणा तो धनी येतो तेथे ॥३॥
तुकोबांनी या अभंगात सांगितलं की इथ येणारा शहाणा आहे सर्वामध्ये धनिक आहे. खरं म्हणजे वारी जाण्याची बुद्धी सूचन हे शहण्याचंच लक्षण आहे. त्याच्या नशिबी वैकुंठाला येण्याचं भाग्य लाभलं. त्याच्या एवढा धनिक दुसरा नाही.
गावोगावच्या दिंड्या पंढरीत दाखल होतात. चंद्र भागेत डुबकी मारून साक्षीदार राहिलेल्या सूर्याला अर्घ्य देऊन पंढरीच्या पांडुरंगाला प्रदक्षिणा घालत. विठूचा गजर करत सर्व दिंड्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतात. मग वारकरी सावळ्या श्रीरंग डोळ्यात साठवण्यासाठी रांगेत उभे राहतात. जवळजवळ १५ ते २० तास उभे राहून वारकरी दर्शन घेतो. अवघा देह पांडुरंग होऊन जातो आणि डोळ्यातील पाणी चंद्रभागा.
- प्रसाद जाधव