आठवणींचे मोरपीस!

02 Jul 2023 10:00:00


आठवणींचे मोरपीस!

खरंच, मोरपीस असतं का, आठवांचं? की साऱ्या स्वप्नसुंदर हर्षदायी कल्पनाचं? प्रश्नच! पण मोरपीस म्हटलं, की आठवतो तो मुरली मनोहर मेघश्याम, कृष्ण! आणि कृष्ण म्हणजे आकर्षण. त्रिगुणातीत असे अलौकिक आकर्षण. तसाच नसतो का आठवांचा मोरपीस, असला तर? मनातील चराचराला, प्रत्येक क्षणी प्रत्येक विचाराला थांबायला लावणारे आकर्षण, भावनांना वाचा फोडणारे आकर्षण आणि मनाला सतन स्तब्ध करणारे, तेच आकर्षण! आणि मग वाटतं, खरचं, मोरपीस असतं आठवांचं, असतंच. रणरणत्या उन्हात तापून निघताना, मनावर आपली आश्वासक श्यामल छाया धरुन राहणारं तेच, आठवांचं मोरपीस. जे जोडलंय, माझ्या नेणीवेशी आणि सामुहिक नेणीवेशीही. जाणिवेच्या ज्योतीतून क्षण अन् क्षण अधिक स्पष्ट होतोय, तो त्यामुळेच. आनंदात बुडून खळखळणााऱ्या, हतबलेत हळहळणााऱ्या, संमिश्र भावनांत तरळणाऱ्या आणि कालाग्नीची क्रूर झळ सोसून झुरणाऱ्या कित्येक क्षणांमधले ते आठव गुंफून आहेत मोरपिसात, अलवार, ओले चिंब. हाच ओलावा पोषक ठरतो जीवनाच्या पादपाला, मनाच्या माणूसपणाला आणि भावनांच्या पाझरण्याला. अचेतनातील त्याच्या अस्तित्वाने, दरवळतोय त्याचा गंध, अंतरात, अखंड. अभिव्यक्तीत सामर्थ्य आहे, ते त्यामुळेच. सृजनाच्या मुळाशी प्रकाशमान आहे हे सर्वांगसुंदर मोरपीस, संवेदनेच्या भावनिक समृद्धीची गजबज दाखवत, ते सजलय, हिरवाईने, निरनिराळ्या हळव्या लोभस संवेदन रंगांत. प्रत्येक रंगातील समानसूत्र सांगत, तिथूनच तर पाझरतोय जीवनरस. मग वाटतं आणि पटतंही की, 'अभिनव घननिलं ' अशा कृष्णाच्या रुपावरील तेच कृष्णांकित मोरपीस स्पर्शून आहे माझ्या मनाला, अस्तित्वाच्या सर्वांगाला. कदाचित, म्हणूनच अर्थ आहे जीवनाला, गंध आहे श्वासांना आणि नाम आहे अनामिकाला!

- पार्थ जोशी

Powered By Sangraha 9.0