गुरुपौर्णिमा! एक असा दिवस जो साजरा करणं म्हणजे कृतज्ञ भावाने आपल्या गुरूंना अभिवादन करणं. शालेय दिवसांत आपल्या लाडक्या गुरूंना आपली आवडती फुले भेट म्हणून देणं, त्यांना मनोभावे नमस्कार करणं, गुरुपौर्णिमेच्या दिवस म्हणून गुरूंची महती सांगणारे छोटेसे भाषण तयार करणं इतकेच त्या बालमनाला माहित असे. हळूहळू मात्र गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्याला अनेक लहान-मोठ्या गोष्टींमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या, आपल्या मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देणाऱ्या, आपल्यावर आलेले प्रत्येक संकट हिंमतीने पेलायला शिकवणाऱ्या आणि त्याचबरोबर सदैव आपल्या पाठीशी उभे राहून हित चिंतणाऱ्या प्रत्येकाचा दिवस असतो हे लक्षात येऊ लागले. आपले आईवडील, शिक्षक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी या साऱ्यांकडून आपण कायमच अनेक गोष्टी शिकत असतो. आपल्या आई-वडिलांच्या प्रत्येक संस्कारातून आपण माणूस म्हणून घडत राहतो. शिक्षकांच्या धाकाने शिस्त अंगिकारतो. नातेवाईकांसमावेत जगताना जगण्याचे पैलू शिकतो. मित्रांसमावेत आयुष्याचा आनंद लुटायला शिकतो. या साऱ्या सोबतच आपण स्वतः, निसर्ग, ग्रंथ, अनुभव या साऱ्याच गोष्टी आपल्या गुरूंची भूमिका बजावत असतात.
आपल्या आयुष्यात गुरूंचे असणे महत्त्वाचे का? तर मला वाटतं गुरूंच्या असण्याने आपण एखादी गोष्ट करू शकतो, असा आत्मविश्वास आपल्याला मिळत राहतो. हातून चूक घडल्यास ती चूक लक्षात आणून देणारी व्यक्ती आपल्या सोबत आहे, ती चूक सुधारण्याची संधी आपल्याला मिळते याची जाणीव करून देणारी व्यक्ती म्हणजे गुरू असते. आपल्या सोबत कोणीही नाही हा विचार, ही भावना मुळात फार क्लेशदायी आहे. अशावेळी आपली ज्यांवर श्रद्धा आहे, विश्वास आहे अशा एका व्यक्तीच्या फक्त चिंतनानेसुद्धा आपल्याला आशेचा एक नवा किरण सापडून जातो. शालेय परीक्षा असो अथवा आयुष्यातील कोणतेही संकट, समस्या आपल्याला त्यासाठी तयार करणाऱ्या, सक्षम बनवणाऱ्या प्रत्येक गुरूचे योगदान अनमोल ठरते. गुरूंचा एक आपुलकीचा शब्द आयुष्यभरासाठी पुरतो.
गुरू-शिष्याचे नाते भारतीय संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचे मानले जाते. कोणत्याही स्वर्थाशिवाय ज्ञान, मार्गदर्शन देऊ करणारे गुरू आणि गुरू हेच ईश्वर या भावनेने त्यांच्याकडून ज्ञानाचा वसा घेणारे, त्यांची सेवा करणारे शिष्य! या निस्वार्थी नात्याचा अभाव मात्र आजकाल जाणवत राहतो. माणसाची कृतज्ञ भावाने जगण्याची कला हल्ली लोप पावू लागली आहे. परंतु आपली संस्कृती टिकवून ठेवणे आपल्याच हाती असते. शालेय जीवनात गुरूंना जसे फुल देऊन वंदन करत असू तसे आजही आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीस, आपल्याला माणूस म्हणून जीवंत ठेवणाऱ्या प्रत्येक शक्तीस आज सारे वंदन करू या! आपल्या पाठीशी गुरू सदैव आहेत. या विश्वासाने हा जीवन सागर तरत राहताना निस्वार्थी भावनेने आपणही चुकल्या वाटसरूला योग्य मार्ग दाखवत राहू या!
-- मैत्रेयी सुंकले