त्याच्या डोळ्यांत पाहता
दिसे सुखाचे सोहळे
दु:ख असते मिथ्याच
आत खोलवर कळे
होता नजरेचा स्पर्श
सारा काळोख मिटतो
जैसा पाण्यामधे मेण
ताटस्थ्यानेच जगतो
रूप बघता सामोरी
भान हरपून जाते
रंध्रांतुन साऱ्या
शुद्ध प्रेम पाझरते
आणि प्रेमे वाजवितो
तो मनोहारी पावा
सूक्ष्म-जडात वाटतो
चराचरी त्याचा दावा
आणि हसतो क्षणात
कृपे खेळ बदलतो
वाळवंटात भुकेल्या
नंदवन फुलवतो...
- अनीश जोशी