औपचारिक - अनौपचारिक

08 Jul 2023 10:00:00

औपचारिक - अनौपचारिक
औपचारिक आणि अनौपचारिक हे दोन विरुद्धार्थी शब्द. खरंतर वागण्या-बोलण्याच्या पद्धतीशी या दोन शब्दांचा संबंध येतो. दैनंदिन जीवनात नेमकं काय औपचारिक आणि नेमकं काय अनौपचारिक हे ठरलेलं असतं किंवा ठरवावं लागतं. खासकरुन कार्यालयीन कामकाज, सभा, बैठका वगैरे ठिकाणी वातावरण औपचारिक असतं. तर, समारंभ, संमेलन, सोहळे किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात वातावरण अनौपचारिक असतं.

पण दैनंदिन जीवनक्रमात औपचारिक ते अनौपचारिक हा एक प्रवास आहे. बऱ्याच गोष्टींची, घटनांची, प्रसंगांची किंवा नात्यांची सुरूवात बरेचदा औपचारिकच असते. अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं तर, आपण बरेचदा एखाद्या स्टॉलवर चहा घ्यायला किंवा काही खाद्यपदार्थ खाण्यासाठी म्हणून जातो. आपण प्रथम जातो तेव्हा चहाची किंमत विचारुन तेवढे पैसे देतो. चहावाला आपल्याला मोजून चहा देतो. दोन-चार वेळा आपलं मग त्या टपरीवर जाणं होतं. चहावाल्याशी हळूहळू ओळख होते. कधीकधी आपल्याकडे सुटे पैसे नसतात. एखाद-दोन रुपये कमी जास्त असल्याचं आपण चहावाल्याला सांगितलं की तो म्हणतो, ‘राहू दे दोन रुपये कमी द्या!’ चहा मोजून देणारा तो चहावालाही आपल्याला विचारतो , "एवढा बास का , देऊ अजून?" किंवा कधी कधी स्वतःहून पेलाभर चहा देतो. कधीतरी एखादं बिस्किटही देतो. आपलं अलिखित असं नातंच दृढ होत जातं. कदाचित, आपण त्याला ओळखीचं नातं म्हणतो. पण एकंदरीत औपचारिक ते अनौपचारिक हा सगळा प्रवास साधारण असा होतो. सुरुवातीला ओळख झाली की पुढे चांगलं नातं निर्माण होतं. म्हणजेच, ते अनौपचारिक होतं..

याचं दुसरं छानसं उदाहरण म्हणजे, शाळा! शाळेत प्रवेश घेताना आपण अर्ज, शुल्क भरतो, कागदपत्रे देतो. मग सगळी प्रक्रिया बरोबर असली म्हणजे आपला प्रवेश निश्चित होतो. म्हणजेच, शाळेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया औपचारिक असते. शाळेच्या पहिल्या दिवशी आपली सर्वांशी ओळख होते. इयत्ता वाढत जातील तसं सगळ्यांशी असणारी मैत्री अधिकच घट्ट होत जाते. कितीतरी गोष्टी आपण मित्र-मैत्रिणींशी शेअर करतो. रोजचा डबा आपण सगळे मिळून खातो. शाळा सुटल्यावर सगळे धावत सुटतो. बघता बघता दहावीच्या निरोप समारंभाचा दिवस येतो. पहिल्या दिवसापासूनच्या आठवणी ताज्या होतात. कुणाच्या चेहऱ्यावर हास्य खुलतं. एखाद्या आठवणीनी डोळे पाणावतात. एकमेकांना आपण फोन नंबर, पत्ते शेअर करतो. पुढे कितीतरी वर्ष ही मैत्री टिकते. पहिल्या दिवशी औपचारिक असणारं हे नातं अनौपचारिक होऊन आपल्या आयुष्याचा एक सुंदर भाग होतं. शाळेप्रमाणेच अगदी ऑफिस व ऑफिसातील सहकारी, व्यवसायातील पुरवठादार, ग्राहक वगैरे मंडळीसुद्धा आपल्या आयुष्याशी बांधली जातात. औपचारिकतेची अशी अनौपचारिकतेशी सांगड घातली जाते.

ही सगळी उदाहरणे आपल्या रोजच्या जीवनातीलच आहेत. अनोळखी माणसाचं माणसाशी असणारं नातंसुद्धा अगदी अपेक्षाविरहीत असतं. बसमधून प्रवास करताना शेजारचा माणूस आपल्याशी हसतो. तेव्हा माणूस किती सुखावतो. त्यामुळे, एखादा प्रसंग, घटना, नातं, कार्यक्रम औपचारिक का अनौपचारिक हे आपल्याला ठरवताच येत नाही. ऑफिसातली साधी औपचारिक सभा असते. पण एखादं प्रेझेंटेशन छान झालं, की कौतुकादखल सगळे जण टाळ्या वाजवतात, आनंद साजरा करतात. गणपूर्ती, उद्दिष्टे ह्या सुरुवातीला औपचारिक असणा-या गोष्टी वाजलेल्या प्रत्येक टाळीनीशी अनौपचारिकतेचा हात हातात घेत असतात. अर्थात, सगळ्याच गोष्टी अनौपचारिकतेत रुपांतरित होतात असं नाही; पण बहुतांश वेळा अगदी आपल्याही नकळत त्या तशा घडत असतात. त्याचा वातावरणावर, जित्याजागत्या माणसांवर निश्चितच परिणाम होत असतो. अगदी एखादी निर्जीव वस्तूही आपल्या सजीव मनात घर करुन बसते.

इतकं सगळं असूनही औपचारिक आणि अनौपचारिकतेची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. बरेचदा, या व्याख्या प्रत्यक्षात लागूच होत नाहीत. तरीही प्रत्येकजण ती आपापल्या परीनी करतच असतो. अमुक एक गोष्ट किंवा व्यक्ती फॉर्मल आणि अमुक एक गोष्ट किंवा व्यक्ती इनफॉर्मल असं आपण ठरवूनच टाकतो. जगाची लोकसंख्या पाहता, या व्याख्यांची संख्या कितीतरी होईल आणि इतक्या संख्येने उपलब्ध असलेली एकही व्याख्या बरोबर लागू पडेल अशी खात्री नाही. हीच तुमच्या-माझ्या विचारातली गंमत असते. म्हणून तर आपण फार विचार न करता फक्त सुरुवात करायची. औपचारिकता ओळख करून देते आणि अनौपचारिकता त्याचं सहवासात रुपांतर करते. या सहवासाला निश्चित अशी मुदत नसते. सहवास टिकेलच असं ठामपणे सांगता येत नाही. पण बरेचदा, या सहवासाला कुठली ‘एक्सपायरी डेट' नसते. औपचारिकता आपल्याला जमिनीवर रहायला शिकवते, तर अनौपचारिकतेचं आभाळ आयुष्यात आनंदाचा वर्षाव करतं. औपचारिक का अनौपचारिक? या नेमकेपणाने उत्तर न देता येणा-या प्रश्नाचं उत्तर आयुष्य आपल्याला देत नाही आणि ते उत्तर विचारुही नये. काही प्रश्न उत्तरांच्या प्रतिक्षेत असले की त्यांची आपल्याला गोडी लागते... ही गोडी औपचारिकही आहे आणि अनौपचारिकसुद्धा!

- गौरव भिडे

Powered By Sangraha 9.0