परवा एका शाळेबाहेर मला एक काका वेगवेगळ्या रंगांचे धागे, हातात घालण्याची मण्यांची ब्रेसलेट्स विकताना दिसले. अनेक शालेय विदयार्थी, विद्यार्थिनी तिथे घोळक्याने आपल्याला आवडणाऱ्या धाग्याची किमंत विचारून ते विकत घेत होते. अनेकदा कधी देऊळाबाहेर किंवा अनेक सार्वजनिक ठिकाणी आपल्याला असे छोटेसे दुकान अनेकदा दिसते. आपल्या पैकी अनेकजण खूप श्रद्धेने हे अगदी १० रुपयांना मिळणारे देवाचे धागे विकत घेत असतो. माझं स्वतःचं मत या बाबतीत मला अद्याप कधी सुस्पष्ट करता आलं नाही. आपली देवावर श्रद्धा आहे तर त्याने आपले रक्षण करावे म्हणून असा धागा बांधावा का हा प्रश्न मला अनेकदा पडला आहे.
तो प्रसंग पाहिल्या नंतर मात्र एक उगाच उडता विचार दार ठोठावून गेला. अनेक दुकानांच्या बाहेर इथे हे हे मिळेल अशी पाटी लिहिलेली असते. या दुकानाबाहेर पाटी लावायची झाली तर इथे विश्वास, आत्मविश्वास विकत मिळेल अशी पाटी लावावी. कारण आपण आपल्या हाताला जे धागे बांधतो त्यामुळे देवाने आपले रक्षण केले अशी खात्री मला नसली तरी आपण संकटात जाणार नाही असा एक सकारात्मक विचार कायम तो धागा बांधणाऱ्या व्यक्तींच्या मनात असतो. स्वतः वरचा विश्वास त्यांच्याकडे असतो. संकटात गेल्यास त्या धाग्याकडे गेलेली एक नजर मनोबल वाढवण्यास मदत करत असते.
अशा अनेक गोष्टी आपण दैनंदिन जीवनात करत असतो. काही जण आपल्या परंपरा, संस्कृती च्या विरोधात जाऊन यात असलेला अर्थ शोधायला सांगतात. मला वाटतं खरंच आपण अर्थ शोधायला हवा, तेव्हा कुठे जाऊन अंधश्रध्देने नव्हे तर श्रध्देने, विश्वासाने, तर्काने आपण संस्कृती जपायला शिकू.
आज अनेकांना एखाद्यावर, स्वतःवर विश्वास ठेवणे कठीण होऊन बसतं. यातून आत्महत्येसारखी पाऊले उचलली जातात. अशा वेळी खरोखर एका विश्वासाच्या धाग्यामुळे ही पाऊले मागे घेतली जाणार असतील तर या दुकानांबाहेर होणारी गर्दी मग ती लहान मुलांची सुद्धा का असेना मला कोणत्याच प्रश्नात टाकणार नाही.
- मैत्रेयी सुंकले