वंदू चरणरज...

युवा लेख

युवा विवेक    14-Sep-2023   
Total Views |

वंदू चरणरज...

एखादं अवघड वाटणारं गणित सहज कोणीतरी सोडवून द्यावं आपल्यासाठी, दृष्टीपुढचा अंधार दूर करुन वाट दाखवावी आणि सोबतीही व्हावं, वाटेवरचे दाहक काटे दाखवून द्यावेत, दाखवून द्यावं हातात धरण्याआधीच; आजूबाजूच्या रंगीत काट्यांचं फोलपण आणि सांगावं ध्येयाचं कौतुक... तेव्हा आपोआप मिळेल चालण्याचं बळ, दृष्टीला ''कार आणि अंतरंगाला आधाराची ऊब. किती रम्य कल्पना वाटते ही... संतांपाशी मात्र ही कल्पना सत्यात येते, ते दाखवत राहतात वाट आणि प्रकाशित करत राहतात आपल्या अंतरंगाला. आपल्या अभंगांतून ते देऊन जातात आपल्याला डोळसपण आणि सुगंधीत करतात वाटा, आपल्यासाठी. अशाच एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात,

वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी। पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं॥१॥

अमुप हे गांठीं बांधूं भांडवल। अनाथा विठ्ठल आम्हां जोगा॥ध्रु.॥

वंदन करायचं आहे ते 'त्या'च्या चरणांचं, चरणरजांचं. जेव्हा आपण चरणांचं वंदन करतो, त्यांना स्पर्श करतो तेव्हा आपण वाकतो. इथे मात्र आपण वाकलो आहोत' अशी जाणीव भक्ताच्या अंतरंगात मुळी नसतेच. अहंकाराचा अवरोहच जणू तो गात असतो आतून, जणू 'त्या'च्या थोरपणाची नुसती चाहुलही 'मी'पणा विसरायला लावते, जणू तो आपोआप विसरला जातो. तेव्हा भक्ताला 'त्या'ची उष्टावळही मधुर वाटायला लागते, अन्नाचा प्रसाद होतो तो 'त्या'च्याचमुळे... तुकाराम महाराज इथे हेच सांगत आहेत. त्या पांडूरंगाच्या, परमेश्वराच्या चरणरजांचं वंदन करुन, त्याच्या उष्टावळीचं सेवन करुन काय करायचं तर पूर्वकर्माची होळी करुन सांडायची. त्याच्या भक्तीचं भांडवल आपल्यापाशी जमवायचं. किती महत्त्वाची गोष्ट तुकाराम महाराज सांगतात, मेहनतीन जमवयाचं आहे ते त्याच्या भक्तीचं भांडवल...’

अवघे होती लाभ एका या चिंतनें। नामसंकीर्तनें गोविंदाच्या॥२॥

जन्ममरणाच्या खुंटतील खेपा। होईल हा सोपा सिद्ध पंथ॥३॥

माणसाचा स्वभाव हा अनेकदा फायदा बघण्याचा असतो. एखादी गोष्ट करण्यामागे फायदा बघणं जरी बहुतेकदा उचित असलं तरी याने माणूस निर्हेतुक कर्म करण्याच्या वृत्तीपासून कदाचित दूर जात असावा. ही गोष्ट मात्र माणसासाठी फार महत्त्वाची असल्याने तुकाराम महाराज इथे याचे फायदे सांगतात. परमेश्वराच्या चिंतनाने, त्याच्या नामसंकीर्तनाने लाभ न म्हणता 'फक्त लाभच' होणार आहेत असं ते कौतुकाने सांगतात. त्याच्या नामाची थोरवी सांगताना ते म्हणतात की, त्याच्या नामसंकीर्तनाने जन्ममरणाच्या खेपाच जणू खुंटून जातील, बंधनातून सुटण्याचं भाग्य मिळेल... हा सोपा सिद्ध पंथ होईल. वाटतं की, तो सिद्ध होईल तो 'त्या'च्या कृपेनेच. कारण चालणाऱ्यापेक्षा 'चालवणारा' केव्हाही श्रेष्ठच.

गेले पुढें त्यांचा शोधीत मारग। चला जाऊं माग घेत आम्ही॥४॥

तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा। जाऊं त्या माहेरा निजाचिया॥५॥

या वाटा किती मोठ्या असतील, म्हणलं तर असतील विस्तीर्ण आणि म्हणलं तर अरुंद. मात्र कित्येक लोकांनी चालल्या असतील त्या, चालल्या असतील 'त्या'च्या कृपेच्या छायेखाली आणि तेव्हाच 'त्या'च्या ओढीनेही...

या मार्गावर जायचंय, चालायचंय; मात्र हे करत असताना किती विलक्षण गोष्टी घडणार आहेत... तुकाराम महाराज म्हणतात की, जीवपणालाच मुळी चिरा घालायच्या आहेत, म्हणलं तर केवढी अवघड गोष्ट आहे ही. लहान गोष्टींतही सहज रमणाऱ्या, लहान गोष्टींपायी दमणाऱ्या, एकाप्रकारे स्वत:लाच चिरा घालायच्या... मात्र त्याने हातात येणारं फळ मात्र अभूतपूर्व आहे. ते यासाठी की, तेव्हा ते दिव्य फळ, त्याचा रंग कदाचित वेगळा असा दिसणार नाही. मात्र त्याच्यावाचून दुसरं काहीच असणार नाही; कारण ते फळ म्हणजे निजाचं माहेर आहे, जिथे दु:खाला जागा नाही, तक्रारीला वाव नाही. आहे ते फक्त शुद्ध स्वरूप; निजस्वरूप...

- अनीश जोशी